(Source: ECI/ABP News/ABP Majha)
यंदा हापूस उशिराने येणार, किमंतही वाढणार! हवामान बदलाचा आंबा आणि काजू उत्पादनावर परिणाम
वातावरणात अचानक वाढणारा गारठा तर कधी अचानकपणे तापमानात उष्णता वाढत असल्याने त्याचा परिणाम हा आंबा आणि काजूच्या पिकाला बसत आहे. त्यामुळे यंदा रत्नागिरी हापूस उशिराने बाजारात दाखल होण्याची चिन्हं दिसत आहेत.
रत्नागिरी : हवामान बदलले की त्याचा पहिला फटका हा पिकांना बसतो. सध्या कोकणातदेखील हवामान मोठे चढ-उतार पाहायला मिळत आहेत. त्याचा फटका हा हापूस, रायवळ आंबा आणि काजूला बसत आहे. दरवर्षी डिसेंबर अखेरीस मोहोर येऊन जानेवारीमध्ये फळं झाडाला लागलेली दिसायची. पण यंदा मात्र जानेवारी महिना अर्धा संपला तरी झाडावर फळं दिसत नाही.
वातावरणात अचानक वाढणारा गारठा तर कधी अचानकपणे तापमानात उष्णता वाढत असल्याने त्याचा परिणाम हा आंबा आणि काजूच्या पिकाला बसत आहे. त्यामुळे यंदा रत्नागिरी हापूस उशिराने बाजारात दाखल होण्याची चिन्हं दिसत आहेत. परिणामी आता यंदाच्या मोसमात हापूसची चव चाखायला आतुर असलेल्या खवय्यांना हापूसची दरवर्षीपेक्षा काहीशी जास्त वाट पाहावी लागणार आहे. तसेच काजू उत्पादनावरदेखील हवामान बदलाचा परिणाम होणार आहे. वातावरणाच्या या लहरीपणावर आता बागायतदार आणि छोटे शेतकरी देखील नाराजी व्यक्त करत आहेत. शिवाय या साऱ्याचा परिणाम हा आंब्याच्या दरांवरदेखील होणार आहे.
मोहोर गळून जातोय हापूस आणि रायवळ आंब्याला आता कुठे मोहोर यायला सुरुवात झाली आहे. पण, पहाटे धुके पडत आहे. परिणामी मोहोर काळा पडत असून तो गळून जात आहे. त्यामुळे काही प्रमाणात का असेना पण हापूस आणि रायवळ आंबा लवकर मिळेल अशी आशा करता येत नाही.
काजू उत्पादनावरदेखील परिणाम हवामान बदलामुळे काजू पिकालादेखील फटका बसत आहे. त्यामुळे काजू बागायतदार आणि छोटे शेतकरी हतबल झाले असल्याचे चित्र आहे. सुरुवातीला काजूला दर चांगला मिळेल, अशी अशा व्यक्त केली जात होती. पण हवामानाच्या लाहरीपणामुळे तीदेखील काहीशी मावळताना दिसत आहे.
खिशाला बसणार का कात्री? हापूसचे दर हे दरवर्षी चढेच असतात. पण यंदा मात्र त्यात अधिक वाढ होण्याची शक्यता आहे. वातावरणात दिवसागणिक बदल होतं असल्याने बागायतदार आणि शेतकरी औषध फवारणीवर जास्त लक्ष केंद्रीत करत आहेत. किमान आलेला मोहोर तरी नीट टिकावा याकरता प्रयत्न केला जात आहे. दरम्यान, हापूस उशिरा बाजारात दाखल होणार असल्याने ग्राहकांना जास्तीचे पैसे मोजावे लागतील, अशी प्रतिक्रिया आंबा बागायतदार देत आहेत. सुरुवातीला हापूस कमी प्रमाणात उपलब्ध असला तरी मे महिन्यात मात्र हाच हापूस मुबलक प्रमाणात उपलब्ध होईल, शिवाय दरदेखील कमी होतील, अशी शक्यतादेखील हापूस उत्पादक बागायतदार आणि शेतकरी व्यक्त करतात.