झोमॅटो गोल्ड सर्व्हिसवर 'आहार'चा बहिष्कार, गोल्ड ग्राहकांसाठी डिलीवरीत येणार अडथळे
झोमॅटो गोल्ड सर्व्हिसवर हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सच्या आहार या असोसिएशनने बहिष्कार टाकला आहे, मात्र झोमॅटो गोल्ड डिलीवरी आणि झोमॅटो गोल्डच्या हॉटेल्समधील ऑफरमध्ये फरक आहे त्यामुळे झोमॅटो गोल्ड ग्राहकांनी संभ्रमित न होता ही बातमी जरुर वाचा...
मुंबई: भारतीय हॉटेल आणि रेस्टॉरंट असोसिएशनने (एएएआर) झोमाटोने झोमाटो गोल्ड ही सर्व्हिस ग्राहकांसाठी सुरु केली होती, ज्याच्या मदतीने ग्राहकांना विशेष ऑफर्स आणि डिस्काऊंट्स त्यांच्या ऑर्डर्सवर मिळतं. या योजनेवर बहिष्कार घालण्याचा आहार असोसिएशनने एकमताने निर्णय घेतला आहे. आज, गुरुवारी मालाडमध्ये एएचएआरने त्यांच्या सदस्यांसह झालेल्या बैठकीत हा निर्णय जाहीर केला.
झोमॅटोच्या अशा सर्व्हिसमुळे हॉटेलचालकांना फटका बसतोय आणि याचा फायदा केवळ अॅग्रीगेटर कंपनीला म्हणजे झोमॅटोलाच होतोय, ही गोष्ट हॉटेलचालकांच्या संघटनेच्या ध्यानी आली. ऑक्टोबरमध्ये झोमॅटोच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत आहारचे अध्यक्ष संतोष शेट्टी यांनी ते या सर्व्हिसच्या विरोधात असल्यामुळे झोमॅटो गोल्ड डिलीवरी पूर्णपणे बंद करण्याची मागणी त्यांनी केली होती. मात्र फुड अॅग्रीगेटर्सकडून याबद्दलची कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.
यासंबंधी मालाडमध्ये आज 300हून अधिक हॉटेल्सच्या मालकांची बैठक झाली, आणि यात झोमॅटो गोल्डवर संपूर्णपणे बहिष्कार टाकण्याचा एकत्रित निर्णय घेतला गेला. आहारच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सर्व विभागीय अध्यक्ष उपस्थित होते आणि त्यांच्यामार्फत तब्बल 8000 सदस्यांना हा संदेश देण्यात आला. 'आहार'चे अध्यक्ष संतोष शेट्टी म्हणाले की "झोमॅटो गोल्ड सर्व्हिसला आमची मान्यता नसल्यामुळे एका महिन्यापूर्वीच आम्ही ती बंद करण्याची मागणी केली होती, याबद्दल कोणताही निर्णय घेतला नसल्याने आता आम्ही यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे."
या बहिष्कारामध्ये कुठेही हॉटेल्समधील सर्व्हिसचा उल्लेख केलेला नाही. त्यामुळे झोमॅटोच्या रेग्युलर हॉटेल सर्व्हिससाठी झोमॅटो गोल्ड ग्राहकांना वापरता येणार आहे मात्र त्यांच्या वितरणाबद्दल म्हणजेच झोमॅटो गोल्ड डिलीवरीसाठी अडथळा निर्माण होणार आहे, त्यामुळे या बहिष्काराबद्दल ग्राहकांनी संभ्रमित होऊ नये हा बहिष्कार केवळ झोमॅटो गोल्ड डिलीवरीसाठी आहे. आहारनेसुद्धा आम्ही वितरण सेवांच्या विरोधात असल्याचं स्पष्ट केलं. त्यामुळे ज्या हॉटेल्सने ही सुविधा सुरु केली आहे ते ताबडतोब ही सुविधा थांबवतील असं आहार असोसिएशनने सांगितलं.