मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनाही धमकीचा फोन आला आहे. भारताबाहेरुन हा फोन कॉल आल्याची माहिती समोर आली आहे. शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी रविवारी हा फोन आला होता. गुन्हे विभाग या प्रकरणाचा तपास करत आहे. दरम्यान ही धमकी जीवे मारण्याची आहे की खंडणीबाबत याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
तर कंगना रनौतप्रकरणी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनाही धमकीचा फोन आल्याचं कळतं. कालच त्यांना हा फोन आल्याचं कळतं. हा फोन मात्र भारतातून असल्याचं कळतं.
गृहमंत्री काय म्हणाले होते?
"कंगनाने मुंबई पोलिसांची तुलना माफियांसोबत केली आहे. त्यामुळे तिला महाराष्ट्रात किंवा मुंबईत राहण्याचा अधिकार नाही. मुंबई पोलीस, महाराष्ट्र पोलीस हे सक्षम पोलीस दल आहे. त्याची तुलना स्कॉटलंड यार्ड पोलिसांसोबत केली जाते. अशा पोलिसांविषयी एखादी अभिनेत्री बोलत असेल तर योग्य नाही. त्यांना जर सुरक्षित वाटत नाही तर त्यांनी मुंबईत किंवा महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही," असं गृहमंत्री अनिल देशमुख काही दिवसांपूर्वी म्हणाले होते. यावरुनच त्यांना कालच धमकीचा फोन आला होता.
दरम्यान गृहमंत्रालयाने या प्रकरणी तपासाचे आदेश दिले आहेत. परंतु याबाबत गृहमंत्रालयाने अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. या प्रकरणी मंत्रिमंडळात चर्चा झाल्याचंही कळतं.
कंगनाला मुंबईत राहण्याचा कोणताही अधिकार नाही : गृहमंत्री
मातोश्रीवर धमकीचे कॉल
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या हस्तकाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान 'मातोश्री'वर फोनवरुन धमकी दिल्याची माहिती समोर आली आहे. केवळ मातोश्रीच नाही तर शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावरही धमकीचे फोन आल्याचं कळतं. याप्रकरणी स्थानिक खेरवाडी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. या प्रकरणाचा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग पथक कसून तपास करत आहेत. यासोबतच या प्रकरणाची माहिती सायबर पोलिसांना देखील देण्यात आली आहे. हा कॉल नक्की दुबईवरुन आला होता का? की आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन कोणी खोडसाळपणा तर केला नाही ना? याची देखील माहिती घेण्यात येतं आहे.