संजय राठोड यांना मंत्रिमंडळात पुन्हा स्थान मिळावं यासाठी पोहरादेवीचे महंत आक्रमक, 23 एप्रिलला मुंबईत आंदोलन
पोहरादेवी इथे स्व रामराव महाराज यांच्या समाधीस्थळी आज (15 एप्रिल) झालेल्या बैठकीत सर्व महंतानी एकत्रित येऊन संजय राठोड यांना मंत्रिमंडळात स्थान मिळावं यासाठी आंदोलनाची भूमिका घेतली आहे.
वाशिम : गेल्या काही दिवसापासून संजय राठोड यांना मंत्रिमंडळात पुन्हा स्थान मिळावं यासाठी बंजारा समाज आक्रमक होताना दिसत आहे. त्यातच आता माजी मंत्री संजय राठोड यांना मंत्रिमंडळात स्थान मिळावं यासाठी पोहरादेवीचे महंत देखील आक्रमक झाले आहेत. पोहरादेवी इथे स्व रामराव महाराज यांच्या समाधीस्थळी आज (15 एप्रिल) झालेल्या बैठकीत सर्व महंतानी एकत्रित येऊन संजय राठोड यांना मंत्रिमंडळात स्थान मिळावं यासाठी आंदोलनाची भूमिका घेतली आहे. येत्या 23 एप्रिल रोजी मुंबईत स्वर्गिय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी बंजारा समाजाच्या वतीने आंदोलन करण्याचा निर्णय वाशिमच्या पोहरादेवी इथे महंताच्या बैठकीत घेण्यात आला.
ज्या मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, ज्यांची ईडीची चौकशी सुरु आहे, असे मंत्री मंत्रिमंडळात आहेत. असं असताना संजय राठोड यांच्यावर कोणतेही आरोप सिद्ध झालेले नाही. तरीही त्यांना मंत्रिमंडळात का घेतलं जात नाही, असा प्रश्न महंतांनी उपस्थित केला. हा केवळ बंजारा सामाजाच्या नेत्यावरच नाही तर संपूर्ण बहुजन जनतेवर अन्याय आहे. जर संजय राठोड यांना मंत्रिमंडळात स्थान नाही दिलं तर येत्या निवडणुकीत सगळ्या राजकीय पक्षांना बंजारा समाजाची ताकद दाखवूने देऊ, अशी भूमिका यावेळी महंतांनी मांडली.
संजय राठोड यांना पुन्हा मंत्रिपदाची आशा
दरम्यान आपल्याला पुन्हा मंत्रिपद मिळेल, अशी आशा संजय राठोड यांनी व्यक्त केली. काही दिवसांपूर्वी संजय राठोड यांनी वाशिममधल्या संत सेवालाल महाराज आणि जगदंबा देवीच्या दर्शन घेतलं. त्यानंतर माध्यमांशी बोलताना आपल्याला पुन्हा सन्मानाने मंत्रिपद मिळेल, असं वक्तव्य केलं. "मंत्रीपद देण्याचा अधिकार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आहे, चौकशी झाल्यानंतर पुन्हा सन्मानाने मंत्रिपद मिळेल. मला पुन्हा मंत्रिपदाची संधी दिली तर मला आवडेल. शेवटी निर्णय मुख्यमंत्र्यांचा आहे. मंत्रिपद मिळालं तर मला आणखी चांगलं काम करता येईल. पोहरागडचा विकास आणि महाराष्ट्रातील विकासाच्या दृष्टीने काम करता येईल," असं संजय राठोड म्हणाले होते.
वर्षभरापूर्वी संजय राठोड यांचा राजीनामा
बीडच्या परळीतील तरुणीने वर्षभरापूर्वी पुण्यात आत्महत्या केली होती. या आत्महत्येच्या मागे माजी वनमंत्री संजय राठोड यांचा हात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.