Majha Maharashtra Majha Vision 2020 : "51 हजार कोटींच्या सामंजस्य करारातून नवे एक लाख रोजगार तयार होत आहेत. नवी मुंबईत डेटा सेंटर सुरु होत आहेत. माहिती तंत्रज्ञानाचे उद्योग सुरु होत आहेत. रायगडमध्ये औषध कंपन्या सुरु होत आहे. औरंगाबादमध्येही अन्नप्रक्रिया सुरु होत आहे. पुण्यातील हिंजवडी, चाकण, पनवेलमध्येही उद्योग येत आहेत," अशी माहिती राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी दिली. एबीपी माझाच्या 'माझा महाराष्ट्र माझं व्हिजन' कार्यक्रमात ते बोलत होते.
सुभाष देसाई म्हणाले की, "उद्योगविश्व सुरु होत आहे, 70 आणि 80 टक्क्यांनी उद्योगांची चक्र सुरु झाली आहेत. काही उद्योग संपूर्ण क्षमतेने सुरु झाले आहेत. जुन्या उद्योगांसह नवे उद्योग सुरु करण्याचेही प्रयत्न सुरु आहेत. रोजगाराची चिंता घराघरात आहेत. सामंजस्य करारावर नजर टाकली तर सर्वत्र उद्योग येत आहेत. त्याच्या माध्यमातून रोजगार वाढावा असा आमचा प्रयत्न आहे. आम्ही 20-30 कंपन्यांसोबत 51 हजार कोटींचे सामंजस्य करार केले, त्यामधून नवे एक लाख रोजगार तयार होत आहेत.
"जीएसटीचा वाटा केंद्र सरकारने द्यायला हवा. आपत्तीच्या काळात राज्यांना मदत करणं हे राज्याप्रमाणे केंद्राचंही कर्तव्य आहे. केंद्र आणि राज्य यांनी एकत्रितपणे नुकसानग्रस्तांना आणि अडचणीत असणाऱ्यांना मदत करणं गरजेचं आहे," असंही सुभाष देसाई म्हणाले.
'मला नोटीस शक्यता नाही'
काही दिवसांपूर्वीच शिवसेनेचे नेते प्रताप सरनाईक यांच्या घरी आणि कार्यालयावर ईडीने शोधमोहीम राबवली. शिवाय शिवसेनेच्या काही नेत्यांनाही नोटीस पाठवली जाणार असल्याचीही चर्चा रंगली होती. त्याविषयी विचारलं असता सुभाष देसाई म्हणाले की, "मला नोटीस आलेली नाही, नोटीस येण्याची शक्यताही नाही. आजच मुख्यमंत्र्यांनी 'सामना'तल्या मुलाखतीत आपली भूमिका मांडली. आम्ही नोटिसांना घाबरणार नाही आणि जशास तसा समाचार घेतला जाईल, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. आम्ही काम करत राहणार आहोत. कर नाही त्याला डर नाही."
'विरोधकांच्या वक्तव्याची धास्ती वाटत नाही'
एकीकडे महाविकास आघाडी सरकारची वर्षपूर्ती होत असताना विरोधी पक्षातील बरेच नेते वारंवर सरकार कोसळणार असल्याची वक्तव्य करत आहेत. विरोधकांच्या वक्तव्यांची धास्ती वाटत नाही, असं सुभाष देसाई म्हणाले. "सुरुवातीपासूनच विरोधक असे दावे करत आहेत. अगदी अकरा दिवसात सरकार पडेल असंही सांगितलं होतं. आयारामांची भरती झालीय. त्यांना पक्षात थांबवण्यासाठी अशी आश्वासनं द्यावी लागतात. मी पुन्हा येईन असं म्हणता म्हणता एक वर्ष गेलं, पाच वर्षेही कधी जातील ते कळणार नाही," अशा शब्दात सुभाष देसाई यांनी विरोधकांवर भाष्य केलं.
'महाराष्ट्रातील सरकारमधून लोकशाहीचं वेगळं रुप पाहायला मिळालं'
सुभाष देसाई यांनी यावेळी काँग्रेसच्या बाजूने भूमिका मांडली. "आमच्यासमोर होते ते आता आमच्या बाजूला आहेत आणि आमच्या बाजूला होते ते आमच्याविरोधात आले आहेत. यामधून लोकशाहीचं वेगळं रुप पाहायला मिळालं. लोकशाहीत विरोधक असायलाच हवे. आम्ही काँग्रेससोबत गेलो हे खूपच धक्कादायक आहे, असं म्हटलं गेलं. पण ते फार आश्चर्यकारक नाही. ते आपल्या देशातीलच पक्ष आहेत. भाजपने काँग्रेसमुक्त भारत हे म्हणणं चुकीचं आहे. असं ध्येय बाळगणं अतिशय चुकीचं आहे. यापूर्वी काँग्रेसच्या ज्या ज्या गोष्टी योग्य वाटल्या त्याला पाठिंबा दिला आहे." असं सुभाष देसाई म्हणाले.
दिवसभर दिग्गज नेत्यांचं महाराष्ट्रासाठीचं व्हिजन फक्त एबीपी माझावर
महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारला सत्तेत येऊन एक वर्ष पूर्ण होत आहे. विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात सत्तांतर झालं आणि एक नवी आघाडी उदयास आली. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं महाविकास आघाडी सरकार सत्तेत आलं. 28 नोव्हेंबर 2019 रोजी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
एबीपी माझाच्या माझा महाराष्ट्र माझं व्हिजन या कार्यक्रमात यानिमित्ताने महाराष्ट्रातील गेल्या वर्षभरातील सरकारच्या कामाचा आढावा आणि महाराष्ट्राच्या भविताव्याविषयीचं सरकारच्या धोरणांबाबत जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. सरकारमधील मंत्र्यांसह विरोधी पक्षाच्या नेत्यांचं महाराष्ट्रासाठी व्हिजन काय हे आज दिवसभरात जाणून घेण्याचा एबीपी माझाचा प्रयत्न आहे.
ऊर्जामंत्री नितीन राऊत, उद्योग मंत्री सुभाष देसाई, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, आरोग्यमंत्री राजेश टोपे, अशोक चव्हाण, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील आणि आदित्य ठाकरे या नेत्यांचा सहभाग असणार आहे. हे नेते महाराष्ट्रासाठीचं त्याचं व्हिजन मांडणार एबीपी माझाच्या 'माझा महाराष्ट्र माझं व्हिजन' या कार्यक्रमात मांडणार आहेत.
'माझा महाराष्ट्र माझं व्हिजन' हा कार्यक्रम आज सकाळी दहा वाजल्यापासून एबीपी माझावर पाहता येणार आहे. एबीपी माझाच्या अधिकृत यू-ट्यूब चॅनल, फेसबुक पेजवर प्रेक्षकांना हा कार्यक्रम लाईव्ह पाहता येणार आहे.