Kalyan : झाडू विकणाऱ्या महिलेचा प्रामाणिकपणा, दोन लाखांचं ब्रेसलेट केलं परत
Kalyan : कल्याणमधील झाडू विक्रेत्या महिलेने तब्बल दोन लाख रूपये किंमत असलेलं सोन्याचं ब्रेसलेट प्रामाणिकपणे परत केले आहे. जाहिदा शेख (वय, 60) असे या महिलेचे नाव आहे.
Kalyan : कल्याणमधील एका झाडू विकणाऱ्या महिलेच्या कृतीमुळे समाजात आजही माणुसकी आणि प्रामाणिकपणा शिल्लक असल्याचा प्रत्यय आला आहे. या महिलेने तब्बल दोन लाख रूपये किंमत असलेलं सोन्याचं ब्रेसलेट प्रामाणिकपणे परत केले आहे. जाहिदा शेख (वय, 60) असे या महिलेचे नाव आहे.
कल्याणच्या सहाय्यक आयुक्त पोलीस कार्यालयाजवळ नाराळाच्या झावळ्या आणि बांबूपासून तयार केलेल्या केरसुन्या, टोपल्या आणि सुपड्या विकून जाहिदा या आपला उदारनिर्वाह करतात. त्यांना त्यांच्या दुकानासमोर एक सोन्याचं ब्रेसलेट सापडलं होतं. या ब्रेसलेटची किंमत दोन लाख रुपये होती. जाहिदा यांनी प्रामाणिकपणा दाखवत हे ब्रेसलेट पोलिसांकडे दिले. पोलिसांनी संबंधितांना ते परत केले. जाहिदा यांच्या या प्रामाणिकपणाचे कौतुक होत आहे.
जाहिदा यांना काल सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास रस्त्यात पडलेले सोन्याचे ब्रासलेट सापडले. त्यांनी याबाबत वाहतूक पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर जवळपास एका तासाने एक तरुण ब्रेसलेट शोधण्यासाठी या परिसरात आला. त्याने आजूबाजूला ब्रेसलेटबाबत विचारणा केली. त्यावेळी ते ब्रेसलेट पोलिसांकडे जमा केल्याची त्याला माहिती मिळाली. त्यामुळे त्याने वाहतूक पोलिसांसोबत संपर्क साधला. यावेळी पोलिसांनी शहानिशा करून तरुणाला ब्रेसलेट परत केलं आणि जाहिदा यांनी ते पोलिसांकडे जमा केल्याचे सांगितले. ब्रेसलेट परत मिळाल्यामुळे संबंधित तरूणालाही खूप आनंद झाला.
प्रामाणिकपणाचा सन्मान
लाखो रूपये पगार असतानाही एक-दोन हजार रूपयांची लाच घेणारे कुठे आणि हातावर पोट असतानाही तब्बल दोन लाख रूपयांचे ब्रेसलेट परत करणाऱ्या जाहिदा कुठे? अशी चर्चा आता समाज माध्यमांतून होत आहे. एवढ्या मोठ्या किंमतीचे ब्रेसलेट कोणताही मोह न दाखवता जाहिदा यांनी परत केले आहे. त्यामुळे समाजातून तर त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतच आहे. शिवाय जहिदा शेख यांनी दाखविलेल्या प्रामाणिकपणाबद्दल कल्याण वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तरडे यांनी त्यांचा सत्कार केला.
महत्वाच्या बातम्या