Suraj Chavan : मोठी बातमी! अटकेनंतर कथित खिचडी घोटाळा प्रकरणात सूरज चव्हाणांवर कारवाई, 22 जानेवारीपर्यंत ईडी कोठडी
Suraj Chavan : कथित खिचडी घोटाळा प्रकरणात आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय असलेले सूरज चव्हाण यांना ईडीने अटक केल्यानंतर 22 जानेवारीपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आलीये.
मुंबई : आदित्य ठाकरेंचे (Aaditya Thackeray) निकटवर्तीय असलेले सूरज चव्हाण (Suraj Chavan) यांना कथित खिचडी घोटाळ्याप्रकणी 22 जानेवरीपर्यंत ईडीची कोठडी सुनावण्यात आलीये. तसेच 22 जानेवारीपर्यंत ईडीच्या ताब्यात ठेवण्याचे देखील निर्देश देण्यात आलेत. ईडीने सूरज चव्हाण यांची 8 दिवसांची कोठडी मागितली होती. दरम्यान 17 जानेवारी रोजी ईडीकडून सूरज चव्हाण यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता सूरज चव्हाणांवर कारवाई करण्यात आलीये.
खिचडी घोटाळा नेमका आहे तरी काय?
कोरोना काळात स्थलांतर करणाऱ्या गरीब कामगारांसाठी, ज्यांचे मुंबईत घर नाही अशा कामगारांसाठी लॉकडाऊनच्या काळात जेवणाची व्यवस्था करण्याचा निर्णय त्यावेळच्या सरकारने घेतला होता. केंद्र सरकारनेही त्याला पाठिंबा दिला होता. मुंबई महापालिकेने एकूण 52 कंपन्यांना खिचडी देण्याचं कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलं होतं. सुरुवातीच्या चार महिन्याच्या काळात चार कोटी खिचडी पॅकेट्स वाटण्यात आल्याची माहिती मुंबई महापालिकेने दिली. या कामात घोटाळा केल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला. आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांचे नाव यामध्ये घेण्यात आलं होतं.
यापूर्वी नोंदवलेला सूरच चव्हाणांचा जबाब
कथित खिचडी घोटाळा प्रकरणात सूरज चव्हाण आणि अमोल किर्तीकर यांची आर्थिक गुन्हे शाखेनं चौकशी केली. अमोल किर्तीकर यांच्या खात्यात 52 लाख तर सूरज चव्हाण यांच्या खात्यात 37 लाख रुपये जमा झाल्याचं समोर आलेलं. चौकशी दरम्यान या दोघांनाही खात्यात जमा झालेल्या रक्कमेबाबत विचारणा झाली. चौकशीत या दोघांनी आपण, फोर्सवन या कंपनीचे कर्मचारी असल्यानं त्यांना पगार म्हणून हे पैसे मिळाले असल्याचं सांगितलं. दोघेही सल्लागार म्हणून या कंपनीसाठी काम करत असल्याचा जबाबत उल्लेख असल्याची माहिती समोर आली आहे. सूरज चव्हाण आणि अमोल किर्तीकर या दोघांना आर्थिक गुन्हे शाखेनं समन्स देऊन गेल्या काही दिवसांत त्यांची चौकशी करत जबाब नोंदवला होता.
सूरज चव्हाण यांचा या कंत्राटाशी काय संबंध काय?
ईडीच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लाईफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेसकडून काही सब टेंडर देण्यात आले, ज्यामध्ये वैद्यकीय साहित्य आणि सेवा पुरवण्याचे सब टेंडर होते. असं टेंडरशी संबंध सुरज चव्हाण यांचा येतो, त्यामुळे या संपूर्ण कंत्राटामध्ये आर्थिक व्यवहार होताना नियमांचं उल्लंघन झालं का? यामध्ये कुठल्या प्रकारचा गैरव्यवहार करण्यात आला का? या सगळ्याची सखोल चौकशी करण्यात येत आहे.