'वाटलं होतं फोन करून प्रकाश आंबेडकर माफी मागतील', अकोल्यातील राड्यावर योगेंद्र यादव यांची प्रतिक्रिया!
अकोल्यात वंचितच्या कार्यकर्त्यांनी घातलेल्या गोंधळावर योगेंद्र यादव यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यानी राज्यातील विधानसभा निवडणुकीवरही भाष्य केलंय.
मुंबई : अकोला जिल्ह्यात भारत जोडो अभियानाचे संयोजक योगेंद्र यादव (Yogendra Yadav) यांच्या भाषणादरम्यान वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी चांगलाच गोंधळ घातला होता. या गोंधळाचे काही व्हिडीओही त्यावेळी व्हायरल झाले होते. याच प्रकरणावर आता योगेंद्र यादव यांनी प्रतिक्रिया दिली आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर हे फोन करून मला माफी मागतील असं वाटलं होतं. पण त्यांचा कॉल आला नाही, असे योगेंद्र यादव म्हणाले आहेत. सोबतच त्यांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीवरही भाष्य केलं आहे. महाराष्ट्राची जनता ही विकाऊ नाही. ज्या पद्धतीने पैसे फेकून मतं करेदी करण्याचा प्रयत्न चालू आहे, ते जनता स्वीकारणार नाही, असंही योगेंद्र म्हणाले.
ते मला फोन करतील पण...
प्रकाश आंबेडकर आजारी होते हे समजलं. त्यामुळे त्यांना स्वास्थ्य मिळावं ही प्रार्थना करतो. आमचा संघर्ष हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि संघाच्या विचारांशी आहे. मला मान्य आहे की विचाराधारा सारखी असलेल्या काही लोकांना समजवण्यात आम्ही कमी पडलो. प्रकाश आंबेडकर हे माझे जुने मित्र आहेत. मला वाटलेलं की अकोला घटनेनंतर ते मला फोन करतील आणि घडलेल्या घटनेबद्दल माफी मागतील. पण त्यांचा मला फोन आला नाही. असो मी त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा देतो, अशा भावना योगेंद्र यादव यांनी बोलून दाखवल्या.
आमच्यापेक्षा देवेंद्र फडणवीस यांनाच जास्त माहिती
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांनी दाखवलेल्या लाल रंगाच्या संविधानावरील भाष्यावरही योगेंद्र यादव यांनी जोरदार टीका केली. आमच्या संघटनेबद्दल आमच्यापेक्षा देवेंद्र फडणवीस यांनाच जास्त माहिती आहे. त्यामुळे आमच्या संघटनेत किती अर्बन नक्षलवादी आहेत याची यादी आम्ही त्यांना मागितली आहे. अर्बन नक्षलवादी शब्दाचा अर्थही आम्हाला माहिती नाही. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीदेखील संसदेत हेचं सांगितलं की अर्बन नक्षलवाद आमच्या डिक्शनरीत नाही. अमित शाह यांनादेखील अर्बन नक्षलवाद हा शब्द माहिती नाही. अर्बन नक्षलवाद हे भूत आहे. भूत हे बाहेर नसतं. ते आपल्या मनात असतं. अर्बन नक्षलवादाचं भूत भाजपच्या मनात आहे, असा हल्लाबोल योगेंद्र यादव यांनी केला.
...त्यामुळे लाल आणि निळा रंग भाजपच्या गळ्यात उतरत नाही
तसेच, आम्ही गांधी-लोहिया-फुले-आंबेडकर यांच्या परंपरेमधून आलेलो आहोत. लाल रंगची प्रत असलेल्या संविधानाची प्रस्तावना के के वेणूगोपाल यांनी लिहिलीय. हेच वेणूगोपाल मोदी सरकारचे ऍटरनी जनरल होते. मोदी यांनीदेखील माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना याच लाल रंगाच्या संविधानाची प्रत दिली होती. लाल रंगाच्या कपड्यात महाराष्ट्रमध्ये धार्मिक ग्रंथांना ठेवण्यात येते. पण मुळात संविधानाचा आत्मा लाल आणि निळा आहे. त्यामुळे लाल आणि निळा रंग भाजपच्या गळ्यात उतरत नाही, असा टोला योगेंद्र यादव यांनी लगावला.
Yogendra Yadav Video News:
हेही वाचा :
Yogendra Yadav Speech News : योगेंद्र यादव यांच्या भाषणादरम्यान वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा