Mumbai Rain: पहिल्या पावसातच मुंबई तुंबली, अनेक शहरांची दाणादाण; ठाणे, रायगड रत्नागिरीसह पाच जिल्ह्यांना रेड अलर्ट; प्रशासनालाही सतर्कतेचा इशारा
Mumbai Rains Updates: मुंबईसह पाच जिल्ह्यांमध्ये आज रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. यात ठाणे, रत्नागिरी, मुंबई, रायगड, सातारा या ठिकाणी आज रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Mumbai Rains Updates: राज्यासह मुंबईतही मान्सूनने तुफानी एन्ट्री केली असून पहिल्याच पावसात मुंबापुरी जलमय झाल्याचे पाहायला मिळाले आहे. मुंबई आणि उपनगरातील अनेक रस्ते, रेल्वे वाहतूकसेवा आणि जनजीवन विस्कळीत झाल्याचे बघायला मिळाले आहे. दरम्यान मुंबईत (Mumbai Rains Updates) सकाळी 9 ते 10 दरम्यान ढगफुटीसदृश्य पाऊस पडल्याचे बोलले जात आहे. मुंबई महापालिकेच्या काही ऑटोमॅटिक वेदर स्टेशनवर एका तासात 80 मिमीहून अधिक पावसाची नोंद करण्यात आली आहे. तर दक्षिण मुंबईतील एका स्टेशनवर 104 मिमी पावसाची नोंद करण्यात आलीय. मात्र, आयएमडीनं सकाळी 9 ते 10 दरम्यान झालेला पाऊस हा ढगफुटी नसल्याचं सांगितलं आहे. आयएमडीकडून दक्षिण मुंबईतील त्या एका तासातील पाऊस हा अतिमुसळधार असल्याचं स्पष्ट करण्यात आलेलं आहे.
दरम्यान आज मुंबईसह पाच जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. यात ठाणे, रत्नागिरी, मुंबई, रायगड, सातारा या ठिकाणी आज रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर उद्या रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापुर, कोल्हापुर घाट परिसर, पुणे घाट परिसरात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. परिणामी संभाव्य इशारा लक्ष्यात घेता या सर्व जिल्ह्यातील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले आहे. या सर्व जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसासह विजेचा कडकडाट होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. तीमुळे नागरिकांसह सर्व प्रशासनालाही सतर्क राहण्याचे आदेश मंत्रालयातून देण्यात आले आहे.
पावसाची विश्रांती, अंधेरी सबवे वाहतुकीसाठी खुला
पुढे आलेल्या माहितीनुसार, मुंबईच्या पश्चिम उपनगरात मागील एक तासापासून पावसाने विश्रांती घेतली आहे. सकाळी जोरदार पाऊस सुरू असल्यामुळे अंधेरी सबवे मध्ये पाणी भरलं होतं. मात्र मागील 1 तासापासून पाऊस बंद झाल्यामुळे अंधेरी सबवे मधून पाणी निघालं आहे. सबवेमधून पाणी निघाल्यामुळे अंधेरी सबवे आता वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला आहे.
मुंबई पाठोपाठ पुण्यातही पावसाची तुफानी एन्ट्री
मुंबई पाठोपाठ पुण्यातही पावसाने हजेरी लावली आहे. पुण्यातील विधानभवन परिसर, कोथरुड, कर्वे नगर, पुणे स्टेशन , शिवाजी नगर परिसरात पावसाच्या सरी बरसत आहेत. पुण्यात घाट माथ्यावर ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे तर पुणे शहरासाठी येलो अलर्ट हवामान खात्याकडून देण्यात आलाय
इतर महत्वाच्या बातम्या
























