कांजूर मार्ग ब्रिजवर अपघात झाल्याने मोठी वाहतूक कोंडी, चार गाड्या एकमेकांवर धडकल्या
मुंबईतील जेव्हीएलआर ब्रिजवर एकामागोमाग चार गाड्या धडकल्याने ईस्टर्न एक्सप्रेस-वे जाम पाहायला मिळाला. एका गाडीने ब्रिजवर अचानक ब्रेक दाबल्याने त्यामागील 3 गाड्या एकामेकांवर आदळल्या.
मुंबई : मुंबईतील जेव्हीएलआर ब्रिजवर एकामागोमाग चार गाड्या धडकल्याने ईस्टर्न एक्सप्रेस-वे जाम पाहायला मिळाला. रात्री 11.30 वाजताच्या सुमारास एका गाडीने ब्रिजवर अचानक ब्रेक दाबल्याने त्यामागील 3 गाड्या एकामेकांवर आदळल्या. यात 2 लक्झरी बसेसचा समावेश आहे. दोन्ही बसेसचे कॅबिन संपूर्ण उद्ध्वस्त झाले आहे. अपघातात 5 ते 6 प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींना महात्मा फुले रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दोन्ही बसेसचे टायर जाम झाल्याने क्रेनच्या सहाय्याने त्यांना बाजूला करण्यात आली आहे. अपघात ब्रिजवर झाल्याने संपूर्ण ब्रिज वाहतुकीसाठी बंद होता. यात विक्रोळीपासून ते कांजूर मार्ग ब्रिजपर्यंत संपूर्ण वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.
जेव्हीएलआर ब्रिजवर रात्री घडलेल्या या घटनेमुळं वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर झाली होती. या घटनेतील जखमींना महात्मा फुले रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेनंतर अपघात ग्रस्त वाहने रस्त्यावर असल्याने विक्रोळी ब्रिजपासून ईस्टर्न एक्स्प्रेस-वे जाम झाला होता. रात्री ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या नागरिकांना वाहतुकीमुळे प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. रात्री उशीरापर्यंत वाहतूक सुरळीत करण्याचे ट्राफिक पोलीसांचे प्रयत्न सुरु होते.
घाटकोपरमध्ये चाळीसमोरील संरक्षक भिंत कोसळली
घाटकोपरच्या जागृती नगर मेट्रो स्थानकासमोर असलेल्या ऑइल कंपनीच्या मोकळ्या जागेला लागून असलेली नारायण भावसार चाळीसमोरील संरक्षक भिंत काल कोसळली. या ऑइल कंपनी मध्ये बांधकाम सुरू होते. यामुळे हादरे बसून संरक्षक भिंत कोसळली.त्याच्या वर असलेल्या सहा घरांमधील माणसे अडकून पडली होती. तर भिंती खाली येऊन सुनंदा भालेराव या जखमी झाल्या. घटनेची माहिती कळताच तात्काळ घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले. त्यांनी यात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्याचे काम केले.