Today In History : भारताची फाळणी, विलासराव देशमुख आणि विनायक मेटे यांचा स्मृतीदिन; इतिहासात आज
August 14 Din Vishesh : आजच्याच दिवशी 1947 मध्ये भारत आणि पाकिस्तानची फाळणी झाली होती. विनायक मेटे आणि राकेश झुनझुनवाला यांचे 2022 मध्ये निधन झाले. तर खाशाबा जाधव यांनी 1984 मध्ये अखेरचा श्वास घेतला.
What Happened on August 14th This Day in History : आजच्या दिवशी इतिहासात (Din Vishesh) काय घडलं हे जाणून घेण्याची इच्छा सर्वांनाच असते. अनेक चांगल्या वाईट घटनांनी इतिहासातील तारखा नोंदलेल्या (Today History) असतात. आज म्हणजे 14 ऑगस्ट रोजी इतिहासात अनेक महत्वाच्या घटना घडल्या होत्या. आजच्याच दिवशी 1947 मध्ये भारत आणि पाकिस्तानची फाळणी झाली होती. विनायक मेटे आणि राकेश झुनझुनवाला यांचे 2022 मध्ये निधन झाले. तर खाशाबा जाधव यांनी 1984 मध्ये अखेरचा श्वास घेतला. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे 2012 मध्ये निधन झाले होते. याशिवाय इतिहासात अनेक महत्वाच्या घडामोडी घडल्या आहेत. तसंच, आजच्या दिवशी असणारे दिग्गजांचे जन्मदिवस आणि निधन झालेल्या महत्वपूर्ण व्यक्तींबद्दल थोडक्यात जाणून घेणार आहोत.
खाशाबा जाधव यांची पुण्यतिथी -
भारताला पहिलं ऑलिम्पिक पदक मिळवून देणाऱ्या मराठमोळ्या खाशाबा जाधव यांची आज पुण्यातिथी आहे. 14 ऑगस्ट 1984 रोजी खाशाबा जाधव यांचे कराड येथे निधन झाले होते. खाशाबा जाधव यांनी मराठी, लाल मातीचा आणि कुस्तीचा जगभर गौरव केला. इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्तता झाल्यानंतर स्वतंत्र भारतासाठी कुस्ती खेळात 1952 मध्ये ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकून मराठमोळ्या खाशाबा जाधवांनी (K. D. Jadhav) पराक्रमाची गाथा रचली होती. देशाच्या क्रीडा क्षेत्रात तो क्षण मैलाचा दगड ठरावा असाच तो प्रसंग होता. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत खाशाबा जाधव यांनी देशाची मान अभिमानाने उंचावली होती.
खाशाबा जाधव यांचा जन्म 15 जानेवारी 1926 रोजी मराठा साम्राज्याच्या गौरवशाली क्षणांचा साक्षीदार असलेल्या सातारा जिल्ह्यामधील कराड तालुक्यातील गोळेश्वर खेड्यात झाला. केडी (KD) आणि पॉकेट डायनामो या टोपणनावाने देखील खाशाबा जाधव ओळखले जात होते. सन 2000 मध्ये भारत सरकारने खाशाबा यांना कुस्तीमधील त्यांच्या योगदानाबद्दल मरणोत्तर अर्जुन पुरस्काराने सन्मानित केले. 2010 च्या दिल्ली कॉमनवेल्थ गेम्ससाठी नव्याने बांधलेल्या कुस्तीस्थळाला त्यांच्या कामगिरीचा सन्मान म्हणून त्यांचे नाव देण्यात आले.
1948 मध्ये जेव्हा लंडन ऑलिंपिकसाठी फ्लायवेट गटासाठी खाशाबांची निवड झाली तेव्हा ते सहाव्या क्रमांकावर होते. या क्रमांकापर्यंत पोहोचणारे भारतातील ते एकमेव खेळाडू होते. 1952 साली हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये त्यांनी फ्रीस्टाइल कुस्तीत जिंकलेलं कांस्यपदक हे स्वतंत्र भारतासाठी मिळवलेलं पहिलं वैयक्तिक पदक होतं. 1948 मध्ये लंडन ऑलिम्पिकमध्ये फ्लायवेट वजन गटातील कुस्तीत सहावा क्रमांक मिळवला होता. 1955 मध्ये खाशाबा जाधव पोलिस उपनिरीक्षक म्हणून महाराष्ट्र पोलिस दलात रुजू झाले. त्यांनी आंतरविभागीय कुस्ती स्पर्धेत अनेक कुस्त्या जिंकल्या. त्याचवेळी ते राष्ट्रीय स्तरावर क्रीडा मार्गदर्शक म्हणून काम करू लागले. पोलिस खात्यात 27 वर्षे नोकरी केल्यानंतर ते सहाय्यक पोलिस आयुक्त पदावरून निवृत्त झाले. 1984 मध्ये खाशाबा जाधव यांचे अपघाती निधन झाले. 2001 मध्ये त्यांना मरणोत्तर अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.
राकेश झुनझुनवाला यांचे निधन
मुंबई शेअर बाजारातील 'बिग बुल' अशी ओळख असलेले राकेश झुनझुनवाला यांचे (Rakesh Jhunjhunwala Passed Away) आजच्याच दिवशी निधन झाले होते. राकेश झुनझुनवाला यांचा जन्म 5 जुलै 1960 रोजी झाला. मुंबईतील सिडनहॅम महाविद्यालयातून त्यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर ते चार्टर्ड अकाऊंटंटही झाले. महाविद्यालयीन जीवनापासून राकेश झुनझुनवाला यांचा ओढा शेअर बाजाराकडे होता.
राकेश झुनझुनवाला यांनी 1985 च्या सुमारास अवघ्या पाच हजार रुपयांची गुंतवणूक केली. त्यांना पहिला नफा 1986 च्या सुमारास मिळाला. पहिल्याच गुंतवणुकीत झुनझुनवाला यांनी जवळपास तीन पट नफा मिळवला होता, असे म्हटले जाते. झुनझुनवाला यांनी 'टाटा टी' चे पाच हजार शेअर्स 43 रुपयांच्या दराने खरेदी केले होते. हेच शेअर त्यांनी 143 रुपयांना विकले. त्यानंतरच्या पुढील तीन वर्षात त्यांनी जवळपास 20 लाख रुपये कमावले. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. शेअर बाजारातील बिग बुल अशी ओळख त्यांना मिळाली होती.
2012 : विलासराव देशमुख यांचे निधन
महाराष्ट्राचे दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख (Vilasrao Deshmukh) यांची आज पुण्यतिथी आहे. 14 ऑगस्ट 2012 रोजी त्यांचं निधन झालं होते. लातूरमधील मराठवाडा भागातील विलासराव देशमुख हे एक मातब्बर राजकीय नेतृत्व होते. विलासराव देशमुख यांनी दोन वेळा महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद भूषवलं होतं. विलासराव देशमुख यांचा जन्म 26 मे 1945 रोजी लातूर येथील बाभळगाव येथे झाला होता. बाभळगाव ग्रामपंचायतच्या सरपंच पदापासून विलासराव यांनी राजकीय कारकीर्द सुरू केली होती. 18 ऑक्टोबर 1999 ते 16 जानेवारी 2003 आणि 1 नोव्हेंबर 2004 ते 4 डिसेंबर 2008 या काळात विलासराव देशमुख यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिलेय. मनमोहन सिंह मंत्रिमंडळात ते अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम खात्याचे केंद्रीय मंत्री होते.
विनायक मेटे यांचा स्मृतीदिन-
आजच्याच दिवशी 2022 मध्ये विनायक मेटे यांचं अपघाती निधन झालं होते. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर खालापूर टोलनाक्याजवळ पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास विनायक मेटे यांच्या गाडीला अपघात झाला. या अपघातात मेटे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर त्यांना पनवेलमधील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र तिथे उपचार सुरू असतानाच मेटे यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली.
30 जून 1970 रोजी शिवसंग्राम पार्टीचे अध्यक्ष विनायक मेटे यांचा बीडमध्ये जन्म झाला होता. मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनातील मेटे हे महाराष्ट्रातील प्रमुख नेते होते. मराठा आरक्षणासाठी मेटे यांनी अनेकदा आंदोलनं केली. अरबी समुद्रातील शिवस्मारक समितीचे ते अध्यक्ष देखील होते. बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील राजेगावचे रहिवासी होते. सर्वप्रथम शिवसेना भाजप युती सरकारच्या काळात आमदार होते. त्यानंतर सलग पाच टर्म विधानपरिषद सदस्य होते.
फाळणी वेदना स्मरणदिन Partition Horrors Remembrance Day
भारतामध्ये 14 ऑगस्ट हा दिवस फाळणी वेदना स्मरणदिन साजरा करण्यात येतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2021 मध्ये याबाबत घोषणा केली होती. शाची फाळणी कशी भयावह ठरली आणि त्याचा परिणाम आजही दिसून येतो हे लक्षात ठेवण्यासाठी 14 ऑगस्ट रोजी हा विशेष दिवस साजरा केला जाणार आहे.
14 ऑगस्ट : देशाचे दोन तुकडे
14 ऑगस्टची तारीख देशाच्या इतिहासात अश्रूंनी लिहिलेली आहे. हा तो दिवस होता जेव्हा देशाची फाळणी झाली आणि 14 ऑगस्ट 1947 रोजी पाकिस्तानला स्वतंत्र राष्ट्र आणि 15 ऑगस्ट 1947 रोजी भारतला स्वतंत्र राष्ट्र घोषित करण्यात आले. या फाळणीत केवळ भारतीय उपखंडाचेच दोन भाग झाले नाहीत, तर बंगालचेही विभाजन झाले आणि बंगालचा पूर्व भाग भारतापासून विभक्त होऊन पूर्व पाकिस्तान बनला, जो 1971 च्या युद्धानंतर बांगलादेश झाला.
म्हणायला ही फक्त देशाची फाळणी आहे, पण प्रत्यक्षात ते अंतःकरण, कुटुंब, नातेसंबंध आणि भावनांचे विभाजन होते. देशावर ही फाळणीची जखम शतकानुशतके राहील आणि येणाऱ्या पिढ्यांना या सर्वात वेदनादायक आणि रक्तरंजित दिवसाची छटा जाणवत राहतील.
पाकिस्तानचा स्वातंत्र्य दिन -
1947 च्या भारतीय स्वातंत्र्य कायद्याने इंग्रजांनी भारत आणि पाकिस्तान या देशाची निर्मिती केली. त्यामुळे भारत आणि पाकिस्तान यांचा स्वातंत्र्यदिन एकापाठोपाठ एक असतो. पाकिस्तानचा स्वातंत्र्य दिन भारताच्या एक दिवस आधी म्हणजे 14 ऑगस्ट आहे.
भारताची फाळणी माउंटबँटन योजनेनुसार करण्यात आली. प्रत्यक्ष फाळणीची प्रक्रिया "मांउटबॅटन योजने"नुसार पार पडली. ब्रिटिश सरकारने नेमलेल्या सिरिल रेडक्लिफ या आधिकाऱ्याने प्रत्यक्ष सरहद्द निश्चित केली. हिंदू बहुसंख्य असणारे प्रांत, विभाग भारतात आणि मुस्लिम बहुसंख्य असणारे प्रांत, विभाग पाकिस्तानमध्ये समाविष्ट करण्यात आले. ब्रिटिशांनी केलेली फाळणी सदोष असल्याचे म्हटले जाते. भारताची फाळणी करून भारत आणि पाकिस्तान या दोन देशांना स्वातंत्र्य देण्याबाबतचा ठराव ब्रिटीश संसदेत मांडण्यात आला. पुढे 18 जुलै 1947 रोजी ब्रिटीश संसदेने या ठरावाला मंजुरी दिली. त्यानंतर भारत आणि पाकिस्तान फाळणी झाली. 14 ऑगस्ट रोजी मध्यरात्री भारत आणि पाकिस्तान या देशांना इंग्रजांनी स्वतंत्र्य केले. भारतामध्ये 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिवस साजरा केला जातो तर पाकिस्तान 14 ऑगस्टला आपला स्वातंत्र्य दिवस साजरा करतो.
मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना -
आजच्याच दिवशी 1962 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना झाली होती. मुंबई उच्च न्यायालय हे भारतातील सर्वात जुन्या न्यायालायापैकी एक आहे. मुंबई उच्च न्यायालयाची खंडपीठे महाराष्ट्रात नागपूर आणि औरंगाबाद येथे तर गोव्यात पणजी येथे आहे. उच्च न्यायालयातील खटल्यांबाबत संकेतस्थळाला भेट देऊन आपल्याला पाहिजे असलेल्या प्रकरणाची माहिती, निर्णय मिळू शकतो.
जागतिक सरडा दिवस -
दरवर्षी 14 ऑगस्ट रोजी जागतिक सरडा दिवस साजरा केला जातो. या दिवसाला तसा कोणताही इतिहास नाही. फक्त काही पर्यावरणप्रेमी एकत्र येऊन हा दिवस साजरा करतात. जगभरात सरड्यांच्या जाती 50 हजारांपेक्षा जास्त आहेत.
1947 : भारताच्या घटनासमितीने सत्ता स्वीकारण्याचा ठराव मंजूर केला आणि लॉर्ड माऊंटबॅटन यांची स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल म्हणून नेमणूक केली.
गोदावरी परुळेकर यांची जयंती -
स्वातंत्र्यसैनिक गोदावरी परुळेकर यांची आज जयंती आहे. त्यांचा जन्म 14 ऑगस्ट 1908 रोजी पुण्यात झाला होता. ऐतिहासिक वारली आदिवासी उठावाच्या नेत्या गोदावरी परुळेकर यांच्या नेतृत्वात तलासरी, उंबरगाव, डांग आदी गुजरात सीमेवरील भागात संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन करण्यात आले. कॉम्रेड गोदावरी परुळेकर यांच्यामुळे आदिवासींनीदेखील संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत मोठा सहभाग घेतला. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या, सामाजिक कार्यकर्त्या व लेखिका म्हणून त्या ओळखल्या जातात. महाराष्ट्रातील पहिल्या स्त्री वकील म्हणून त्यांनी सनद मिळवली. तलासरी, डहाणू, शिरगाव या भागातील डोंगरदर्यांत फिरून वारल्यांच्या पिळवणुकीचे अनुभव त्यांनी ऐकले व आदिवासींमधे जागृतीचे कार्य केले. ’जेव्हा माणूस जागा होतो’ हे त्यांचे पुस्तक वेगळ्या जगाची ओळख करुन देणारे आहे.
जयवंत दळवी यांचा जन्म
मराठीतील प्रसिद्ध नाटककार आणि कथा-कादंबरीकार जयवंत दळवी यांची आज जयंती आहे. 14 ऑगस्ट 1925 रोजी जयवंत दळवी यांचा जन्म झाला होता. ते ’ठणठणपाळ’ या टोपणनावाने विनोदी आणि मार्मिक लेखन करीत. कथांवर आणि कादंबऱ्यांवर त्यांनीच नाटके लिहिली आणि ती प्रचंड गाजली, लोकप्रिय झाली. मराठीतील एक अभूतपूर्व कादंबरी म्हणून दळवींच्या 'चक्र'चा उल्लेख केला जातो. गहिवर, एदीन, रुक्मिणी, स्पर्श यासारखे कथासंग्रह दळवी यांनी लिहिलेत. चक्र, स्वगत, महानंदा, अथांग, अल्बम यासारख्या कादंबऱ्या दळवींच्या लेखणीतून आल्यात. संध्याछाया, बॅरिस्टर, सूर्यास्त, महासागर, पुरुष, नातीगोती यासारखी नाटके दळवी यांनी लिहिली.
जॉनी लीव्हर यांचा वाढदिवस -
प्रसिद्ध कॉमेडियन आणि अभिनेते जॉनी लीव्हर (Johny Lever) आज (14 ऑगस्ट) वाढदिवस आहे. जॉनी यांनी बॉलिवूडमध्ये एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. जॉनी लीव्हर यांचा जन्म 14 ऑगस्ट 1967 रोजी आंध्र प्रदेशातील कानिगिरी येथे झाला. त्यांनी 90च्या दशकांत अनेक चित्रपटांमध्ये आपल्या कॉमेडीने लोकांना खूप हसवले. शाहरुख खान, आमिर खान आणि अनिल कपूर यांसारख्या बड्या स्टार्ससोबत त्यांनी स्क्रीन शेअर केली. जॉनी लीव्हर यांनी आपल्या दमदार कॉमिक टायमिंगने लोकांना नेहमी हसवत ठेवले. जॉनी लीव्हर यांचे खरे नाव जॉन प्रकाशराव जानुमाला आहे. त्यांचे वडील प्रकाश राव जानुमाला हे हिंदुस्थान लीव्हरमध्ये ऑपरेटर म्हणून काम करायचे. जॉनी तीन बहिणी आणि दोन भावांमध्ये सर्वात मोठे होते. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती खराब असल्यामुळे ते शाळेची फी देखील भरू शकत नव्हते.
1982मध्ये रिलीज झालेल्या या चित्रपटातून जॉनी लीव्हर यांनी बॉलिवूडमध्ये धमाकेदार एन्ट्री केली. पण, 1993मध्ये प्रदर्शित झालेल्या अब्बास मस्तान दिग्दर्शित ‘बाजीगर’ या चित्रपटातून त्यांना बॉलिवूडमध्ये खरी ओळख मिळाली. या चित्रपटात जॉनी लीव्हर यांनी साकारलेल्या ‘बाबूलाल’च्या भूमिकेने त्यांना प्रेक्षकांच्या मनात जागा मिळवून दिली. जॉनी लीव्हर यांनी ‘राजा हिंदुस्तानी’, ‘जीत’, ‘जुदाई’, ‘कोयला’, ‘इश्क’, ‘एंटरटेनमेंट’, ‘गोल माल’ आणि ‘गोल माल रिटर्न्स’, ‘धमाल’, ‘टोटल धमाल’, ‘हाऊसफुल’ आणि ‘नवरा माझा नवसाचा’ अशा अनेक धमाकेदार चित्रपटांमध्ये काम केले.