(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Heavy Rains in Marathwada : मराठवाड्यातील 67 मंडळांत दमदार पावसाची हजेरी, विभागातील काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी
Heavy Rains in Marathwada : मराठवाड्यातील 67 मंडळांत पावसाळा सुरू झाल्यापासून आजवर दमदार पाऊस झाला असल्याची नोंद झाली आहे.
Heavy Rains in Marathwada : जून महिन्यात पावसाने (Rain) पाठ फिरवल्यावर आता जुलै महिन्यात मात्र मराठवाड्यातील (Marathwada) अनेक भागात जोरदार बरसताना पाहायला मिळत आहे. मराठवाड्यातील 67 मंडळांत पावसाळा सुरु झाल्यापासून आजवर दमदार पाऊस झाला असल्याची नोंद झाली आहे. तर मागील तीन दिवसांपासून सलग विभागातील काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झाल्याची नोंद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे शुक्रवारी (7 जुलै) सकाळपर्यंत नांदेड जिल्ह्यातील पाच मंडळांत अतिवृष्टीची (Heavy Rains) नोंद झाली आहे.
मराठवाड्यातील पावसाची परिस्थिती
- मराठवाडा विभागात जून ते सप्टेंबर या काळात 679 मिमी पाऊस होणे अपेक्षित आहे.
- मागील वर्षी आजपर्यंत 191 मिमी पाऊस झाला होता.
- मराठवाड्यातील 67 मंडळांत पावसाळा सुरु झाल्यापासून आजवर दमदार पाऊस झाला असल्याची नोंद झाली आहे.
- आजपर्यंत 115 मिमी पाऊस झाला असून, 30 दिवसांच्या तुलनेत सरासरी पावसात 76 मिमी पावसाची तूट आहे.
- तर किमान 176 मिमी पाऊस होणे अपेक्षित होते. पावसाची तूट मोठी असल्याने त्याचा परिणाम पेरण्यांवर झाला आहे.
- तसेच 21 टक्क्यांच्या पुढे पेरण्यांचे प्रमाण अजून गेलेले नाही.
67 मंडळांत दमदार पावसाची नोंद
मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात गेल्या तीन-चार दिवसांत चांगला पाऊस झाला आहे. मात्र मोठ्या पावसाची अजूनही अपेक्षा आहे. दरम्यान औरंगाबाद जिल्ह्यातील 12 मंडळांत, जालन्यातील 3, बीडमधील 10, लातूरमधील 12, धाराशिव जिल्ह्यातील 4, नांदेड जिल्ह्यातील 16, परभणीतील 6, हिंगोली जिल्ह्यातील 4 मंडळांत आजवर अतिवृष्टीची नोंद झाली आहे.
नांदेड जिल्ह्यातील पाच मंडळांत अतिवृष्टीची नोंद
नांदेड जिल्ह्यातील शेतकरी दमदार पावसाची वाट पाहत असताना जिल्ह्यातील काही भागात गेल्या तीन-चार दिवसांत जोरदार पाऊस पडला आहे. गुरुवारी (6 जुलै) दिवसभरात किनवट तालुक्यातील दहेली मंडळात 89.25 मिमी, उमरी बाजार मंडळात 65 मिमी, माहूर तालुक्यातील वाई मंडळात 88 मिमी, सिंदखेड मंडळात 70.25 मिमी, हदगाव तालुक्यातील आष्टी मंडळात 74.50 मिमी पाऊस झाला आहे. या पाचही मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद घेण्यात आली आहे.
मोठ्या पावसाची अपेक्षा...
मराठवाडा विभागात काही भागात पाऊस पडला असला तरीही, काही भागात मात्र अजूनही दमदार पाऊस झालेला नाही. त्यामुळे झालेल्या पावसामुळे पिकांना फक्त जीवनदान मिळाले आहे. तर विहीर देखील अजून कोरड्याच आहेत. अशात शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची अपेक्षा आहे. जून महिना जवळपास कोरडाच गेल्याने आता पावसाचे तीन महिने उरले आहेत. त्यात जुलै महिन्याचा एक आठवडा देखील संपला आहे. त्यामुळे आता मोठ्या पावसाची गरज असल्याची अपेक्षा शेतकऱ्यांकडून बोलून दाखवली जात आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
Maharashtra Rain : आज कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा ऑरेंज अलर्ट, वाचा हवामान विभागाचा अंदाज