मुंबई : मुंबई ही पाकव्याप्त काश्मीर असल्याची टीका बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतने केली होती. तिच्या या वक्तव्याचा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. कंगना रणौतचं डोकं ठिकाणावर नाही तिच्यावर उपचार करणे गरजेचे आहे. तिला जर मुंबई पाकव्याप्त काश्मीर वाटत असेल तर तिने एकदा पाकव्याप्त काश्मीर बघून यावं आणि तिथे चित्रीकरण करावं, मग तिला समजेल मुंबई आणि पाकव्याप्त काश्मीरमधला फरक, असं खासदार संजय राऊत म्हणाले.


सुशांत सिंह राजपूत संशयित आत्महत्येप्रकरणी बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौवत गेली अनेक दिवस ट्विटरच्या माध्यमातून राज्य सरकार, महाराष्ट्र पोलीस आणि बॉलिवूडवर टीका करत आहे. या टीकेला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी उत्तर दिल्यानंतर कंगनाने संजय राऊत यांनी आपल्याला धमकी दिली असल्याचेही ट्वीट केलं होतं.


याला उत्तर देताना संजय राऊत म्हणाले की, "मुंबई पोलिसांचा अपमान केलेला चालणार नाही. मी कोणालाही पोकळ धमक्या देत नाही. मी ॲक्शन करणारा माणूस आहे. कंगना रणौत डोकं ठिकाणावर नाही त्यामुळे तिच्यावर उपचार करणे गरजेचे आहे." "यासंदर्भात राज्यातील आरोग्य विभाग योग्य खबरदारी घेईल," असं संजय राऊत यांनी सांगितले आहे.


मुंबई ही पाकव्याप्त काश्मीर आहे, असं म्हणणाऱ्या कंगनाला इथले काही राजकीय पक्ष समर्थन देत आहेत. तर त्या राजकीय पक्षाने हे विसरता कामा नये की मुंबईकरांच्या मतांवर तुम्ही निवडून आलेला आहात. यापुढे महाराष्ट्रातली आणि विशेषता मुंबईतली मते मागण्याचा तुम्हाला कोणताही अधिकार नसल्याचे संजय राऊत यांनी भारतीय जनता पार्टीला ठणकावून सांगितलं आहे. भाजप कंगनाला 'झाशीची राणी' म्हणतोय हा झाशीच्या राणीचा अपमान आहे, असंही ते म्हणाले.


बॉलिवूड आणि ड्रग कनेक्शन संदर्भात कोणाकडे माहिती असेल तर त्यांनी मुंबई पोलीस आणि गृहविभागाला द्यावी गृहविभाग त्याच्यावर काम करेल. मुंबईत यायचं, इथे खायचं, इथं मोठं व्हायचं आणि मुंबईबाहेर जाऊन मुंबईला वाईट म्हणायचं ही प्रवृत्ती बरी नव्हे. महाराष्ट्रासाठी 106 हुतात्म्यांनी बलिदान दिलं आहे, त्यांचा अपमान होऊ देणार नाही, असंही संजय राऊत यांनी सांगितलं.