#माझामहाराष्ट्रमाझंव्हिजन : 'महाविकास आघाडी सरकारचं काम मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या मार्गदर्शनाखाली योग्य पद्धतीने सुरु आहे. महाविकास आघाडी सरकारने सर्वांना अशक्य वाटणारी शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली. नागपूर अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला आणि ताबडतोब त्याची अंबलबजावणीही केली. त्यानंतर आलेल्या चक्रीवादळातही सरकारने मदत जाहीर केलं. कोरोना काळात घेतलेल्या अनेक निर्णयांमुळे कटुता आली, पण लोकांच्या आरोग्यासाठी मुख्यमंत्र्यांनी ते निर्णय घेतले'; असं एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडी सरकाने केलेल्या कामांसंदर्भात बोलताना सांगितलं. ते एबीपी माझाच्या 'माझा महाराष्ट्र माझं व्हिजन' या कार्यक्रमात बोलत होते.


'कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्याची आर्थिक घडीही विस्कटली आहे. एकंदरीत संपूर्ण जग कोरोनाशी लढत आहे. पण आपल्या राज्यात ही घडी सावरण्यात आपल्याला यश मिळत आहे. कोरोना काळातही अनेक उद्योजकांनी महाराष्ट्रात गुंतवणूक केली आहे.', असंही त्यांनी सांगितलं.


कांजूर कारशेडची जागा ही राज्य सरकारचीच : एकनाथ शिंदे


'मेट्रो कारशेड आरेमध्ये होत होतं, पर्यावरणप्रेमींच्या आंदोलनानंतर ते कांजूरला हलवण्याचा निर्णय घेतला. विभागिय आयुक्त, कलेक्टर, तत्कालीन महसूल मंत्री यांनी सॉलपॅन कमिशनच्या विरोधात त्यांचं अपील फेटाळून लावलं. त्यावेळी मदान समिती जी होती, त्यांनीदेखील त्यावेळी सांगितलं होतं की, कांजूरमार्ग ही कारशेडसाठी उत्तम जागा आहे. असं असून देखील मेट्रो कारशेड आरेमध्ये हलवण्याचा निर्णय का घेण्यात आला? त्यामुळे एकदा झालेली चूक तशीच ठेवायची की, ती दुरुस्त करायची, हाच विचार मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केला.


मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकार ताकदीनं लढतंय : एकनाथ शिंदे


'मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे. यासंदर्भात माझी सर्वांना विनंती आहे की, कोणीही राजकारण करु नका. पूर्वीच्या सरकारमध्ये आम्हीही होतो. मराठा आरक्षण समितीत मी महत्त्वाचं काम केलेलं आहे. जे मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टाने खंडपीठाकडे पाठवण्याची विनंती केली, ती पाठवत असताना आरक्षणाला अंतरिम स्थगिती देण्यात आली'; असं नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. पुढे बोलताना ते म्हणाले की, 'मराठा आरक्षणाप्रमाणेच तमिळनाडूचाही सारखाच विषय होता. त्याचसोबत केंद्र सरकारने ईजब्ल्यूएस 10 टक्क्याचं आरक्षण आहे, ते खंडपीठाकडे पाठवताना अंतरिम स्थगिती दिली नाही. मग मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती देण्याचा जो अनपेक्षित निर्णय झाला आहे, तो आपल्या सर्वांना माहितच आहे.'


'आता मात्र केंद्र सरकार, राज्य सरकार यांनी आमची जबाबदारी नाही, तुमची आहे, असं न करता एकत्र येणं गरजेचं आहे. मराठा आरक्षणाची जी लढाई आहे, ती राज्य सरकार पूर्ण ताकदीनं लढत आहे. जे वकील पूर्वी होते, तेच वकील मराठा आरक्षणाची लढाई लढत आहेत. त्यामुळे मराठी आरक्षणासाठी ही लढाई राज्य सरकार संपूर्ण ताकदीनं लढत आहे.', असं एकनाथ शिंदे म्हणाले.


पाहा व्हिडीओ : कांजूर कारशेडची जागा ही राज्य सरकारचीच : एकनाथ शिंदे



दिवसभर दिग्गज नेत्यांकडून महाराष्ट्राचं व्हिजन फक्त एबीपी माझावर


नव्या सरकारला सत्तेत येऊन एक वर्ष पूर्ण होतंय. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारला सत्तेत येऊन एक वर्ष पूर्ण होत आहे. विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात सत्तांतर झालं आणि एक नवी आघाडी उदयास आली. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं महाविकास आघाडी सरकार सत्तेत आलं. 28 नोव्हेंबर 2019 रोजी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.


एबीपी माझाच्या माझा महाराष्ट्र माझं व्हिजन या कार्यक्रमात यानिमित्ताने महाराष्ट्रातील गेल्या वर्षभरातील सरकारच्या कामाचा आढावा आणि महाराष्ट्राच्या भविताव्याविषयीचं सरकारच्या धोरणांबाबत जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.


ऊर्जामंत्री नितीन राऊत, उद्योग मंत्री सुभाष देसाई, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, आरोग्यमंत्री राजेश टोपे, अशोक चव्हाण, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील आणि आदित्य ठाकरे या नेत्यांचा सहभाग असणार आहे. हे नेते महाराष्ट्रासाठीचं त्याचं व्हिजन मांडणार एबीपी माझाच्या 'माझा महाराष्ट्र माझं व्हिजन' या कार्यक्रमात मांडणार आहेत.


'माझा महाराष्ट्र माझं व्हिजन' हा कार्यक्रम आज सकाळी दहा वाजल्यापासून एबीपी माझावर पाहता येणार आहे. एबीपी माझाच्या अधिकृत यू-ट्यूब चॅनल, फेसबुक पेजवर प्रेक्षकांना हा कार्यक्रम लाईव्ह पाहता येणार आहे.


महत्त्वाच्या बातम्या :