मुंबई : अभिनेत्री कंगनाने मुंबई पोलीसांसोबत केलेल्या वक्तव्यानंतर एका वेगळ्या प्रकरणाला सुरुवात झाली. शिवसेना नेते संजय राऊत यांनी कंगनाला मुंबईत भीती वाटत असेल तर तिनं मुंबईत येऊ नये, असं म्हटलं होतं. कंगनाने ती 9 सप्टेंबर रोजी मुंबईत येणार आहे, कोणात हिंम्मत असेल तर अडवून दाखवा, असा इशारा दिला होता. याच पार्श्वभूमीवर गृहमंत्री अमित शहा यांनी कंगनाला 'वाय' सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे. कंगनाने वाय सुरक्षा दिल्याबद्दल अमित शहा यांचे आभार मानले आहे.


कंगना रनौत आपल्या ट्वीटमध्ये म्हणाली, "देशभक्ताचा आवाज कुणीही दाबू शकत नाही. मी अमित शहा यांचे आभार मानते. काही दिवसांनंतर मुंबईला जाण्याचा सल्ला अमित शाह मला देऊ शकले असते. मात्र त्यांनी 'भारत की बेटी' ने दिलेल्या शब्दाचा मान राखला. आमचा स्वाभिमान आणि आत्मसन्मान याची लाज राखली. जय हिंद"





कंगना रनौतची बहिण आणि तिच्या वडिलांनी राज्य सरकारकडे कंगनाला सुरक्षा देण्याची मागणी केली होती. हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकुर म्हणाले की, 'कंगनाची बहिण रंगोली (रंगोली चंदेल)ने काल मला फोन केला आणि माझ्याशी चर्चा केली. कंगनाच्या वडिलांनीही राज्यातील पोलिसांना पत्र लिहून सुरक्षा देण्याची मागणी केली. त्यामुळे मी डीजीपीशी राज्यात अभिनेत्रीला सुरक्षा देण्याचे आदेश दिले.'