मुंबईतील 95 टक्के सलून आरोग्य परवान्याविना
मुंबईत जवळपास 1 लाख 60 हजार सलून आणि ब्यूटी पार्लर आहेत. यामध्ये केवळ तीन हजार सलून व्यवसायिकांकडे आरोग्य विभागाचे परवाने आहेत. आरोग्य विभागाकडून सातत्याने सलून आणि ब्यूटी पार्लर व्यवसायाकडे दुर्लक्ष होतं असल्यामुळे अशी परिस्थिती निर्माण झाली असल्याचं संघटनेचं म्हणणं आहे.
मुंबई : मुंबई महानगर पालिकेतील आरोग्य विभागाकडून परवाना देण्यास टाळाटाळ होतं असल्यामुळे तब्बल 95 टक्के व्यवसायिकांकडे आरोग्य विभागाचे परवाने नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे सध्याच्या लॉकडाऊनच्या कठीण काळात सलून व्यवसाय सुरु करण्यास अडचणी येतं असल्याची माहिती सलून ब्यूटी पार्लर असोसिएशनचे मुंबई जिल्हा चिटणीस प्रकाश चव्हाण यांनी दिली आहे. मुंबईत जवळपास 1 लाख 60 हजार सलून आणि ब्यूटी पार्लर आहेत. यामध्ये केवळ तीन हजार सलून व्यवसायिकांकडे आरोग्य विभागाचे परवाने आहेत. आरोग्य विभागाकडून सातत्याने सलून आणि ब्यूटी पार्लर व्यवसायाकडे दुर्लक्ष होतं असल्यामुळे अशी परिस्थिती निर्माण झाली असल्याचं संघटनेचं म्हणणं आहे.
याबाबत बोलताना सलून आणि ब्यूटी पार्लर असोसिएशनचे मुंबई जिल्हा चिटणीस प्रकाश चव्हाण म्हणाले की, आमचा व्यवसाय हा अतिशय महत्त्वाचा व्यवसाय आहे. आम्ही अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांप्रमाणेचं नागरिकांची सेवा करत असतो. परंतू प्रशासनाकडून मात्र कुठेतरी आमच्याकडे दुर्लक्ष होतं आहे. आमच्या व्यवसायिकांना आरोग्य विभागाचा परवाना असणे अतिशय महत्त्वाचं आहे. परंतू मुंबई महानगर पालिकेतील आरोग्य विभागमात्र आम्हांला परवाने देण्यास टाळाटाळ करत आहे. या परवान्यामध्ये जनतेच्या सुरक्षेसंबंधी नियमावली देण्यात आली आहे. त्यामुळे विनापरवाना व्यवसाय करणे आमच्या संघटनेच्या सदस्यांना धोक्याचे झाले आहे. या संदर्भात आमच्या संघटनेने वारंवार मुंबई महानगर पालिकेशी पत्रव्यवहार देखील केला आहे. परंतू अद्याप आमच्या मागणीची मुंबई महानगर पालिकेकडून दखल घेण्यात आलेली नाही.
आरोग्य विभागाच्या परवान्याचे शुल्क तीन हजार रुपये इतके असते. मात्र या परवान्यासाठी मनपा कर्मचाऱ्यांकडून व्यवसायिकांची अडवणूक करून 15 ते 25 हजार रुपये मागितले जात आहेत. याबाबत जेव्हा आम्ही कायद्याची भाषा तेव्हा आरोग्य विभागातील कर्मचारी कागदपत्रांमध्ये त्रुटी दाखवून परवाना घेण्यापासून प्रवृत्त करतात. म्हणूनच महापालिकेला महसुलापासून आणि सलून व्यवसायिकांना आरोग्य विभागाच्या परवान्यापासून दूर राहावं लागत आहे. जर महापालिकेच्या आयुक्तांनी या प्रकरणात लवकरात लवकर लक्ष घातलं तर महापालिकेला 1 लाख 57 हजार सलून व्यवसायिकांकडून आरोग्य परवान्या प्रतिची रक्कम मिळेल. याने थोडीफार का होईना महापालिकेच्या महसुलात वाढ होईल.
सध्या राज्यासह संपूर्ण देशात कोरोना व्हायरसचं महाभयंकर वातावरण आहे. अशा परिस्थितीत लॉकडाऊन जाहिर करण्यात आला आहे. यामुळे मागील साडे तीन ते चार महिन्यांपासून अनेक नागरिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशीच जर परिस्थिती राहिली तर बिकट परिस्थिती निर्माण होऊ शकते. या पार्श्वभूमीवर सलून व्यवसायाला प्रतिबंधित क्षेत्र वगळता सुरु करण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परवानगी दिली आहे. परंतू अशा परिस्थितीत जर सलून व्यवसायिकांकडे परवानेचं नसतील तर नक्कीच त्यांच्यावर करवाई होऊ शकते. त्यामुळे आमच्या असोसिएशनची मागणी आहे की, लवकरात लवकर सलून व्यवसायिकांना आरोग्य विभागाचे परवाने उपलब्ध करून द्यावेत.
संबंधित बातम्या :