मनोज जरांगे पाटलांच्या अत्यंत गंभीर आरोपांवर देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
माझा बळी घ्यायचा तर सागर बंगल्यावर घ्या, मी आता सागर बंगल्यावर येतो, मला गोळ्या घाला, पण खोटो आरोप सहन करणार नाही, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे.
आंतरवाली सराटी (जि. जालना) : मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी आज उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटीतून उपोषण थांबवत तडक आता मुंबईच्या दिशेने फडणवीसांच्या सागर या शासकीय बंगल्याच्या दिशेने निघाले आहेत. दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सातारा दौऱ्यावर आहेत. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी जरांगे पाटील यांच्या आरोपावर उत्तर देण्यास टाळलं आहे. पुन्हा विचारले असता ते म्हणाले की, मी ऐकलंच नाही आणि मी कशा कशाला उत्तर देऊ? असा पवित्रा घेतला. यानंतर ते तातडीने हेलिकाॅप्टरने सातारला रवाना झाले आहेत.
जरांगे पाटील यांनी आपल्याला मारण्याचा डाव होता असं आरोप केला आहे. मनोज जरांगे पाटील फडणवीस यांच्या शासकीय बंगला असलेल्या सागर बंगल्याच्या दिशेने येण्यास रवाना झाले आहेत .पाटील मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षणासाठी आग्रही आहेत. त्याचबरोबर त्यांनी सगसोयऱ्यांची अंमलबजावणी करण्यासाठी सुद्धा मागणी केली होती. मात्र, त्यांच्या मागण्या बाजूला ठेवून सरकारकडून स्वतंत्र 10 टक्के आरक्षणाची घोषणा करण्यात आल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाची हाक दिली होती. आज त्यांचा उपोषणाचा सोळावा दिवस आहे. गेल्या दोन तीन दिवसांपासून अजय बारसकर आणि संगीता वानखेडे यासारख्या सहकाऱ्यांकडून आरोप जरांगे पाटील यांच्यावर करण्यात आल्यानंतर जरांगे पाटील यांनी आज आंदोलनासाठी निर्णायक घोषणा करण्याची घोषणा केली होती.
पण खोट आरोप सहन करणार नाही
'माझा बळी घ्यायचा तर सागर बंगल्यावर घ्या, मी आता सागर बंगल्यावर येतो, मला गोळ्या घाला, पण खोट आरोप सहन करणार नाही. फडणवीस यावेळी तुमचा सुपडासाफ होणार. माझा बळी घ्या, पण खोटे आरोप करु नका,'' असंही जरांगे यांनी म्हटलं आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचं जालन्यातील आंतरवाली सराटीमध्ये आमरण उपोषण सुरुच आहे. रविवारी जरांगेनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मराठा समाजासमोर भाष्य केलं. यावेळी त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर अनेक आरोप केले आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या