(Source: ECI/ABP News/ABP Majha)
नाईट लाईफ यशस्वी करण्यासाठी पहाटे 3.30 पर्यंत मद्यपानाची परवानगी द्या : आहार
मुंबईत 26 जानेवारी 2020 पासून नाईट लाईफला सुरुवात झाली आहे. मात्र मद्यविक्रीला रात्री दीड वाजेपर्यंतच परवानगी आहे. नाईट लाईफला अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे नाईट लाईफ यशस्वी होण्यासाठी मद्यपानाची वेळ वाढवण्याची मागणी आहार संघटनेने केली आहे.
मुंबई : मुंबईत नाईट लाईफला अल्प प्रतिसाद मिळाला आहे. नाईटलाईफ यशस्वी करण्यासाठी पहाटे साडेतीनपर्यंत मद्यपान करण्याची परवानगी द्या, अशी मागणी आहार संघटनेने केली आहे. पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून मुंबईत नाईट लाईफ सुरु झाली आहे. 26 जानेवारीपासून नाईट लाईफच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली. परंतु त्याला म्हणावा तसा प्रतिसाद मिळालेला नाही.
मद्यपानाची वेळमर्यादा वाढवण्याबाबत आहार संघटनेचे अध्यक्ष शिवानंद शेट्टी म्हणाले की, "रात्री एक-दोन वाजता कोणी कपडे खरेदी किंवा केवळ खाण्यासाठी बाहेर पडणार नाही. या वेळेत सर्वजण मनोरंजन करण्यासाठी बाहेर पडतील. खाण्यासह मद्यपानही करतील, पण मद्यपान करण्याची मर्यादा दीड वाजेपर्यंतच आहे, तर नाईटलाईफ पहाटे पाचपर्यंत सुरु राहते. मद्यपान करण्याची मर्यादा दीडवरुन साडेतीनपर्यंत वाढवायला हवी." तसंच हार्ड लिकरची वयोमर्यादा 25 वरुन 21 वर्षे करण्यात यावी, अशीही मागणी त्यांनी केली.
Mumbai Nightlife | नाईट लाईफला मंत्रिमंडळाची मंजुरी : आदित्य ठाकरे
"याशिवाय उत्पादन शुल्क विभागाने परवाना फीमध्ये वाढ केल्यामुळे लहान रेस्टॉरंट बंद करण्याची वेळ आली आहे. रेस्टॉरंट चालकांना व्यवसायात झालेली घट आणि महागाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे या वर्षी परवाना शुल्क वाढवू नये," असं आवाहनही शिवानंद शेट्टी यांनी केलं आहे.
26 जानेवारीपासून नाईट लाईफला सुरुवात मुंबईत प्रायोगिक तत्वावर नाईट लाईफ सुरु करण्याचा निर्णय आदित्य ठाकरेंनी घेतला आहे. 26 जानेवारी 2020 पासून नाईट लाईफच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली. नरिमन पॉईंट, काला घोडा, बीकेसी, कमला मिल अशा मुंबईतील अनिवासी भागात नाईट लाईफ सुरु आहे.
दीडनंतर मद्यविक्री केल्यास परवाना रद्द नाईट लाईफमध्ये मुंबईतील अनिवासी भागात असलेली हॉटेल, रेस्टॉरंट, थिएटर आणि मॉल 24 तास सुरु राहणार आहेत. मात्र, पब आणि बारच्या वेळेवर राज्य सरकारने पूर्वीप्रमाणेच मर्यादा ठेवली आहे. त्यामुळे पब आणि बार रात्री दीड वाजता बंद होणार आहेत. तसंच रात्री दीडनंतर मद्यविक्री केल्यास बारचा परवाना दोन वर्षांसाठी रद्द करण्यात येणार आहे.