#माझामहाराष्ट्रमाझंव्हिजन : वीज बिलमाफीचं क्रेडिट शिवसेनेनं घ्यायचं की राष्ट्रवादीनं, यात नितीन राऊतांचा बळी गेलाय, असं म्हणत माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाविकास आघाडी सरकावर निशाणा साधला आहे. तसेच आपासातल्या राजकारणात कोणी क्रेडिट घ्यावं, यामध्ये दीड कोटी जनतेची फसवणूक करताय हे चुकीचं आहे. असंही ते बोलताना म्हणाले. एबीपी माझाच्या 'माझा महाराष्ट्र माझं व्हिजन' या कार्यक्रमात ते बोलत होते.
माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे बोलताना म्हणाले की, 'राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि ऊर्जामंत्री या तिघांनी एकत्र चर्चा करुन वाढीव वीज बिल माफिबाबत घोषणा करायला हवी होती. जोपर्यंत महाराष्ट्र सरकार वीज बिल कंपन्यांना वीज बिल माफी करण्याएवढे पैसे देत नाही, तोपर्यंत वीज बिल माफी होऊ शकणार नाही. वाढीव वीज बिलांच्या मुद्द्यावर हा पेच जो वाढलेला आहे. तो मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची संमती न घेतल्यामुळे निर्माण झालेला आहे.' पुढे बोलताना ते म्हणाले की, 'आताही वेळ गेलेली नाहीये, जर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी 5000 कोटी ऊर्जाखात्याला दिले, तर वीज बिल माफी केली जाऊ शकते.'
'जनता यांना विचारायला गेली नव्हती की, आम्हाला सवलत देणार का? यांनी स्वतः घोषणा केली आहे. दुसरी घोषणा केली कोरोना संसर्गासंदर्भातील उपचारांमध्ये सवलती देऊ, जर या तिघांमध्ये समन्वय नसेल आणि मंत्रिमंडळाची सामुहिक जबाबदारी स्विकारायला मंत्री किंवा मुख्यमंत्री तयार नसतील, तर मग अशा घोषणा करुन काय उपयोग?'; असा सवालही माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपस्थित केला आहे. तसेच 'ऊर्जामंत्र्यांनी सामूहिक जबाबदारी म्हणून एखादी घोषणा केली असेल तर ती घोषणा मंत्रिमंडळाला, सरकारला बंधनकारक आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना यांच्या आपासातल्या राजकारणात कोणी क्रेडिट घ्यावं, यामध्ये दीड कोटी जनतेची फसवणूक करताय हे चुकीचं आहे.' असंही ते म्हणाले.
पाहा व्हिडीओ : वीजबिल माफीवरुन आजी-माजी ऊर्जामंत्र्यांमध्ये जुगलबंदी
वीजबिल माफी माझं व्यक्तिगत मत नव्हतंच, तो सरकारचा निर्णय : नितीन राऊत
वीजबिल माफी हे केवळ एका खात्याचं नाही. हे सरकारचं काम आहे. मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत एमईआरसीला प्रस्ताव दिला. वाढीव वीज बिल माफी करु अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यानंतर केली होती. वीज ग्राहकांना बिल माफीसाठी आजही विचारविनिमय सुरु आहे. वीजबिलमाफी माझं व्यक्तिगत मत नव्हतंच, तो सरकारचा निर्णय होता, असं राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी सांगितलं.
दिवसभर दिग्गज नेत्यांकडून महाराष्ट्राचं व्हिजन फक्त एबीपी माझावर
नव्या सरकारला सत्तेत येऊन एक वर्ष पूर्ण होतंय. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारला सत्तेत येऊन एक वर्ष पूर्ण होत आहे. विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात सत्तांतर झालं आणि एक नवी आघाडी उदयास आली. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं महाविकास आघाडी सरकार सत्तेत आलं. 28 नोव्हेंबर 2019 रोजी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
एबीपी माझाच्या माझा महाराष्ट्र माझं व्हिजन या कार्यक्रमात यानिमित्ताने महाराष्ट्रातील गेल्या वर्षभरातील सरकारच्या कामाचा आढावा आणि महाराष्ट्राच्या भविताव्याविषयीचं सरकारच्या धोरणांबाबत जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
ऊर्जामंत्री नितीन राऊत, उद्योग मंत्री सुभाष देसाई, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, आरोग्यमंत्री राजेश टोपे, अशोक चव्हाण, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील आणि आदित्य ठाकरे या नेत्यांचा सहभाग असणार आहे. हे नेते महाराष्ट्रासाठीचं त्याचं व्हिजन मांडणार एबीपी माझाच्या 'माझा महाराष्ट्र माझं व्हिजन' या कार्यक्रमात मांडणार आहेत.
'माझा महाराष्ट्र माझं व्हिजन' हा कार्यक्रम आज सकाळी दहा वाजल्यापासून एबीपी माझावर पाहता येणार आहे. एबीपी माझाच्या अधिकृत यु-ट्युब चॅनल, फेसबुक पेजवर प्रेक्षकांना हा कार्यक्रम लाईव्ह पाहता येणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
- वीजबिल माफीचं काय? 'राज्याचे पैसे केंद्रानं अडवले!', आजी-माजी ऊर्जामंत्री आमनेसामने
- Majha Maharashtra Majha Vision | 51 हजार कोटींच्या सामंजस्य करारातून नवे एक लाख रोजगार तयार होत आहेत : सुभाष देसाई
- Majha Maharashtra Majha Vision | वीजबिल माफी माझं व्यक्तिगत मत नव्हतंच, तो सरकारचा निर्णय : नितीन राऊत