Rain Forecast : रविवारीही अवकाळी पावसाचं संकट कायम, पुढील 72 तासात जोरदार पावसाचा अंदाज
Unseasonal Rain Prediction : आज रविवारीही राज्यावर अवकाळी पावसाचं संकट कायम आहे. पुढील 72 तासात जोरदार पावसाचा अंदाज आयएमडीकडून वर्तवण्यात आला आहे.
मुंबई : देशात सध्या अवकाळी पावसाचे (Unseasonal Rain) ढग दाटून आले आहेत. महाराष्ट्रातही अवकाळी पावसानं (Maharashtra Rain) थैमान घातलं आहे. राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसानं झोडपलं आहे. अनेक जिल्ह्यात शेती, फळबागांचे नुकसान झाल्याने शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. काही भागात गारपीटही झाली आहे. आज रविवारीही राज्यावर अवकाळी पावसाचं संकट कायम आहे. पुढील 72 तासात जोरदार पावसाचा अंदाज आयएमडीकडून वर्तवण्यात आला आहे.
पुढील तीन ते चार दिवस पावसाची शक्यता
भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, राज्यात पुढील तीन ते चार दिवस पावसाची शक्यता कायम आहे. तर, पुढील 48 तासात सोसाट्याच्या वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. काही भागांमध्ये गाटपीट आणि मुसळधार पावसाचा अंदाजही आयएमडीने वर्तवला आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे, राज्यासह देशात अवकाळी पावसासाठी अनुकूल वातावरण पाहायला मिळत आहे.
मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका पाऊस 30-40 kmph वेगाे येण्याची शक्यता आहे. तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी https://t.co/jw7yrf8Es5 भेट द्यI pic.twitter.com/Zcv8lmztSg
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) April 9, 2024
या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट
आज रविवारी भारतीय हवामान विभागाने विदर्भ, मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. आयएमडीने विदर्भ, मध्य महाराष्ट्रात पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
सोमवारपर्यंत देशाच्या विविध भागात पावसाचा अंदाज
रविवारी मध्य प्रदेशात आणि रविवारी पश्चिम उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा-चंडीगड-दिल्ली आणि राजस्थानमध्ये गडगडाटी वादळ, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवली आहे. आयएमडीने सोमवारपर्यंत उत्तर भारत आणि मध्य भारतात मोठ्या प्रमाणावर पाऊस, हिमवृष्टी आणि गडगडाटी वादळी पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
हिमवृष्टीसह पावसाची शक्यता
गडगडाटी वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा यासह अनेक ठिकाणी हलक्या ते तुरळक पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे. 15 एप्रिलपर्यंत जम्मू काश्मीर, लडाख, गिलगिट, बाल्टिस्तान हिमाचल प्रदेश, उत्तराखंडमध्ये गडगडाटी वादळासह हलका ते मध्यम पाऊस, हिमवृष्टी, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारे वाहण्याचा अंदाज आहे.