White Paper : उदय सामंत यांची पाच महिन्यांपूर्वी घोषणा, उद्योगांवरील श्वेत पत्रिकेचा अद्याप पत्ता नाही!
राज्यातील अनेक महत्त्वाचे प्रकल्प परराज्यात गेल्याने विरोधकांच्या टीकेनंतर उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आपण लवकरच श्वेत पत्रिका काढणार असल्याचं म्हटलं होतं. आता या घोषणेला पाच महिने उलटले तरी पुढे काहीच झालेलं नाही.
White Paper : राज्यात शिंदे फडणवीस सरकार आल्यानंतर राज्यातील अनेक महत्त्वाचे प्रकल्प परराज्यात गेल्याचं पाहिला मिळालं होतं. यावरुन विरोधकांनी सत्ताधारी पक्षाला लक्ष्य केल्यानंतर अखेर उद्योग मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी विरोधकांच्या आरोपात तथ्य नाही, त्यामुळेच आपण लवकरच श्वेत पत्रिका (White Paper) काढणार असल्याचं म्हटलं होतं. आता या घोषणेला पाच महिने उलटले तरी पुढे काहीच झालेलं नाही.
राज्यातील वेदांता फॉक्सकॉन, एअरबस, बल्क ड्रग पार्क आणि रायगड जिल्ह्यातील सिनरमस प्रकल्प परराज्यात गेला आणि त्यानंतर शिंदे फडणवीस सरकारवर विरोधकांनी जोरदार टीका केल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यानंतर उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विरोधकांच्या आरोपात तथ्य नसल्याचं आणि त्यामुळे आपण श्वेत पत्रिका काढणार असल्याचं म्हटलं होतं.
माध्यमांशी बोलताना उदय सामंत यांनी शासनाने उद्योगांबाबत केलेला पत्रव्यवहार, दाओसमध्ये झालेल्या बैठका तसेच या बैठका झाल्यानंतर या रेकॉर्डचा पुरावा एमआयडीसी आणि उद्योग विभागाकडे किती आहे हे आम्ही महाराष्ट्राला आणि युवा पिढीला देणार असल्याचं म्हटलं होतं. मात्र पाच महिने उलटून देखील अद्याप श्वेत पत्रिका काढण्यात आलेली नाही
श्वेत पत्रिका म्हणजे काय?
1) सरकारने एखाद्या प्रकरणात काय भूमिका घेतली, काय कृती केली याचे निवेदन
2) हे निवेदन म्हणजे राज्य सरकारने दिलेली अधिकृत माहिती असते
3) श्वेतपत्रिकेत नमूद माहितीचा कोणीही वापर करु शकते
4) श्वेत पत्रिकेतील माहिती गोपनीय माहिती नसते
5) लोकप्रतिनिधींना आणि नागरिकांना माहिती नसलेल्या गोष्टी त्यांना माहित व्हाव्यात हा उद्देश
6) एखाद्या विषयावरुन लोकांचा संभ्रम होत असेल तर श्वेतपत्रिका काढली जाते
नोव्हेंबर महिन्यात घोषणा, अद्याप श्वेत पत्रिका नाही
श्वेत पत्रिका काढण्याबाबत नोव्हेंबर महिन्यात घोषणा करण्यात आली होती. मात्र महिना उलटून देखील हिवाळी आधिवेशनात सरकारने काहीच हालचाल न केल्यामुळे पुन्हा विरोधकांनी सत्ताधारी पक्षाला जोरदार टीकेचे लक्ष्य केले होते. यावेळी उत्तरापासून घुमजाव करत आपण लवकरच श्वेतपत्रिका काढून आपल्यावरील आरोप दूर करु अस उदय सामंत यांनी म्हटलं होतं.
श्वेत पत्रिका कधी काढणार?
आता हिवाळी अधिवेशन उलटून दोन महिने उलटले, आर्थसंकल्पीय अधिवेशन देखील उद्या संपत आहे. मात्र अद्याप कोणत्याही प्रकारची श्वेत पत्रिकेबाबतची हालचाल उद्योग खात्यात पाहिला मिळत नाही. विशेष बाब म्हणजे हिवाळी अधिवेशनात जेवढ्या चौकशांचे आदेश दिले त्याच देखील पुढं काय झालं हा देखील अनुत्तरीत प्रश्न आहे
VIDEO : Maharashtra Uday Samant : अधिवेशनाचा उद्या शेवटचा दिवस, उद्योगांवरील श्वेत पत्रिकेचा अद्याप पत्ता नाही