मुंबई : कोल्हापुरातील एखाद्या आमदाराने राजीनामा देऊन मी निवडणूक लढवली तर मी तेथून निवडून येऊन दाखवेल. निवडून नाही आलो तर हिमालयात जाईल. या चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावर बोलाताता ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटलं की, कोल्हापुरात भाजपचा एकही आमदार नाही, त्यामुळे कुणी राजीनामा द्यायचा प्रश्न नाही. आम्ही तीन पक्ष एकत्र आहोत, त्यामुळे त्यांनी येथून निवडणूक लढवली तर त्यांचा डिपॉझिट जप्त होईल. त्यामुळे चंद्रकांत पाटलांचा जन्म हिमालयात जाण्यासाठी झाला आहे, असा टोलाही हसन मुश्रीफ यांनी लगावला. एबीपी माझाच्या 'माझा महाराष्ट्र माझं व्हिजन' या कार्यक्रमात ते बोलत होते.


चंद्रकांत पाटील जर पवार साहेबांवर पीएचडी करत असतील तर आम्हाला आनंदच


मी शरद पवारांवर पीएचडी करतोय या चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरही त्यांनी भाष्य केलं. हसन मुश्रीफ म्हणाले की, शरद पवार देशाचे आणि राज्याचे ज्येष्ठ नेते आहेत. 50 वर्षांहून अधिक त्यांचा राजकीय प्रवास आहे. देशातील आणि राज्यातील असा एकही प्रश्न नसेल जो त्यांना माहित नाही. त्यांनी उभी हयात जनतेच्या हितासाठी, विकासासाठी घालवली आहे. त्यामुळे चंद्रकांत पाटील जर पवार साहेबांवर पीएचडी करत असतील तर आम्हाला आनंदच आहे.


विरोधकांच्या टीकेमुळे महाविकास आघाडी घट्ट झाली


मराठा महिला मुख्यमंत्री व्हावी या आशिष शेलार यांच्या वक्तव्यावर बोलताना हसन मुश्रीफ म्हणाले की, विनोद तावडे आणि पंकजा मुंडे यांच्यावर भाजपने महत्त्वाची जबाबदारी सोपवली. मात्र यामध्ये आशिष शेलार यांना कुठेही स्थान दिलं गेलं नाही त्यामुळे कदाचित नाराज असतील. या नाराजीतून त्यांनी हे वक्तव्य केलं असेल. चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य दिशाभूल करणारं आहे. महाविकास आघाडीचं सरकार अस्थिर कसं होईल हा प्रयत्न भाजपच्या काही नेत्यांकडून होत आहे. मात्र आम्ही तिन्ही पक्ष विरोधकांच्या टीकेमुळे आणखी घट्ट झालो आहोत, असं हसन मुश्रीफ यांनी म्हटलं.


भाजपकडून स्वायत्त संस्थांचा राजकारणासाठी वापर


प्रताप सरनाईक यांनी कंगना रनौत आणि अर्णब गोस्वामी यांच्यावर हक्कभंग ठराव मांडला होता. म्हणूनच सरनाईक यांच्यावर ईडीची कारवाई झाली. भाजपच्या नेत्यांची चौकशी का होत नाही? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. भाजपकडून सूडाचं राजकारण होत आहे. देशातील या स्वायत्त संस्थांचा राजकारणासाठी वापर होत आहे, असंही हसन मुश्रीफ यांनी म्हटलं.


महत्त्वाच्या बातम्या :