एक्स्प्लोर
मी महाराष्ट्राची ऋणी! पाठिंब्यामुळे नयनतारा सहगल भावनावश
92 व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचं दिलेलं निमंत्रणपद रद्द केल्यानंतर महाराष्ट्रभरातून आलेल्या पाठिंब्यामुळे भारावून गेलेल्या लेखिका नयनतारा सहगल पत्र लिहून महाराष्ट्राचे आभार मानले आहेत.
मुंबई : लेखिका नयनतारा सहगल यांना 92 व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचं दिलेलं निमंत्रणपद रद्द केल्यानंतर मोठा वाद झाला होता. अनेक साहित्यिकांनी नयनतारा सहगल यांना पाठिंबा देत या घटनेचा निषेध व्यक्त केला. त्यानंतर लेखिका नयनतारा सहगल यांनीही महाराष्ट्राचे ऋण व्यक्त केले आहेत.
वादानंतर अनेक निमंत्रितांनी संमेलनावर बहिष्कार टाकला. संमेलनस्थळीही निषेध व्यक्त झाला. त्याचवेळी सहगल यांच्या भाषणाचे अनेक ठिकाणी जाहीर अभिवाचन करण्यात आले. या पाठिंब्यामुळे भारावून गेलेल्या सहगल यांनी लिहिलेल्या पत्रात महाराष्ट्राचे आभार मानले आहेत.
नयनतारा सहगल यांचं पत्र
माझे निमंत्रण मागे घेतल्याबद्दल नागरिक आणि साहित्यिकांनी निषेध केला. मला पाठिंबा देणारे असंख्य दूरध्वनी आणि मेल आले. माझ्या न झालेल्या भाषणाच्या अभिवाचनाचे कार्यक्रम केले गेले. या पाठिंब्यामुळे मी भावनावश झाले आहे. विचार आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे जतन करण्यासाठी दाखवलेल्या निर्धाराबद्दल मी महाराष्ट्राची ऋणी आहे.
मला मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाचे निमंत्रण दिले, तेव्हा मराठी साहित्यिकांशी बोलण्याची संधी मिळेल म्हणून आणि मी अर्धी महाराष्ट्रीयन असल्यामुळे, मी ते आनंदाने स्वीकारले होते. मराठी ही माझ्या वडिलांची मातृभाषा होती आणि महाराष्ट्र हे त्यांचे घर होते. मराठी साहित्यरसिकांपर्यंत माझ्या भावना पोहोचाव्यात म्हणून माझे इंग्रजीतले भाषण भाषांतरासाठी पाठवले होते. दुर्दैवाने मला दिलेले निमंत्रण मागे घेण्यात आले आणि मला संवादाची संधी मिळाली नाही.
माझे निमंत्रण रद्द करण्याच्या प्रकाराबद्दल नापसंती व्यक्त करणारे महाराष्ट्राचे शिक्षण आणि सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे, त्याचबरोबर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचेही मी आभार मानू इच्छिते. अशी परिस्थिती पुन्हा कधी उद्भवणार नाही, अशी प्रामाणिक आशा व्यक्त करते.
मला आलेले असंख्य दूरध्वनी, मेल आणि बातम्यांमधून, माझे निमंत्रण परत घेतल्यामुळे सामान्य नागरिक आणि साहित्यिकांनी केलेल्या निषेधाची माहिती मिळाली. सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय संघटनांनी माझ्या न झालेल्या भाषणाच्या अभिवाचनाचे जाहीर कार्यक्रम केले, याबद्दलही मला कळले. महाराष्ट्रातून मिळालेल्या या पाठिंब्यामुळे मी भावनावश झाले आहे. मी महाराष्ट्राची मन:पूर्वक ऋणी आहे. महाराष्ट्रातील माझ्या सहकारी साहित्यिकांचेही मी मनापासून आभार मानते. त्यांच्या लेखनासाठी त्यांना नवी सृजनऊर्जा मिळो, अशी शुभेच्छा देते, असेही सहगल यांनी पत्रात म्हटले आहे.
मराठी साहित्य संमेलनात वाचलं न जाणारं नयनतारा सहगल यांचं 'ते' भाषण
काय आहे वाद? 92 व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाला उद्घाटक म्हणून लेखिका नयनतारा सहगल यांना आयोजन समितीकडून आमंत्रण देण्यात आलं होतं. मात्र त्यांच्या नावाला काही संघटनांकडून विरोध करण्यात आला होता. मराठी साहित्य संमेलनामध्ये इंग्रजी लेखिका कशा, असं म्हणून संमेलन उधळून लावण्याची भाषा केली गेली. साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांच्या सांगण्यावरुन यवतमाळ आयोजन समितीने नयनतारा सहगल यांना पाठविलेले निमंत्रण रद्द केलं. त्यानंतर सर्व साहित्य क्षेत्रातील व्यक्ती आणि विविध स्तरातून निमंत्रण रद्द केल्याबद्दल टीका करण्यात आली होती. त्यानंतर या संमेलनाच्या नव्या उद्घाटकाचे नाव सुचवण्यात यावं, असं महामंडळाने आयोजन समितीला सांगितलं होतं. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याची पत्नी वैशाली येडे यांना उद्घाटनाचा मान देण्यात आला. सहगल यांचे निमंत्रण रद्द करणे अत्यंत निषेधार्ह : संमेलनाध्यक्षा अरुणा ढेरे नयनतारा सहगल यांचे निमंत्रण रद्द करणे अत्यंत निषेधार्ह आहे. सहगल या आगळ्यावेगळ्या लेखिका असून सहगल यांचे विचार जोपासायला हवेत, अशा तिखट शब्दात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा अरुणा ढेरे यांनी समाचार घेतला होता. साहित्याशी किंवा भाषेच्या समृद्धतेशी ज्यांचा काडीचाही संबंध नाही, अशा लोकांमुळे वाद निर्माण होतो ते चुकीचे आहे, असे परखड मत ढेरे यांनी व्यक्त केले होते. आपण झुंडशाहीला बळी पडलो : लक्ष्मीकांत देशमुखांचे घणाघात नयनतारा सहगल यांचे आमंत्रण मागे घेणे हे अनुचित आहे. आपण झुंडशाहीला बळी पडलो आहोत. सहगल आल्या असत्या आणि भाषण केलं असत तर काही राजकीय आभाळ कोसळलं नसतं, अशा शब्दात माजी संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी घणाघात केला होता. नयनतारा सहगल यांचा साहित्य कर्तृत्वाला सलाम करत त्यांनी आपल्या भाषणाची सुरुवात केली होती.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement