Marathwada Water Issue: मराठवाड्यातील 93 गाव-वाड्यांना 77 टँकरद्वारे पाणीपुरवठा; आणखी मागणी वाढू शकते
Marathwada Water Issue: मराठवाडा विभागातील तहानलेली 71 गावे व 22 वाड्यांची तहान 77 टँकरद्वारे भागवण्यात येत आहे.
Marathwada Water Issue: मराठवाड्यातील (Marathwada) शेतकऱ्यांचे लक्ष पावसाकडे (Rain) लागले असतानाच मान्सूनच्या आगमनापूर्वी विभागातील ग्रामीण भागात पाणी टंचाई (Water Issue) जाणवत आहे. त्यामुळे नागरिकांची तहान टँकरने भागवावी लागत आहे. सध्या मराठवाडा विभागातील तहानलेली 71 गावे व 22 वाड्यांची तहान 77 टँकरद्वारे भागवण्यात येत आहे. तसेच पुढील काही दिवसांत पावसाने उशीर केल्यास यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड आणि हिंगोली वगळता इतर जिल्हे मात्र टँकरमुक्त आहेत.
मराठवाडा विभागात दोन आठवड्यांपूर्वी 61 टँकर सुरू होते. मात्र आणखी ठिकाणी विहीर आणि बोअरवेलचे पाणी आटले आहे. तर प्रकल्प देखील कोरडेठाक पडू लागली आहे. त्यामुळे पाण्याच्या टँकरच्या मागणीत सातत्याने भर पडत आहे. पावसाळा सुरू झाला तरच टँकरची मागणी कमी होणार आहे. दरम्यान, सध्याची पाण्याची टंचाई लक्षात घेता विभागातील 707 विहिरींचे अधिग्रहणही करण्यात आले आहे. पण यात देखील वाढ होण्याची शक्यता आहे. दरम्यान प्रशासन विभागातील पाणी प्रश्नावर लक्ष ठेवून आहे.
उन्हाळ्यात मार्च, एप्रिलपर्यंत टँकरची मागणी नव्हती. परंतु त्यानंतर उन्हाचा वाढलेला पारा आणि पाण्याचे कायमस्वरुपी स्रोत नाही. सध्या मृग नक्षत्र सुरू असले तरी पावसाची प्रतीक्षा कायम आहे. परिणामी, तहानलेल्या गावातून टँकरची मागणी कायम असून, त्यात काही वाढ होत असल्याचे चित्र आहे. विभागीय प्रशासनाच्या 12 जूनच्या अहवालानुसार विभागातील 71 गावे, 22 वाड्यांना 9 शासकीय व 68 खासगी असे मिळून एकूण 77 टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.
कोणत्या जिल्ह्यात काय परिस्थिती...
- यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 34 गावांना 26 टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.
- यासह जालन्यात 23 गावे व 18 वाड्यांना 33 टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
- हिंगोली जिल्ह्यात 10 गावांना 12 टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा सुरु आहे.
- तर नांदेड जिल्ह्यातील तहानलेल्या 4 गावे व 4 वाड्यांना मिळून पाण्याचे एकूण 6 टँकर सुरू आहेत.
विभागातील सहा जिल्ह्यामधील 707 विहिरींचे अधिग्रहण
मराठवाड्यातील अनेक भागात आता पाणीटंचाई जाणवत आहे. विभागातील सहा जिल्ह्यामधील 707 विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 96, जालना 59, हिंगोली 229, नांदेड 203, बीड 93 तर लातूर जिल्ह्यात 27 ठिकाणच्या विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहेत. यात टँकरसाठी 54 गावांतील 50 विहिरींचे तर टँकर व्यतिरिक्त 549 गावांतील 657 खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. परभणी आणि धाराशिव जिल्ह्यात मात्र एकाही विहिरींचे अधिग्रहण करण्यात आलेले नाही हे विशेष आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
Weather Update : मराठवाड्यात शनिवारी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, शेतकऱ्यांना दिलासा मिळणार