एक्स्प्लोर
मालेगाव स्फोटाचा चेहरा बनलेले प्रसाद पुरोहित यांची कहाणी आहे तरी काय?
मालेगाव स्फोटात 7 जणांचा जीव गेला होता. तर 80 हून अधिक लोक जखमी झाले होते. एटीएसने पुरोहितांना अटक केल्यानंतर तब्बल 9 वर्ष त्यांनी जेलमध्ये घालवली आणि अखेर सुप्रीम कोर्टाने आज (सोमवार) त्यांना जामीन मंजूर केला आहे.
नवी दिल्ली : लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित... 2008 च्या मालेगाव स्फोटानंतर देशभरातलं सर्वात चर्चेत असलेलं नाव.. एटीएसने पुरोहितांना अटक केल्यानंतर तब्बल 9 वर्ष त्यांनी जेलमध्ये घालवली आणि अखेर सुप्रीम कोर्टाने आज (सोमवार) त्यांना जामीन मंजूर केला आहे.
मालेगाव स्फोटात 7 जणांचा जीव गेला होता. तर 80 हून अधिक लोक जखमी झाले होते. यानंतर हिंदुत्ववादी संघटना एटीएसच्या रडारवर आल्या. त्यानंतर साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर, कर्नल श्रीकांत पुरोहितांसह 10 जणांना अटक करण्यात आली.
केंद्रीय गृहखात्याने 2011 च्या सुरुवातीला तपास एनआयएकडे सोपवला. 4 हजार पानी आरोपपत्र दाखल झालं. पण 9 वर्षात एकाही आरोपाची निश्चिती झाली नाही. याआधी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहितांचा जामीन हायकोर्टानेही फेटाळला होता. त्याला पुरोहितांनी सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं होतं.
एनआयएला 9 वर्ष केस तडीस लावण्यात यश आलं नाही. शिवाय आमच्याकडे ठोस पुरावे आहेत, याशिवाय मोठा युक्तीवादही करणं शक्य झालं नाही. याउलट पुरोहितांची बाजू देशातले नामांकित वकील हरीश साळवेंनी मांडली. आरोपपत्रात एनआयएने विसंतगत आणि परस्परविरोधी माहिती दिल्याचं साळवेंनी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलं.
2008 च्या मालेगाव स्फोटात ....
लेफ्टनंट कर्नल पुरोहितांसह साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर, शिवनारायण कालसंग्रा, श्याम साहू, राजा राहिरकर आणि जगदीश म्हात्रेला जामीन मंजूर झाला आहे. तर मेजर रमेश उपाध्याय, राकेश धावडे, समीर कुलकर्णी आणि सुधाकर द्विवेदी अजूनही जेलमध्येच आहेत.
काँग्रेसने केलेला भगवा दहशतवादाचा प्रचार आणि भाजपने त्याला दिलेलं उत्तर यामुळे मालेगाव स्फोटासह इतर घटनांना राजकीय स्वरुप आलं. मात्र लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहितांचा जामीन तांत्रिक मुद्दा आहे. 2008 च्या मालेगाव स्फोटाचा खटला अजूनही न्यायालयात प्रलंबित आहे. ज्यात अंतिम सुनावणी झाल्यानंतरच प्रसाद पुरोहित आणि इतर 10 आरोपींचा हात होता की नाही, हे स्पष्ट होईल.
मालेगाव स्फोटाचा चेहरा बनलेले प्रसाद पुरोहित यांची कहाणी
दोन स्फोट... अनेक बळी... 9 वर्षे आणि कोर्टाच्या अनेक तारखा.. लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित हे नाव त्याच तारखांमध्ये वारंवार यायचं... पुरोहित यांचं माध्यमिक शिक्षण हे अभिनव विद्यालयामध्ये झालं. तर पुण्यातल्याच गरवारे कॉलेजमध्ये त्यांनी पदवी घेतली. पण प्रखर देशाभिमानी असणाऱ्या पुरोहित यांनी लष्करात जाण्याचा निर्णय घेतला.
पुरोहित 1994 साली सैन्यामध्ये रुजू झाले. मराठा लाईट इन्फ्रंट्रीमधून त्यांना देशसेवेची संधी मिळाली. चेन्नईतल्या प्रशिक्षणानंतर त्यांची पहिली पोस्टिंग थेट काश्मीरमध्ये करण्यात आली. पण आजारी पडल्याने त्यांना दहशतवादविरोधी पथकाच्या गुप्तचर खात्यात पाठवण्यात आलं.
2002 ते 2005 दरम्यान पुरोहित यांनी दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात स्फोटके जप्त केली. पण त्याच स्फोटकांचा वापर पुरोहित यांनी स्फोटासाठी केल्याचा आरोप तेव्हा एनआयएने केला.
काश्मीरमधल्या लष्करी सेवेनंतर प्रसाद पुरोहित यांची पोस्टिंग नाशिकच्या याच देवळाली कॅम्पमध्ये झाली आणि इथेच त्यांची ओळख निवृत्त मेजर रमेश उपाध्याय यांच्याशी झाली.
रमेश उपाध्याय यांनीच अभिनव भारत या संघटनेची स्थापना केली होती. ही संघटना कट्टर हिंदुत्ववादी असून याच संघटनेवर मालेगावमध्ये स्फोट घडवल्याचा आरोप आहे. इतकंच नाही, तर प्रसाद पुरोहित यांनी या स्फोटाच्या कटाच्या बैठकीलाही हजेरी लावल्याचा दावा आहे.
मालेगावमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाप्रकरणी 2008 साली प्रसाद पुरोहित यांचं नाव तेव्हा चर्चेत आलं, जेव्हा पुरोहित यांनी रमेश उपाध्याय यांना कथित एसएमएस पाठवले. एनआयएने त्यांना थेट मध्य प्रदेशातल्या पंचमढीतल्या लष्करी प्रशिक्षण केंद्रातून ताब्यात घेतलं.
कथित मेसेज काय होते?
CAT IN OUT OF THE BOX या मेसेजचा अर्थ साध्वी प्रज्ञाला पोलिसांनी हेरलंय असा काढला गेला
तर, SING IS SUNG याचा अर्थ शिवनारायणने पोलिसांना सगळी माहिती दिली असा काढला गेला
इतकंच नाही, तर तिसऱ्या एसएमएसमध्ये पुरोहितांनी उपाध्याय यांना नंबर बदलण्याचाही सल्ला दिल्याचा दावा आहे. पण या आरोपांना प्रसाद पुरोहित यांनी फेटाळून लावलं.
उलट अभिनव भारत संघटनेच्या हालचालींवर लक्ष ठेवणे, माहिती गोळा करणे हे काम मला लष्करानेच दिलं होतं, माझा कटात कोणताही सहभाग नव्हता तर त्या संघटनेच्या कारवायांवर देखरेख ठेवत सर्व माहिती वेळोवेळी वरिष्ठांना कळवण्याचं काम मला देण्यात आलं होतं, असा दावा पुरोहित यांनी केला. इतकंच नाही, तर लष्करातलाच एक सहकारी आपल्याला या प्रकरणात गोवत असल्याचा दावा पुरोहित यांनी केला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement