(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Wine : किराणा दुकानातून वाईन विक्रीचा निर्णय तुर्तास लांबणीवर?
Wine : किराणा दुकानातून वाईनच्या विक्रीचा निर्णय तूर्तास न राबवण्याचे राज्य शासनाने ठरवले आहे. नव्या नियमावलीच्या प्रारूपावर जनतेच्या प्रतिक्रीया आणि हरकती मागवल्या जातील. त्यानंतर या संदर्भातील निर्णय होणार आहे.
Wine : राज्यभरातील किराणा दुकानातून वाईन विक्री करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. परंतु, आता राज्य शासनाकडून किराणा दुकानातून वाईनच्या विक्रीचा निर्णय तूर्तास न राबवण्याचे ठरवले आहे. नव्या नियमावलीच्या नियमाचा प्रारूप आधी प्रसिद्ध केले जाईल. त्यावर जनतेच्या प्रतिक्रीया आणि हरकती मागवल्या जातील. त्यानंतरच या संदर्भातील अंतिम निर्णय होणार आहे.
येत्या सोमवारपासून जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने दोन पाऊलं मागे घेण्याचं ठरवलं आहे. नाशिक विभागाचे आयुक्त राधाकृष्ण गमे हे यापूर्वीच अण्णा हजारे यांच्या भेटीसाठी रवाना झाले आहेत. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी याआधीच अण्णा हजारे यांची भेट घेतली आहे. आज या विभागाच्या सचिव वत्सला नायर या याबाबतचे पत्र घेऊन आण्णा हजारे यांच्या भेटीला जाणार आहेत.
किराणा दुकाणातून वाईन विक्री करण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्यभरातून या निर्णयाला विरोध होत आहे. विरोधी पक्षातील नेत्यांनी सरकारच्या निर्णयावर कडाडून टीका केली होती. तर सरकारमधील अनेक मंत्र्यांनी वाईन ही दारू नसून द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी हा निर्णय घेतल्याचे म्हटले होते. परंतु, अण्णा हजारे यांनी बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिल्यानंतर सरकारने आपल्या निर्णयावर जनतेच्या प्रतिक्रीया मागवणार असल्याचे म्हटले आहे.
किराणा दुकानांतून वाईन विक्रीला परवानगी देण्याच्या निर्णयाविरोधात अण्णा हजारे यांनी थेट बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. याबाबत अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहले आहे. यामध्ये त्यांनी येत्या 14 फेब्रुवारीपासून आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा दिला आहे. 14 फेब्रुवारीपासून राळेगणसिद्धी येथील यादवबाबा मंदिरात आमरण उपोषण सुरू करणार असल्याचे पत्रातून अण्णा हजारे यांनी सांगितले आहे.
काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने वाईन विक्रीसंबंधी जो धोरणात्मक निर्णय घेतला आहे, त्यानुसार सुपरमार्केट आणि किराणा दुकानांमधून वाईन विक्री सुरू करणे महाराष्ट्रासाठी अतिशय दुर्दैवी आहे. केवळ राज्याचा वाढणारा महसूल आणि वाईन उत्पादक आणि विक्रेते यांचे हित पाहून हा निर्णय घेतल्याचे दिसून येते. पण या निर्णयामुळे लहान मुले आणि तरुण व्यसनाधीन होऊ शकतो. महिलांना त्रास होऊ शकतो, याचा विचार सरकारने केलेला दिसत नाही, याची खंत वाटत असल्याचे अण्णा हजारे यांनी पत्रात म्हटले आहे. युवा शक्ती ही आमची राष्ट्रशक्ती आहे. ती बरबाद करू पाहणाऱ्या निर्णयाला विरोध करण्याशिवाय पर्याय नाही. वाईन ही दारू नाही असा दुर्दैवी युक्तिवाद सरकारकडून करण्यात येत आहे, हेही आश्वचर्यकारक असल्याचे अण्णा हजारे यांनी आपल्या पत्रातून म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या
- Anna Hajare : वाईन विक्रीच्या निर्णयाविरोधात अण्णा हजारेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र, 14 फेब्रुवारीपासून आमरण उपोषण
- मुख्यमंत्री महोदय... हातभट्टी, मोहफुलांच्या वाईन विक्रीलाही परवानगी द्या! सदाभाऊ खोतांचं पत्र
महाराष्ट्राची प्राथमिकता वाईन नव्हे तर दूध हवी; मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास आरपारची लढाई, नवलेंचा इशारा