Aurangabad News | सांस्कृतिक अन् ऐतिहासिक स्थळांच्या संवर्धनासाठी औरंगाबादच्या तरुण शेतकऱ्याची भारत भ्रमंती!
भारतातील सर्वच ऐतिहासिक महत्व असलेल्या स्थळांना भेटी देत त्यांचं जतन करण्याचा संदेश स्थानिकांना देण्यासाठी सुनीलने सायकलने भारत भ्रमणाची योजना आखली. 20 डिसेंबर 2020 रोजी तो देवळाणा गावातून सायकल घेऊन भारत भ्रमणावर निघाला, त्यावेळी त्याच्या खिशात फक्त साडेचार हजार रुपये आणि सोबतीला कुटुंबियांचे पाठबळ एवढेच होते.

नागपूर : सांस्कृतिक आणि ऐतिहासिक महत्व असलेल्या वारसा स्थळांचे संवर्धन करण्याचा संदेश देत औरंगाबादचा एक तरुण भारत भ्रमणावर निघाला आहे. तब्बल 4 हजार 850 किलोमीटरचे अंतर पार करून हा तरुण काल नागपुरात पोहचला. सुनील थोरात असं या 22 वर्षीय तरुणाचं नाव असून तो औरंगाबादमधील एका छोट्याशा गावातील शेतकरी कुटुंबातील आहे.
कोरोनाच्या काळात सायकलवारी हे फिटनेस आणि पर्यावरण संवर्धनाचे साधन ठरले आहे. अशातच औरंगाबादच्या देवळाणा गावातील 22 वर्षीय सुनील हा तरुण शेतकरी. सुनीलचं कुटुंब परंपरेने शेती करतं. मात्र, सुनील ऑरगॅनिक शेतीकडे वळला. शेतीतून मिळणाऱ्या फावल्या वेळात तो औरंगाबादच्या वारसा स्थळांना सायकलने भेट द्यायचा. मात्र, तिथे लोकांकडून करण्यात आलेल्या विद्रुपीकरणाने तो अस्वस्थ व्हायचा. कोरोना काळात त्याने यासंदर्भात जनजागृती करण्याचे ठरवले. त्यासाठी भारतातील सर्वच ऐतिहासिक महत्व असलेल्या स्थळांना भेटी देत त्यांचं जतन करण्याचा संदेश स्थानिकांना देण्यासाठी सुनीलने सायकलने भारत भ्रमणाची योजना आखली. 20 डिसेंबर 2020 रोजी तो देवळाणा गावातून सायकल घेऊन भारत भ्रमणावर निघाला, त्यावेळी त्याच्या खिशात फक्त साडेचार हजार रुपये आणि सोबतीला कुटुंबियांचे पाठबळ एवढेच होते.
औरंगाबादहून निघाल्यावर सुनीलने कर्नाटक, तमिळनाडू, केरळमार्गे कन्याकुमारी गाठली. पुढे कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा मार्गे तो नागपूरला पोहोचला. या प्रवासात त्याने तुळजापूर, वैजापूर, हम्पी, होसूर, म्हैसूर पॅलेस, कन्याकुमारी, रामेश्वरम, शबरीमाला आणि मिनाक्षी मंदिर, तंजावुरचा शिलालेख, गोवळकोंडा किल्ला, चारमिनार यासारख्या अनेक ऐतिहासिक महत्व असलेल्या स्थळांना भेट दिली. प्रत्येक ठिकाणी त्याने स्थानिकांना या स्थानांच्या जटांसाठी दक्ष राहण्याची विनंती केली. नागपुरात एक दिवस विश्रांती केल्यानंतर आता सुनील उत्तर भारताच्या प्रवासावर निघणार आहे. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, दिल्लीमार्गे लेह लडाख, काश्मीरची सायकल वारी करत तो पुन्हा राजस्थान, गुजरात होत महाराष्ट्रात परत येणार आहे. अजून ही सुमारे 6 हजार 150 किलोमीटरचा मोठा पल्ला त्याला गाठायचा आहे. दीडशे दिवसांत भारत भ्रमण पूर्ण करण्याचा सुनीलचा संकल्प असून तो दररोज सुमारे 90 किलोमीटरचा सायकल प्रवास करतो. मोसम चांगला असल्यास सव्वाशे किमीपर्यंत त्याची सायकल वारी होते.
दरम्यान, आतापर्यंतच्या सायकल प्रवासात सुनीलला अनेक बरे-वाईट प्रसंग देखील आले. दक्षिणेतील राज्यातून प्रवास करताना भाषेची अडचण प्रामुख्याने आली. तर अनेक ठिकाणी स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी त्याला मदतही केली. 15 राज्यांतील 80 शहरांच्या भारतीय आणि जागतिक वारसा स्थळांना भेटी देत सुनील थोरात एकूण 11 हजार किलोमीटरचा सायकल प्रवास पूर्ण करूनच महाराष्ट्रात परतणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :























