संतापजनक! मामेभावाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; घटनेनं वर्ध्यात खळबळ
आरोपीने पीडितेच्या घरात प्रवेश केला आणि पीडितेचे तोंड दाबून "आवाज करू नको" म्हणत तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला.
Wardha Crime Updates : वर्धा जिल्ह्यातील पुलगाव (Wardha Pulgaon) पोलीस ठाण्याच्या हद्दीत संतापजनक घटना उघडकीस आली असून चुलत मामेभावाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला आहे. मध्यरात्री पीडितेच्या घरात प्रवेश करून नराधमाने हे कृत्य केलं आहे. 16 वर्षीय पीडिता रात्री घरी झोपून असताना शिवाय तिचे कुटुंबीय घरी अंगणात झोपून असताना आरोपीने घरात प्रवेश करून मुलीशी बळजबरीने अत्याचार केला. एवढेच नाही तर "कोणालाही सांगितल्यास तुला मारून टाकीन" अशी धमकी देत घरातून पळून गेला. विशेष म्हणजे आरोपी हा विवाहित असून त्याला 3 महिन्याची एक मुलगीही आहे, असे असताना पीडित मुलगी आणि आरोपी यांचे गेल्या 6 वर्षांपासून संबंध होते, अशी माहितीही समोर आली आहे.
नेमकं काय घडलं?
काल मध्यरात्री अंदाजे 1 वाजताच्या दरम्यान पीडितेचे कुटुंबीय अंगणात छताखाली झोपून होते आणि पीडिता ही घरात झोपून असताना आरोपीने पीडितेच्या घरात प्रवेश केला आणि पीडितेचे तोंड दाबून "आवाज करू नको" म्हणत तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला. पीडितेचे वडील हे शेतात सुरू असलेली पाण्याची मोटर बंद करण्यासाठी झोपेतून उठले असता पीडितेचा ओरडण्याचा आवाज आला आणि त्यांना हा संतापजनक प्रकार दिसला. त्यानंतर घरातील सर्व सदस्य उठले, तेवढ्यात आरोपीने पळ काढला. कुटुंबीयांनी विचारपूस केल्यानंतर पीडितेने प्रेम संबंधांबद्दल माहिती देत आज घडलेला सर्व प्रकार कुटुंबियांना सांगितला. एवढंच नाही तर "आपल्या संबंधांबद्दल कोणालाही सांगितल्यास तुला जीवे मारून टाकीन" अशी धमकी देऊन आरोपी हा पीडितेवर वारंवार अत्याचार करत असल्याचीही माहिती पुढे आली आहे.
अखेर पीडितेची पुलगाव पोलिसांत तक्रार
आरोपी चुलत मामेभाऊ हा पीडित मुलीला जीवे मारण्याची धमकी देत सतत अत्याचार करत होता. आरोपीच्या सततच्या धमक्यांना कंटाळून आणि आज घडलेल्या प्रकारानंतर पीडितेने अखेर पुलगाव पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली असून पोलिसांनी आरोपी मामेभावावर अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे.
सततच्या अत्याचारांच्या घटनांनी हादरला वर्धा जिल्हा
वर्धा जिल्ह्यातील गुन्हेगारी घटनांमुळे जिल्हा हादरला असून वर्धा जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना बघायला मिळत आहे. त्यामुळे सततच्या अत्याचारांच्या घटना ऐकून नागरिकांकडून नराधमांवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या