(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nagpur Crime : दोघात तिसरा आला अन् होत्याचं नव्हतं झालं! अल्पवयीन प्रेयसीवर आधी अत्याचार नंतर जीव घेतला
धीरज याने दुसऱ्यासोबत संबंध ठेऊ नको, म्हणून मुलीला सांगितले, मात्र मुलीने मी बोलणार काहीही कर असे सांगितले. यावरून भांडण झाले अन् धीरजने तिच्या गळ्यावर चाकूने वार केले. यात तिचा मृत्यू झाला.
नागपूरः दहावीत शिकणाऱ्या मुलीचे काही महिन्यांपासून आरोपी धीरज सुरेश शेंडे यांच्यासोबत प्रेमसंबंध होते. अधून-मधून ते एकांतात भेटत होते. ती मुलगी दुसऱ्या मुलासोबत नेहमी बोलत होती. यावरुन त्यांच्यात भांडण झाले. आणि रागाच्या भरात धीरजने मुलीचा खून केला.
धीरज सुरेश शेंडे (वय 19, रा, भामेवाडा, मौदा) असे नराधमाचे नाव असून त्याने भामेवाड्याच्या जंगलात अल्पवयीन प्रेयसीला नेऊन खून केला. खून करण्यापूर्वी त्याने तिच्यावर अत्याचार केला. अल्पवयीन मुलगी शहरातील ट्यूशन क्लासलाजाते म्हणत घरून सकाळी साडेआठ वाजता निघून गेली. ट्यूशनवरुन परत न आल्याने चिंतेत असलेल्या आईने याची माहिती वडिलांना दिली. मैत्रिणीकडे गेली असेल म्हणून तिच्या मैत्रिणींना विचारणा करण्यात आली. मात्र, मैत्रिणींनी धीरज शेंडेसोबत दुचाकीवर बसून निघून गेल्याची माहिती दिली. आईवडिलांनी सर्वत्र शोधाशोध केल्यानंतर धीरज आणि मुलगी सापडली नाही. त्यामुळे रात्री बाराच्या सुमारास मौदा पोलिसांत तक्रार दाखल करण्यासाठी गेले. तेव्हा धीरज स्वतःच पोलिस ठाण्यात हजर असल्याचे दिसून आले.
त्याने प्रेयसीचा खून केल्याची कबुली दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार धीरजने आपल्या प्रेयसीला दुचाकीवर बसून कुही तालुक्यातील साळवा गावाच्या दिशेने नेले. भामेवाड्याच्या जंगलात नेऊन तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. धीरज याने दुसऱ्यासोबत संबंध ठेऊ नको, म्हणून तिला धमकावले. तर मुलीने दुसऱ्यासोबत बोलणार असल्याचे सांगितले. यावरून दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. रागाच्या भरात धीरज याने तिच्या गळ्यावर चाकूने वार केले. नंतर पोटावर सपासप वार केले. यात तिचा मृत्यू झाला. मृत्यू झाल्याची खात्री पटल्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने तिचा मृतदेह भामेवाड्याच्या जंगलात फेकून दिला. रात्रीच धीरज मौदा पोलिस ठाण्यात हजर झाला. त्याने खून केल्याची कबुली जबाब दिला. याच दरम्यान मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार करण्यासाठी अल्पवयीन मुलीचे आईवडील पोलिस ठाण्यात गेले होते. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर, अप्पर पोलिस अधीक्षक राहुल माकनीर, उपविभागीय पोलिस अधिकारी मुख्तार बागवान आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक हेमंतकुमार खराबे यांच्या मार्गदर्शनात एपीआय सतीश सोनेकर, पीएसआय अरविंद मोहोड, ठाकूर, यंगलवार, संजय बरोदिया, प्रफुल्ल रंधई, केशव फड यांनी केला.
दुसऱ्या दिवशी दिसले घटनास्थळ
धीरज रात्री बाराच्या सुमारास पोलिस ठाण्यात दाखल झाला. त्याने खून केल्याची कबुली जबाब दिला. त्यानंतर पोलिस त्याला घटनास्थळाकडे घेऊन गेले. मात्र रात्री अंधार असल्याने तो प्रेयसीचा मृतदेह लपवलेली जागा दाखवू शकला नाही. त्यामुळे पोलिस भामेवाड्याच्या जंगलातून परत आले. नंतर सकाळी त्याला घटनास्थळी घेऊन गेले.
दोघांत तिसरा आल्याने भांडण
गेल्या सहा महिन्यापासून धीरज आणि अल्पवयीन मुलीचे प्रेमप्रकरण सुरु होते. तसेच ती मुलगी दुसऱ्या मुलासोबत नेहमी बोलत असे. यावरून त्यांचे भांडण झाले. दुसऱ्या मुलासोबत संबंध ठेऊ नको, असे धीरजने मुलीला बजावले. मात्र, तिने दोघांसोबतही बोलणार असल्याचे सांगितले. यावरून त्यांच्यात भांडण झाले आणि रागाच्या भरात धीरजने मुलीचा खून केला.