(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मुंबईत गेल्या 60 दिवसात नियम मोडून लोकल प्रवास करणाऱ्या 75 हजार जणांवर कारवाई
अवैधरित्या प्रवास करणार्या एकूण 75 हजार 793 प्रवाशांवर आम्ही कारवाई केली आहे. या कारवाईद्वारे रेल्वेने 3 कोटी 97 लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे.
मुंबई : मुंबईत कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहून रेल्वेने अत्यावश्यक सेवेशी जोडल्या गेलेल्या कर्मचाऱ्यांनाचा लोकल प्रवासाची परवानगी दिली आहे. तरीही असे बरेच लोक आहेत जे तिकिट किंवा बनावट कागदपत्रे बनवून कोणत्याही भीतीशिवाय ट्रेनमध्ये प्रवास करीत आहेत. मुंबईतील मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने अशाच प्रकारच्या प्रवाशांवर कारवाईचा वेग वाढवला आहे. दोन महिन्यांत सुमारे 75 हजार लोकांवर कारवाई केली आहे. या कारवाईत रेल्वेने कोट्यवधी रुपयांचा दंडही वसूल केला आहे.
मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार म्हणाले की, 1 एप्रिल ते 31 मे या कालावधीत अवैधरित्या प्रवास करणार्या एकूण 75 हजार 793 प्रवाशांवर आम्ही कारवाई केली आहे. या कारवाईद्वारे रेल्वेने 3 कोटी 97 लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे. 14 एप्रिलपासून सर्वसामान्यांना रेल्वेने प्रवास करण्याची परवानगी नव्हती आणि त्यानंतर फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना लोकलने प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
यासह 17 एप्रिल ते 21 मे या कालावधीत 1 हजार 61 प्रवाशांवर विनामास्क प्रवास केल्याबद्दल कारवाई करण्यात आली आहे. रेल्वेच्या अधिकृत आकडेवारीनुसार 808 प्रवासी पकडले गेले होते जे बनावट ओळखपत्र बनवून रेल्वेमध्ये प्रवास करत होते. अशा प्रत्येक प्रवाशाकडून 500 रुपयांचा दंड आकारण्यात आला. तपासादरम्यान असेही आढळले आहे की बनावट आयकार्ड बनवणारे बहुतेक प्रवासी बीएमसीचे नाव वापरत होते.