(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Wardha : महिलांच्या संकल्पनेला साडेतीन कोटींचे फळ, वर्ध्यात उभारली कंपनी
Wardha news Update : वर्ध्यातील सिंदी मेघे येथील महिलांनी "नवी उमेद फार्मर प्रोड्यूसर शेतकरी कंपनी"च्या माध्यमातून तब्बल साडेतीन कोटींची उलाढाल केली आहे.
Wardha news Update : वर्धा शहरानजीक असलेल्या सिंदी मेघे येथे महिलांनी "नवी उमेद फार्मर प्रोड्यूसर शेतकरी कंपनी"ची स्थापना केली आहे. या कंपनीद्वारे महिलांनी तब्बल साडेतीन कोटींची उलाढाल केली आहे. संचालक व भागधारकांमध्ये फक्त महिलांचा सहभाग असलेली ही राज्यातील एकमेव शेतकरी कंपनी असावी, असे जाणकारांचे मत आहे. ही कंपनीने शेतमालाची खरेदी आणि विक्री करते.
सुनीता वाघमारे या सिंदी मेघे येथे एक बचत गट चालवत होत्या. या बचत गटाच्या माध्यमातून कापडी पिशव्या तयार करण्याचे काम केले जात होते. या कापडी पिशवांची विक्री विविध ठिकाणच्या प्रदर्शनांमधून होत असे. परंतु, एका गटात 10 ते 15 महिलांची मर्यादा होती. त्यामुळे व्यवसाय विस्तारासाठी लागणारे भांडवल उभारणीसाठी मर्यादा येत होत्या. त्यातून शेतकऱ्यांच्या मालाची खरेदी आणि विक्री करण्याची कंपणी उभी करण्याची संकल्पना या बचत गटातील महिलांना सुचली, असे सुनीता वाघमारे सांगतात.
बचत गटाच्या माध्यमातून संपर्कात असलेल्या सिंदी मेघे या गावा शेजारील 66 गावांमधून तीन हजार 500 महिलांकडून भागभांडवल गोळा करण्यात आले. यासाठी प्रत्येक महिलेकडून शंभर रूपये घेण्यात आले. शिवाय कंपनी उभारण्यासाठी ग्रामीण जीवन्नोती अभियानातून 15 लाख रुपयांचे अनुदान मिळाले.
दहा किंवा त्याहून अधिक स्वयंसहाय्यता समूहांचा मिळून ग्रामसंघ तयार होतो. तर 20 ते 25 समूह मिळून प्रभाग संघ तयार होतो. याला 'क्लस्टर लेवल फेडरेशन' म्हणून ओळखले जाते. या क्लस्टरची उलाढाल देखील वर्षाला सरासरी 60 ते 70 लाख रुपयांपर्यंत होते. सुनिता वाघमारे यांचे असे 12 संघ मिळून एक क्लस्टर आहे. तर वर्धा तालुक्यात अशाप्रकारचे 11 क्लस्टर आहेत. यातील अनेक समूहांनी डाळ मिलची उभारणी केली. त्याला शासकीय अनुदान मिळते. परंतु, त्यालाही मर्यादा आहेत. त्यामुळे अन्य पर्यायी प्रकल्पावर काम करण्याचा विचार सुरू झाला. त्यातूनच शेतकरी उत्पादक कंपनीच्या उभारणीवर सर्वांचे एकमत झाले. त्यातून वर्धा तालुक्यातील बचतगटाच्या 11 पैकी आठ क्लस्टरची निवड करण्यात आली. त्यातील दहा क्रियाशील सदस्यांची कंपनीच्या कार्यकारी संचालकपदी निवड करण्यात आली. यात अध्यक्ष ललिता सुभाष घायवट, उपाध्यक्ष दुर्गा चंद्रशेखर ढोंगळे, सचिव सुनीता यशवंत वाघमारे यांचा समावेश आहे.
महिलादिनी मिळाला पुरस्कार
नवी उमेद महिला शेतकरी कंपनीला 8 मार्च या महिला दिनादिवशी ग्रामीण जीवन्नोती अभियानांतर्गत पुरस्कार देऊन गौरविण्यातही आले आहे. 17 जुलै 2018 ला सुरू झालेल्या या कंपनीमध्ये आज तब्बल तीन हजार पाचशे महिलांचा सहभाग आहे.
चार वर्षांत साडेतीन कोटींची उलाढाल
शेतकरी शेतमालाचा नमुना घेऊन येतात. त्यावरून दर पटल्यास मालाचा पुरवठा कंपनीला होतो. त्यातूनच 2018 पासून कंपनीची उलाढाल साडेतीन कोटी रुपयांपर्यंत पोहचली आहे. खरेदी केलेल्या सोयाबीनचा हिंगणघाट येथील कंपनीला पुरवठा होतो. त्यासाठी संबंधित कंपनीच्या ऑनलाइन लिलाव प्रक्रियेत सहभागी व्हावे लागते. लिलावात दर नाकारला गेल्यास दिवसाला तीन वेळा या प्रक्रियेत सहभागी होता येते. संबंधित कंपनी सोयाबीन तेलाचे उत्पादन करते. त्यांच्याकडून घाऊक दरात तेल घेऊन गावपातळीवर समूहांना त्याचा पुरवठा केला जातो. या व्यवहारातून महिलांच्या कंपनीने लाखो रुपये नफा मिळवला आहे.
स्मार्ट प्रकल्पांतर्गत गोदाम तसेच धान्य प्रतवारी युनिट उभारणीसाठी प्रस्ताव दाखल करण्यात आला. एक कोटी 20 लाख रुपयांच्या प्रकल्पाला मान्यता मिळाली असून त्यासाठी देवळी रोडवरील सालोड येथे दोन एकर जागा उपलब्ध झाली आहे. महिलांच्या या उपक्रमाचे परिसरातून कोतुक होत आहे.