2006 Mumbai train bombings : मुंबईच्या लाईफलाईनचा सर्वात वाईट दिवस! 11 जुलै 2006 रोजी सात ठिकाणी बॉम्बस्फोट आणि मायानगरी हादरली
2006 Mumbai train bombings: एकापाठोपाठ एक असे सात बॉम्बस्फोट होत गेले आणि मुंबईच्या लाईफलाईनला एकच धक्का बसला. सगळं उद्ध्वस्त झालं होतं, आज त्या वर्षाला 16 वर्ष पूर्ण झाली आहेत.
2006 Mumbai Local Bomb Blast : रोज लाखो प्रवाशांसाठी लाईफलाईन असलेली मुंबई लोकल 16 वर्षांपूर्वी, 11 जुलै 2006 रोजी हादरून गेली होती. सकाळी आणि संध्याकाळची वेळ ही मुंबई लोकलच्या वर्दळीची. अनेक प्रवासी त्या दिवशी याच वर्दळीतून प्रवास करत होते आणि कदाचित त्यांचा तो शेवटचा प्रवास असेल याची काही जणांनी कल्पना देखील नव्हती. पश्चिम रेल्वेच्या मुंबई लोकलच्या (Mumbai Local) स्थानकांवर एक मागून एक सात स्फोट झाले आणि मायानगरी हादरुन गेली.
या बॉम्बस्फोटात निष्पाप 209 मुंबईकरांनी त्यांचे प्राण गमावले तर सातशे पेक्षा अधिक जण गंभीर जखमी झाले होते. पश्चिम रेल्वेच्या लोकल मार्गावरील माटुंगा रोड, माहिम, वांद्रे, खार रोड, जोगेश्वरी, बोरीवली आणि मीरा रोड या स्थानकांवर एक पाठोपाठ एक असे सात स्फोट झाले होते.
या बॉम्बस्फोटात (Bomb Blasting) 209 मुंबईकरांचा बळी गेला होता तर 714 जण जखमी झाले होते. जशी या बॉम्बस्फोटाची माहिती मिळाली त्यानंतर तात्काळ पश्चिम रेल्वेवरील वाहतूक बंद करण्यात आली होती. तेव्हा हजारो प्रवासी अडकले देखील होते. तर प्रशासनाकडून मात्र शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देखील देण्यात आली होती.
पण मुंबईच्या लोकलच्या मदतीला त्यावेळी मुंबईची दुसरी लाईफलाईन बेस्ट बस धावून आली होती. परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन बेस्टने त्यांच्या सर्व बसेस प्रवाशांच्या सेवेसाठी हजर केल्या होत्या. महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी मृतांच्या नातेवाईकांना मदत देखील जाहीर केली होती. तर तत्कालीन रेल्वेमंत्री लालू प्रसाद यादव यांनी रेल्वेतर्फे मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली होती.
बॉम्बस्फोटाचा रचला होता कट
या बॉम्बस्फोटासाठी ‘सिमी’ आणि ‘लष्कर’ या अतिरेकी संघटनांनी योजनाबद्धरीत्या तयारी करुन हे स्फोट घडवून आणल्याचं म्हटलं जातं. या घटनेनंतर एटीएसनं 13 जणांना अटक केली होती. एटीएसकडून अटकेतल्या 13 आणि फरार 15 आरोपींवर मोक्का कायद्यांतर्गत आरोपपत्र दाखल करण्यात आलं होतं.
11 सप्टेंबर 2015 रोजी खास न्यायालयाने 13 आरोपींना दोषी ठरवले आणि 30 सप्टेंबर 2015 रोजी न्यायालयाने कमाल अहमद अन्सारी, मोहंमद फैजल शेख, एहत्तेशाम सिद्दिकी, नावेद हुसेन खान,असिफ खान या पाच आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली. तर तन्वीर अहमद अन्सारी, मोहंमद माजिद शफी, शेख आलम शेख, मोहंमद साजिद अन्सारी, मुझ्झमील शेख,सोहेल मेहमूद शेख, जमीर अहमद शेख या सात आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली.
मुंबईकरांसाठी आणि मुंबईच्या लाईफलाईनसाठी आजही हा दिवस फार भयाण क्षणांची आठवण करुन देतो. पण यानंतर मुंबईकरांचं स्पीरिट मात्र जराही कमी झालं नाही आणि या दुर्घटनेनंतरही मुंबई जशी होती तशी पुन्हा धावायाला लागली.