मुंबई : सुशांतसिंह राजपूत प्रकरणात मुंबई पोलीस आणि राज्य सरकारवर सोशल मीडियातून निशाणा साधणाऱ्या कंगना रणौत विरोधात 50 कोटींच्या मानहानीचा दावा करण्यात आला आहे. जनमानसांत मुंबई पोलिसांची प्रतिमा मलिन केल्याबद्दल प्रदीप लोणंदकर या एका निवृत्त पोलीस अधिकाऱ्याने कंगनावर फौजदारी आणि दिवाणी असे दोन्ही दावे कोर्टात केले आहेत.


मुंबई पोलिसांविरोधात केलेली टिवटिव कंगनाला चांगलीच महागात पडू शकते. जनमानसांत असलेली मुंबई पोलिसांची प्रतिमा मलिन केल्याबद्दल कंगनानं जाहीर माफी मागावी. तसेच या बेताल वक्तव्यांबाबद्दल तिनं नुकसानभरपाई म्हणून 50 कोटी रूपये पोलीस वेलफेअर फंडमध्ये जमा करावेत. अशी मागणी करत प्रदीप लोणंदकर या निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्तांनी ज्येष्ठ वकील मोहन जयकर यांच्यामार्फत ही याचिका कोर्टात दाखल केली आहे.


कंगना रनौतला केंद्राकडून 'वाय' दर्जाची सुरक्षा


सुशांतसिंह मृत्यू प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनंतर हा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला असला तरी मुंबई पोलिसांच्या तपासावर कोर्टानं कोणतीही टिप्पणी केलेली नाही. त्यामुळे कंगनानं स्वत:ला न्यायव्यवस्थेच्यावर समजत मुंबई पोलिसांवर त्यांच्या आयुक्तांवर अशा पद्धतीनं जहरी टीका करण्याचा काय अधिकार? असा सवालही या याचिकेतून करण्यात आला आहे.


कोरोना सारख्या महामारीचा मुकबला करताना पोलीस स्वत:च्या जीवाची बाजी लाऊन लढत आहेत. कर्तव्य बजावत असताना अनेक पोलिसांना आपले प्राणही गमवावे लागलेत. त्यामुळे सतत जनतेच्या सेवेसाठी झटणाऱ्या पोलिसांची अशाप्रकारे जनमानसांतली प्रतिमा मलिन होणं अत्यंत चुकीचं असल्याचं या याचिकेतून सांगण्यात आलं आहे. सुशांत सिंह प्रकरणात कंगनानं बॉलिवूडमधील बडी नावं, महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्ष, शिवसेनेचे संजय राऊत यासंर्वांविरोधात समाजमाध्यमांवरून जाहीर टीका केली आहे. त्यामुळे येत्या दिवसांत कंगनासमोरच्या अडचणी आणखी वाढण्याची चिन्ह आहेत.


संबंधित बातम्या