राहुल गांधींची जिथे सभा होते तिथे आमचा उमेदवार जिंकतो, मुख्यमंत्र्यांचा राहुल गांधींना टोला
राहुल गांधी यांची सभा ज्याठिकाणी होते, तिथे आम्ही नक्की जिंकतो असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. सांगलीच्या शिराळा विधानसभा मतदारसंघातील प्रचारार्थ मुख्यमंत्र्यांची सभा याठिकाणी होती.
सांगली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे जाहीर सभेत आभार मानले आहेत. आमचे काम राहुल गांधी करत आहेत. राहुल गांधी यांची सभा ज्याठिकाणी होते, तिथे आम्ही नक्की जिंकतो, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.
सांगलीच्या शिराळा विधानसभा मतदारसंघातील महायुतीमधील भाजपाचे उमेदवार शिवाजीराव नाईक यांच्या प्रचारार्थ आज वाळवा तालुक्यातील कामेरी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा पार पडली. यावेळी कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत, खासदार संजयकाका पाटील, भाजपा उमेदवार शिवाजीराव नाईक, भाजप नेते सत्यजित देशमुख यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आज विरोधी पक्षातील दोन्ही मुख्य पक्षाची अवस्था काही खरी नाही. राहुल गांधी हे महाराष्ट्रात येऊन सभेत बोलताना 70 वर्षे तुमच्यावर अन्याय झाले, असं सांगत आहेत. पण ते विसरले 65 वर्षे त्यांची सत्ता होती. पण चांगलेच आहे, राहुल गांधी आमचे काम करत आहेत. त्यामुळे राहुल गांधी यांचे मी आभार मानतो आणि राहुल गांधी यांची जिथे सभा होते, तिथे आम्ही नक्की जिंकतो, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं.
शरद पवार यांच्या पक्षात आता कोणीच राहिलं नाही. अशी अवस्था पवारांच्या पक्षाची झाली आहे, अशी टीका करत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने 15 वर्षात काय केले? याचा लेखाजोखा मांडावा. आम्ही 5 वर्षाचा हिशोब मांडतो, असं आव्हान देत 5 वर्षात हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी राहिले. तसेच राज्यात आघाडी सरकारच्या 15 वर्षाच्या काळात 20 हजार कोटी खर्च केले तर युती सरकारने 50 हजार कोटी दिले.
काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला तुम्ही मते दिली. डझनभर मंत्री दिले, मात्र ते काही करु शकले नाहीत. सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात जो महापूर आला त्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. या भागात पुन्हा पूरपरिस्थिती उद्भवू नये यासाठी आपण उपयोजना करणार आहोत.