(Source: Poll of Polls)
मुंबईतील अल्पवयीन मुलीच्या कथित अपहरणाचे गूढ 10 तासात उलगडलं, हैदराबादला सापडली मुलगी
मॉडेलिंगच्या प्रोजेक्टसाठी अल्पवयीन मुलगी हैदराबादला गेली होती. पोलिसांना अवघ्या 10 तासात तरुणीचा शोध लावला आणि सुखरुप तिला मुंबईत आणलं आहे.
मुंबई : मुंबई पोलिसांनी कथित अपहरणाचे गूढ अवघ्या 10 तासात उलगडलं आहे. मुंबईच्या कांदिवली येथील अल्पवयीन मुलगी घरातून बेपत्ता झाली होती. या अल्पवयीन मुलीला पोलिसांनी हैदराबाद येथून सुखरुप परत आणलं आहे. मात्र हे प्रकरण अपहरणांचं नसल्याचं तपासाअंती समोर आलं. अल्पवयीन मुलगी मॉडेलिंग प्रोजेक्टसाठी हैदराबादला गेली होती, ज्याची कुटुंबियांना माहिती नव्हती. आपल्या कुटुंबापासून लपून ती हैदराबादमधील एका हॉटेलमध्ये राहत होती.
मुंबईच्या कांदिवली परिसरातील समता नगर पोलिसांना एका 17 वर्षाच्या अल्पवयीन मुलीचं कथित अपहरण झाल्याची माहिती मिळाली होती. अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याची माहिती मिळताच मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे, अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रवीण पडवळ आणि डीसीपी (झोन 12) स्वामी यांनी मुलीचा शोध घेण्यासाठी पूर्ण ताकद लावली. ह्युमन इंटेलिजेन्स आणि टेक्निकल सपोर्टसह मुंबई पोलिसांनी मुलीचा शोध सुरू केला.
बेपत्ता मुलगी अल्पवयीन होती, त्यामुळे या प्रकरणात अतिरिक्त आयुक्त प्रवीण पडवळ आणि खुद्द डीसीपी स्वामी यांच्या नेतृत्वाखाली 4 टीम तयार करण्यात आल्या. एका टीमने कांदिवलीतील अल्पवयीन मुलीच्या प्रवासाचे सीसीटीव्ही तपासले. तर इतर 2 टीम मोबाईल सर्विलान्सवर नजर ठेवून होत्या. कर्नाटकातील वाडी मार्गे हैदराबादमध्ये या मुलीचे शेवटचे लोकेशन दाखवत होते. तेथे ही तरुणी ग्रीन स्पाईस हॉटेलमध्ये थांबली होती. मुंबई पोलिसांनी ही माहिती मिळताना पोलिसांनी हैदराबाद गाठून मुलीला सुखरुप मुंबईत आणले.
अल्पवयीन मुलगी मुंबईच्या कांदिवली परिसरात राहणाऱ्या एका व्यावसायिकाची मुलगी आहे. मुलीचा शोध लागल्यानंतर काही गोष्टी समोर आल्या. अल्पवयीन मुलीला मॉडेल व्हायचे होते. अनेक ऑनलाईन कोर्सेस सुद्धा ती करत होती. मुलीने मॉडेल व्हावे हे पालकांना मान्य नव्हते. आपल्या मुलीने आईएएस व्हावी अशी पालकांची इच्छा होती. यासाठी पालक मुलीला प्रोत्साहनही देत होते. काही दिवसांपूर्वीच अल्पवयीन मुलीचे घरी तिच्या आई-वडिलांशी भांडण झाले होते. अशारीतीने मुलीचे अपहरण झाले नसून ती मॉडेल बनण्यासाठी हैदराबादला पळून गेल्याचे तपासात उघड झाले.