Vishwajeet kadam on Sangli Loksabha : सांगलीची जागा आम्ही सोडणार नाही! टोकाची भूमिका घ्यावी लागली तरी चालेल; विश्वजित कदमांनी दंड थोपटले
Vishwajeet kadam on Sangli Loksabha : महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीमध्ये सांगलीची जागा ठाकरेंना सोडण्याबाबत एकमत झाल्यानंतर सांगलीमध्ये अंतर्गत वाद उफाळून आला आहे.
सांगली/मुंबई : महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) जागावाटपावरून अजूनही काथ्याकूट सुरू असतानाच सांगलीच्या (Sangli Loksabha) जागेवरून महाविकास आघाडीमध्ये मिठाचा खडा पडणार का? अशी शंका निर्माण झाली आहे. सांगलीची जागा आम्ही अजिबात सोडणार नाही, त्यासाठी टोकाची भूमिका घ्यावी लागली तरी चालेल, अशी ठाम भूमिका काँग्रेस आमदार विश्वजित कदम (Vishwajeet kadam on Sangli Loksabha) यांनी घेतल्याने सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये तिढा निर्माण झाला आहे.
सांगलीच्या जागेवरून रस्सीखेच सुरु
महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीमध्ये सांगलीची जागा ठाकरेंना सोडण्याबाबत एकमत झाल्यानंतर सांगलीमध्ये अंतर्गत वाद उफाळून आला आहे. या ठिकाणी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी काही दिवसांपूर्वीच मातोश्रीवर जाऊन जोरदार शक्तीप्रदर्शन करत ठाकरे गटात प्रवेश केला. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी चंद्रहार पाटील यांना उमेदवारीचे संकेत दिले होते. यानंतर सांगलीमध्ये काँग्रेसच्या गटामध्ये एकच खळबळ उडाली.
सांगलीवर महाविकास आघाडीमधील कोणत्याही मित्रपक्षांनी दावा करू नये
दरम्यान काही दिवसांपूर्वीच शिवसेनेत आलेल्या चंद्रहार पाटील यांना उमेदवारीचे संकेत मिळाल्याने जाहीर झाल्याने विश्वजीत कदम यांनी आक्षेप घेतला आहे. आज (18 मार्च) त्यांनी सांगलीच्या जागेवरून भूमिका स्पष्ट केली. कदम म्हणाले, की सांगली मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. काँग्रेसच्या विचारांचा हा मतदारसंघ आहे. महाविकास आघाडीमधील कोणत्याही मित्रपक्षांनी दावा करू नये आम्ही आमच्या जागेसाठी ठाम आहोत.
आम्ही जागा सोडणार नाही
सांगलीची जागा आम्ही कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही, असे त्यांनी सांगितले. उमेदवाराला विचारांची पाठराखण लागते. सांगलीकरांनी यावर निर्णय घेतला असून काँग्रेसची या ठिकाणी स्थानिक स्वराज संस्थेमध्ये ताकद आहे, असे त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, की संजय राऊत हे शिवसेना पक्षाचे नेते आहेत. ते वैयक्तिक काही सांगत असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे. मात्र आम्ही जागा सोडणार नाही.
दरम्यान, चंद्रहार पाटील आमचे मित्र असल्याचे विश्वजीत कदम यांनी नमूद केले. त्यामुळे आता या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये कलगीतुरा रंगण्याची चिन्हे आहेत.
काय म्हणाले होते संजय राऊत?
दरम्यान, संजय राऊत यांनी जागावाटपावरून भाष्य केले होते. जागावाटपाची चर्चा पूर्ण झाली असून सांगलीची जागा शिवसेना लढवणार असून त्या बदल्यात रामटेकची जागा काँग्रेसला दिली जाणार आहे. कोल्हापूर ही आमची जागा काँग्रेसला देण्यात येणार आहे. कोल्हापुरात शाहू महाराज हे आमचे उमेदवार असतील. कोल्हापूरच्या बदल्यात सांगलीची जागा शिवसेनेला देण्यात येईल. त्या ठिकाणी चंद्रहार पाटील यांची उमेदवारी घोषित केल्याचे म्हटले होते. राजू शेट्टी यांच्याशी चर्चा सुरु असल्याचेही ते म्हणाले होते.
इतर महत्वाच्या बातम्या