MNS 14th Anniversary | मनसेचा आज चौदावा वर्धापन दिन, नवी मुंबईत जय्यत तयारी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज चौदावा वर्धापन दिन आहे. मनसेने झेंडा आणि अजेंडा बदलल्यानंतरचा हा पहिलाच वर्धापन दिन आहे. नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यंदा वर्धापन दिनाचा कार्यक्रम वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात आयोजित करण्यात आला आहे.
नवी मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेना अर्थात मनसेचा आज (9 मार्च) चौदावा वर्धापन दिन आहे. आगामी काळातील नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका लक्षात घेत यंदा पहिल्यांदाच मनसेचा वर्धापनदिन वाशी येथील विष्णूदास भावे नाट्यगृहात पार पडणार आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे या वेळी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार असून महाराष्ट्र विकास आघाडी सरकारच्या शंभर दिवसांवर राज ठाकरे काय बोलणार याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.
झेंडा आणि अजेंडा बदलल्यानंतरचा मनसेने हा पहिलाच वर्धापन दिन आहे. वर्धापन दिनासाठी वाशीसह संपूर्ण नवी मुंबई परिसरात जय्यत तयारी करण्यात आली आहे. नवी मुंबईचे मनसे अध्यक्ष गजानन काळे यांच्यावतीने ठिकठिकाणी मोठमोठे बॅनर देखील लावण्यात आले आहेत. सकाळी दहा वाजता रॅलीने या कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे. रॅलीमध्ये राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे, संदीप देशपांडे, अमेय खोपकर आणि नवी मुंबईचे अध्यक्ष गजानन काळे सहभाग घेणार आहेत. त्यानंतर अकराच्या सुमारास कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. कार्यक्रमासाठी राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरे, मुलगी उर्वशी ठाकरे आणि मधुवंती ठाकरे देखील उपस्थित राहणार आहेत.
सरकारवर वचक ठेवण्यासाठी मनसेचं 'शॅडो कॅबिनेट' निश्चित; राज ठाकरे उद्या घोषणा करणार
शॅडो कॅबिनेटची घोषणा होणार? वर्धापन दिन कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर काल (8 मार्च) मनसे नेते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. त्यात महाविकास आघाडी सरकारच्या कारभारावर लक्ष ठेवण्यासाठी मनसेचं शॅडो कॅबिनेट निश्चित झाल्याची माहिती मिळत आहे. या शॅडो कॅबिनेटमध्ये बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे, अभिजीत पानसे, नितीन सरदेसाई आणि अमेय खोपकर यांच्यासह 28 जणांचा समावेश करण्यात आल्याचं समजतं. दरम्यान राज ठाकरे आज या शॅडो कॅबिनेटची अधिकृत घोषणा करण्याची शक्यता आहे.
शॅडो कॅबिनेट स्थापन करणार असल्याची घोषणा बाळा नांदगावकर यांनी 23 जानेवारी रोजी मुंबईतील मनसेच्या महाअधिवेशनात केली होती. त्यानुसार ठाकरे सरकारवरील कारभारावर लक्ष ठेवण्यासाठी खातेनिहाय मनसे नेत्यांना जबाबदारी दिली जाईल. प्रत्येक नेत्याकडे मिळालेल्या संबंधित खात्यातील कारभार आणि त्रुटी शोधून सरकारला जाब विचारण्याचं काम असेल. तरी, मनसेच्या या शॅडो कॅबिनेटमध्ये कोणाची वर्णी लागते हे पाहणं महत्त्वाचं असेल.
... जेव्हा मनसे पदाधिकाऱ्यांना राज ठाकरे स्वतः 'आर्म बँड' बांधतात मनसेची स्थापना राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाची स्थापना केली. त्याआधी ते शिवसेनेत सक्रिय होते. अखिल भारतीय विद्यार्थी सेनेची राज्यव्यापी जबाबदारी त्यांच्या खांद्यांवर होती. काका बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून आलेला राजकीय वारसा त्यांच्याकडे होता. मात्र बाळासाहेबांनी शिवसेनेची धुरा पुत्र उद्धव ठाकरेंकडे सोपवल्यानंतर राज ठाकरे पक्षातून बाहेर पडले. मनसेच्या स्थापनेनंतर मराठी भाषा आणि मराठी तरुणांच्या रोजगाराचा मुद्दा घेत आंदोलनं केली. पहिल्याच म्हणजे 2009च्या विधानसभा निवडणुकीत मनसेचे 13 आमदार निवडून आले. त्यानंतर पक्षाला गळती लागली. 2014च्या विधानसभा निवडणुकीत एकच आमदार विजयी झाला. मात्र पुढे राज ठाकरे यांनी अनेकदा भूमिका बदलल्या. आधी मोदींना पाठिंबा दिला, नंतर त्यांच्याविरोधात प्रचार केला. मग काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत पत्रकार परिषदेतही दिसले. 2019च्या निवडणुकीत सक्षम विरोधी पक्षासाठी मत मागितलं, मात्र यावेळीही मनसेचा एकच आमदार निवडून आला. यानंतर राज ठाकरे यांनी हिंदुत्त्वाची वाट धरत पक्षाचा झेंडा आणि अजेंडाही बदलला.