Andheri By Election: अंधेरी पोटनिवडणुकीत काँग्रेसचं ठरलं; नाना पटोले स्पष्टपणे म्हणाले, आमचा पाठिंबा...
अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीत (Andheri East Bypoll Election) काँग्रेस कुणाला पाठिंबा देणार? या प्रश्नाचं उत्तर अखेर मिळालं आहे. काँग्रेसनं ठाकरे गटाला (Shivsena) पाठिंबा देण्याचं जाहीर केलं आहे.

Andheri Vidhansabha By Election : अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीत (Andheri East Bypoll Election) काँग्रेस कुणाला पाठिंबा देणार? या प्रश्नाचं उत्तर अखेर मिळालं आहे. या पोटनिवडणुकीत काँग्रेसनं ठाकरे गटाला (Shivsena) पाठिंबा देण्याचं जाहीर केलं आहे. काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी आज शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन अंधेरी पोट निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवार ऋतुजा रमेश लटके यांना काँग्रेसचा पूर्ण पाठिंबा असल्याचे जाहीर केले आहे. यावेळी काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पाटोले, मुंबई प्रदेश अध्यक्ष भाई जगताप, अमित देशमुख , प्रवक्ते राजू वाघमारे उपस्थित होते. शिवसेना सचिव विनायक राऊत , विधिमंडळ गटनेते अजय चौधरी , अॅड अनिल परब हे देखील उपस्थित होते.
अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार रमेश लटके (Ramesh Latake) यांच्या निधनामुळे अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक लागलेली आहे. या निवडणुकीत काँग्रेस पक्ष आपला आपला उमेदवार देणार नसून महाविकास आघाडी म्हणून शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा देणार आहे अशी घोषणा अध्यक्ष नाना पटोले यांनी केली.
ठाकरे गटाला पाठिंबा देण्यावरुन मुंबईतील काही काँग्रेस नेत्यांचा नाराजीचा सूर?
गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या जगदीश कुट्टी या काँग्रेस उमेदवाराला तिसऱ्या क्रमांकाची 27 हजार मते मिळाली होती. यामुळं ठाकरे गटाला पाठिंबा देण्यावरुन मुंबईतील काही काँग्रेस नेत्यांचा नाराजीचा सूर होता. अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीत कॉंग्रेस शिवसेनेला मदत करणार असली तर आगामी बीएमसी निवडणुकीत शिवसेना कॉंग्रेसला मदत करणार का असाही सवाल कॉंग्रेस नेत्यांनी उपस्थित केला होता. काँग्रेसनं स्वबळाचा नारा दिलेला असताना मुंबई महानगरपलिका निवडणुकीअगोदर काँग्रेसला वोट बॅंक मजबूत करण्याची संधी असतांना शिवसेनेला मदत का? असाही प्रश्न काही नेत्यांनी उपस्थित केला होता.
अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत शिवसेनेचे दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. भाजपने या आधीच मुरजी पटेल यांची उमेदवारी घोषित केली आहे. त्यामुळे या निवडणुकीत चांगलीच चुरस पाहायला मिळणार असून या निमित्ताने शिवसेना आणि शिंदे-भाजप गट पहिल्यांदाच समोरासमोर येणार आहेत.
अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात 3 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून 6 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. राज्याच्या राजकारणात बदललेल्या समीकरणांमुळे ही निवडणुक चुरशीची होणार आहे. शिवाय शिवसेनेचा निवडणूक चिन्ह कोणाला मिळतं याचीही उत्सुकता आहे.
संबंधित बातम्या :
ठाकरेंना धनुष्यबाण चिन्ह मिळणार का? शिंदे गटाऐवजी भाजप मैदानात उतरणार का? अंधेरी पोटनिवडणुकीमध्ये सस्पेन्स कायम
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
