US H1B Visa: भारतीयांना व्हिसा देण्यासाठी अमेरिकेनं उचललं 'हे' पाऊल; यूएस व्हिसासाठी विक्रमी अर्ज दाखल
US Visa: कोरोना संकंटानंतर अमेरिकेने व्हिसा संबंधित नियमांमध्ये शिथिलता आणल्यानंतर अमेरिकेन व्हिसासाठी विक्रमी अर्ज प्राप्त झाले आहेत.
मुंबई : कोरोना काळात अमेरिकेने बाहेरुन येणाऱ्या नागरिकांच्या व्हिसासंबंधी अटी कडक केल्या होत्या. आता कोरोनाचा प्रादुर्भाव घटल्यानंतर त्यामध्ये शिथिलता आणण्यात आल्याचं दिसून येतंय. कोरोनाचे संकट ओसरल्यानंतर अमेरिकेत जाणाऱ्या भारतीयांच्या संख्येत विक्रमी वाढ झाली आहे. व्हिसा अर्जदारांची संख्या इतकी वाढली आहे की अमेरिकेच्या वाणिज्य दूतावासातील कर्मचाऱ्यांना सुट्टीच्या दिवशीही काम करावं लागतंय.
मुंबईतील बीकेसी परिसरात असलेल्या अमेरिकाच्या वाणिज्य दूतावासाबाहेर हजारो लोकांची गर्दी जमल्याचं दिसून येतंय. या लोकांकडून अमेरिकेला भेट देण्यासाठी वेगवेगळ्या श्रेणींमध्ये व्हिसासाठी अर्ज करण्यात आला आहे. व्हिसा मिळवण्यासाठी हे अर्जदार अनेक महिने वाट पाहत आहेत. त्यामुळे अमेरिकेच्या वाणिज्य दूतावासाने व्हिसा मुलाखत प्रक्रियेची गती वाढवण्याचा प्रयत्न केला आहे.
कोरोना संकटानंतर भारतातून अमेरिकेत जाणाऱ्या भारतीयांच्या संख्येत विक्रमी वाढ
अमेरिकन वाणिज्य दूतावासाचे प्रमुख जॉन बॅलार्ड म्हणाले की, कोरोना संकटानंतर भारतातून अमेरिकेत जाणाऱ्या भारतीयांच्या संख्येत विक्रमी वाढ झाली आहे. व्हिसा अर्जदारांना अमेरिकेत जाऊन अभ्यास, प्रवास, त्यांच्या कुटुंबीयांची भेट, नातेवाईकांची भेट आणि इतर कार्यक्रमांना हजेरी लावायची आहे. कोरोनाचा कालावधी संपल्यानंतर व्हिसा अर्जदारांची संख्या इतकी वाढली आहे की प्रतीक्षा कालावधी अनेक महिन्यांचा झाल्याचं दिसतोय. जो कमी करण्याचा सातत्याने प्रयत्न केला जात आहे. भारतात व्हिसा मुलाखतीसाठी लागणारा वेळ कमी करण्यासाठी अमेरिका सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.
भारतातील व्हिसा अर्जदारांमध्ये विद्यार्थी, कर्मचारी, अमेरिकेत कायमस्वरूपी स्थायिक झालेले प्रवासी आणि मर्चंट नेव्हीचे क्रू सदस्य यांचा समावेश आहे. व्हिएतनाम, वॉशिंग्टन येथून कॉन्सुलर अधिकाऱ्यांना भारतात परत बोलावले जात आहे जेणेकरून व्हिसा प्रक्रियेत अतिरिक्त मनुष्यबळ वापरता येईल. व्हिएतनाममधील कॉन्सुलर अधिकारी चार्ली यांनी सांगितले की, भारतातील व्हिसा अर्ज व्हिएतनामपेक्षा वेगळा असून व्हिसा अर्जदारांना जास्त वेळ प्रतीक्षा करावी लागणार नाही, यासाठी प्रयत्न केले जातील.
अमेरिकेच्या वाणिज्य दूतावासाचे प्रवक्ते ग्रेग पारडो यांनी एबीपी न्यूजला सांगितले की, H1B, L1 व्हिसाचा कालावधी कमी करण्यात आला आहे. गतवर्षी भारतीयांना सर्वाधिक प्रमाणात यूएस स्टुडंट व्हिसा देण्याचा विक्रम प्रस्थापित केला होता आणि यावर्षीही तेच होण्याची शक्यता आहे. अमेरिकेत येणाऱ्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांच्या बाबतीत भारत आता जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे.
ग्रेग पारडो म्हणाले की, "भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध लक्षात घेता भारतातील व्हिसा प्रक्रिया सुरळीत करणे हे आमचे प्राधान्य आहे. एक काळ असा होता की व्हिसा मुलाखतीचे नियोजन करण्यासाठी एक हजार दिवसांपेक्षा जास्त वेळ प्रतीक्षा करावी लागत होती. परंतु आता एक वगळता कोणत्याही व्हिसा श्रेणीमध्ये प्रतीक्षा वेळ नाही. ज्या लोकांना त्यांच्या व्हिसाचे नूतनीकरण करायचे आहे, जरी ते केस टू केसवर अवलंबून असेल तरीही त्यांना मुलाखतीची आवश्यकता नाही. अमेरिकन दूतावासाच्या वेबसाइटवरून याबाबत अधिक माहिती मिळू शकते."