Exclusive : मुंबईत 20 वर्षांनंतर दाऊद टोळी पुन्हा का होतेय सक्रिय?
Dawood Ibrahim : एनआयएच्या म्हणण्यानुसार, दाऊद भारतात हिंसक कारवाया करण्याच्या तयारीत आहे. देशातील अनेक दिग्गज व्यक्ती त्याच्या निशाण्यावर असून दाऊद टोळी रिअल इस्टेट आणि मनी लाँड्रिंगच्या माध्यमातून फंडिंग करत आहे.
D Company in Mumbai : मुंबईत काल एनआयएने (NIA) अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित असल्याच्या संशयावरून तब्बल 29 ठिकाणी छापेमारी केली आहे. नागपाडा, गोरेगाव, मुंब्रा, बोरिवली, सांताक्रूझ, भेंडी बाजारात छापे टाकल्याची माहिती मिळत आहे. एनआयएच्या या छापेमारीपासून दाऊद इब्राहिमचे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. गेल्या काही वर्षांमध्ये डी कंपनीने मुंबईतील आपल्या हालचाली कमी केल्याचे दिसत असतानाच पुन्हा एकदा ही कंपनी सक्रिय झाल्याची माहिती समोर आली आहे. तब्बल वीस वर्षांनंतर मुंबईत दाऊद टोळी पुन्हा एकदा डोके वर काढताना दिसत आहे.
एनआयएच्या म्हणण्यानुसार, दाऊद भारतात हिंसक कारवाया करण्याच्या तयारीत आहे. देशातील अनेक दिग्गज व्यक्ती त्याच्या निशाण्यावर असून दाऊद टोळी रिअल इस्टेट आणि मनी लाँड्रिंगच्या माध्यमातून फंडिंग करत आहे. दाऊदचा धाकटा भाऊ अनिश, साथीदार छोटा शकील आणि टायगर मेनन हे दाऊदला त्याच्या या कामात मदत करत असल्याची माहिती एनआयएच्या हाती लागली आहे. दाऊद पाकिस्तानात असल्याचा भारतीय एजन्सींना विश्वास असून पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय त्याला पाठिंबा देत आहे आणि भारतविरोधी कारवायांसाठी त्याचा वापर करत आहे, असे एनआयएचे मत आहे.
1993 च्या साखळी बॉम्बस्फोटात सहभाग
दाऊद हा 70 आणि 80 च्या दशकापर्यंत मुंबईतील एक कुख्यात गुंड होता. तो पैशासाठी खून करत होता. परंतु 12 मार्च 1993 रोजी मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांमुळे त्याच्या दहशतवादी योजनांचा पर्दाफाश झाला. मुंबईतील या बॉम्बस्फोटांमध्ये अडीचशेपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला होता. तर सुमारे साडेसातशे लोक जखमी झाले होते. दाऊदच्या तस्करीच्या नेटवर्कचा वापर करून आयएसआयने स्फोटांसाठी स्फोटके पाठवली होती, असे तपासात उघड झाले आहे.
संयुक्त राष्ट्रांनी आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केले
दाऊद पाकिस्तानात असल्याचा भारतीय एजन्सींना विश्वास असला तरी तो पाकिस्तानात नसल्याचे पाकिस्तानकडून सतत सांगितले जात आहे. परंतु, भारताकडून दाऊद पाकिस्तानातच असल्याचे पुरावे अनेकवेळा देण्यात आले आहेत. दाऊदला अमेरिका आणि संयुक्त राष्ट्रांनी आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केले आहे. इंटरपोलने त्याच्याविरुद्ध रेड कॉर्नर नोटीस जारी केली आहे. मात्र पाकिस्तान सरकारच्या कथित मदतीमुळे दाऊद कराचीमध्ये ऐषोरामाचे जीवन जगत आहे.
2003 नंतर मुंबईत हालचाली थंडावल्या
मुंबईत 2003 पूर्वी दाऊद टोळीचे वर्चस्व होते. या टोळीकडून व्यावसायिक आणि चित्रपट क्षेत्रातील व्यक्तींना धमकीचे फोन येत होते. डी कंपनीने अनेकांच्या हत्या केल्या आहेत. परंतु, 2003 नंतर मुंबईत या टोळीच्या हालचाली थंडावल्या. 2002 ला दाऊदचा भाऊ इक्बाल कासकर याला भारतात आणण्यात आले. त्यामुळे दाऊदने आपल्या भावाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने मुंबईतील आपल्या हालचाली मागे घेतल्याची माहिती मिळत आहे. 2002 मध्ये दाऊद टोळीने अली नानजियानी नावाच्या केबल चॅनल चालवणाऱ्या व्यक्तीची शेवटची हत्या केली.
महत्वाच्या बातम्या