उद्धव ठाकरेंनी एक कॉल करावा, राज ठाकरे 100 पावलं पुढे येतील, मनसेच्या दोन शिलेदारांनी पत्ते उघडले!
Raj-Uddhav Thackeray Alliance : शिवसेनेचे नेते कॅमेरासमोर जरी बोलत असले तरी त्यांच्याकडून युतीबाबत कोणताही प्रस्ताव आला नाही असं मनसेच्या नेत्यांनी स्पष्ट केलं.

मुंबई : कोणतीही युती ही कॅमेरासमोर बोलून होत नाही. त्यासाठी योग्य ती प्रक्रिया असते. शिवसेना ठाकरेंकडून अद्याप कोणताही युतीचा प्रस्ताव आला नाही असं मनसे नेते अविनाश जाधव आणि संदीप देशपांडे यांनी स्पष्ट केलं. युतीसाठी उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंना एक कॉल करावा, उद्धव ठाकरेंनी एक पाऊल पुढे यावं. राज ठाकरे हे 100 पावले पुढे येतील असा विश्वास अविनाश जाधव यांनी व्यक्त केला. ते माध्यमांशी बोलत होते.
आमचं तोंड दोन वेळा पोळलं गेलं आहे, त्यामुळे आम्ही ताकही फुकून पितोय असं संदीप देशपांडे म्हणाले. 2014 आणि 2017 मध्ये युती करावी ही आमची अपेक्षा होती. त्यावेळी युती करावी असा निरोप घेऊन बाळा नांदगावकर गेले होते. तो प्रस्ताव होता. तसा कोणताही प्रस्ताव आता आला नाही. तसा प्रस्ताव आला तर राज ठाकरे त्यावर निर्णय घेतील असंही ते म्हणाले.
MNS Shiv Sena Alliance : उद्धव ठाकरेंनी एक कॉल करावा
मनसेचे नेते अविनाश जाधव म्हणाले की, पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या आणि लोकांच्या भावनांचा आम्ही आदर करतो. युती ही काही एक दिवसात होत नाही. त्यासाठी एक प्रक्रिया असते. महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच राज ठाकरे करतील हे नक्की. जे सर्व नेते कॅमेरासमोर युतीसंदर्भात कॅमेरासमोर बोलतात त्यांनी एकदा उद्धव ठाकरेंना सांगावं. उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना एक कॉल करावा. आम्ही खात्रीशीर सांगतो, तुम्ही एक पाऊल पुढे आला तर राज ठाकरे 100 पावले पुढे येतील हे नक्की.
अमित ठाकरे यांनी म्हटल्याप्रमाणे दोन्ही भावांकडे एकमेकांचा नंबर आहे. मराठी माणूस आणि महाराष्ट्राच्या हितासाठी आता उद्धव ठाकरे यांच्याकडून एक कॉल येणे ही अपेक्षा आहे असं अविनाश जाधव म्हणाले.
ही बातमी वाचा:
























