मध्य रेल्वेवर 36 तासांचा मेगाब्लॉक, 1 आणि 2 जूनला 600 लोकल फेऱ्या रद्द होण्याची शक्यता
Mega Block on Central Railway : सीएसएमटी स्थानकाच्या नूतनीकरणासाठी 36 तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार असून 1 आणि 2 जूनला 600 लोकल फेऱ्या रद्द होण्याची शक्यता आहे.
मुंबई : लोकल प्रवाशांसाठी (Local Train) मोठी बातमी आहे. 1 आणि 2 जून रोजी मध्य रेल्वेकडून विशेष मेगाब्लॉक (Mega Block) घेण्यात येणार आहे. यामुळे 1 आणि 2 जूनला सुमारे 600 लोकल फेऱ्या रद्द होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या नूतनीकरणासाठी मध्य रेल्वेकडून हार्बर आणि मध्य रेल्वे मार्गावरील लोकल रद्द करण्यात येण्याची शक्यता आहे.
1 आणि 2 जून रोजी 36 तासांचा ब्लॉक
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे 24 डब्यांच्या गाड्यांसाठी प्लॅटफॉर्म 10 आणि 11 च्या विस्तार करण्याचं काम सुरु आहे. प्लॅटफॉर्म 10 आणि 11 चा विस्तार आणि तांत्रिक कामांसाठी मध्य रेल्वे विशेष ब्लॉक चालवण्यात येणार आहे. त्यामुळे 1 आणि 1 जून रोजी 36 तासांचा ब्लॉक घेण्यात येईल. परिणामी सुमारे 600 लोकल फेऱ्या रद्द होण्याची शक्यता आहे.
सुमारे 600 लोकल रद्द होण्याची शक्यता
सीएसएमटी स्थानकातील एक्सप्रेस गाड्यांच्या प्लॅटफॉर्मचा विस्तार करण्यासाठी आणि यार्ड नूतनीकरणाच्या कामासाठी ब्लॉक घेण्यात येणार आहे. 1 आणि 2 जून रोजी मध्य रेल्वेवर 36 तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे मुख्य आणि हार्बर मार्गावरील सुमारे 600 लोकल रद्द होण्याची शक्यता आहे.
24 डब्यांच्या गाड्यांसाठी प्लॅटफॉर्मचा विस्तार
सीएसएमटी स्थानकातून उपनगरीय लोकल आणि लांब पल्याच्या मेल एक्स्प्रेस गाड्या चालवल्या जातात. सीएसएमटी स्थानकातील मेल एक्स्प्रेस गाड्यांच्या प्लॅटफॉर्मच्या विस्तारीकरणाचे मध्य रेल्वेने हाती घेतलं आहे. प्लॅटफॉर्म 10 ते 14 चा विस्तार 24 डब्यांच्या गाड्या चालविण्यासाठी करण्यात येणार आहे. हे काम आता शेवटच्या टप्प्यात आहे. मध्य रेल्वेच्या मुख्य लाईन आणि हार्बर मार्गावर दररोज 1 हजार 810 लोकल चालविण्यात येतात. त्यापैकी 1 हजार 299 हून अधिक लोकल सीएसएमटी स्थानकातून ये-जा करतात.
प्रवासी क्षमता 20 टक्क्यांनी वाढणार
मेल आणि एक्सप्रेस गाड्यांचे डब्बे वाढवण्यात येणार आहेत. त्यामुळे सीएसएमटी स्थानकावरील मेल आणि एक्सप्रेस गाड्यांच्या प्लॅटफॉर्मचा विस्तार सुमारे 305 ते 382 मीटरपर्यंत वाढवण्यात येणार आहे. यामुळे प्रवासी वहन क्षमता 20 टक्क्यांनी वाढणार आहे. तसेच यार्ड रिमॉडेलिंग आणि अत्यावश्यक सेवा इमारतींच्या बांधकामासोबत प्रकल्पामध्ये 61 जुने ओव्हर हेड इक्विपमेंट मास्ट्स, 71 सिग्नलिंग आणि टेलिकम्युनिकेशन अडथळे काढण्यात येणार आहेत. यासाठी हा ब्लॉक घेण्यात येणार आहे.
विशेष रात्रकालीन ब्लॉक
दरम्यान, या कामासाठी आधीच मध्य रेल्वेने 17 मेपासून विशेष रात्रकालीन ब्लॉक सुरु केला असून हा ब्लॉत 2 जून पर्यंत कायम राहणार आहे.
वडाळा-सीएसएमटी आणि भायखळा-सीएसएमटी लोकल सेवा बंद
शनिवार, 1 जून रोजी मध्यरात्रीनंतर ब्लॉक सुरू होण्याची शक्यता आहे. या ब्लॉक दरम्यान हार्बर मार्गावरील वडाळा ते ते सीएसएमटी आणि मुख्य मार्गावर भायखळा ते सीएसएमटी लोकल सेवा बंद ठेवण्याचा विचार सुरु आहे. तसेच 100 लांब पल्ल्यांच्या गाड्यांपैकी सुमारे 60 टक्के गाड्यांवरही ब्लॉकमुळे परिणाम होण्याची शक्यता आहे.