(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Shivbhojan केंद्रातील जेवणाच्या थाळ्या शौचालयात धुतल्या जाताहेत, यवतमाळमधील किळसवाणा प्रकार
यवतमाळमधील शिवभोजन केंद्रात ग्राहकांना दिली जाणारी थाळी जेवणानंतर शौचालयात धुतली जात असल्याचा किळसवाणा प्रकार एका व्हायरल व्हिडीओच्या माध्यमातून समोर आला आहे.
यवतमाळ : ग्रामीण भागातील गरीब नागरिक शहरात आल्यानंतर ते उपाशी राहू नये यासाठी राज्य सरकारने शिव भोजनथाळी सुरु केली. मात्र यवतमाळ जिल्ह्याच्या महागाव येथील शिवभोजन थाळी केंद्रातील भयाण आणि गलिच्छ प्रकार समोर आला आहे. या केंद्रात ग्राहकांना दिली जाणारी थाळी जेवणानंतर शौचालयातील पाण्याने धुतली जात असल्याचा किळसवाणा प्रकार एका व्हायरल व्हिडीओच्या माध्यमातून समोर आला आहे. त्यामुळे चांगलीच खळबळ उडाली.
विशेष म्हणजे हे शिवभोजन थाळी केंद्र राजकीय पक्षाच्या महिलेचं असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे असा गलिच्छ प्रकार करुन सरकारच्या हेतूला हरताळ फसला जात आहे. अशाप्रकारे गलिच्छ जागेवर भांडी धुवून त्याच थाळीत पुन्हा भोजन देत असल्याने गरिबांची थट्टाच उडवली जात आहे. आता या शिवभोजन थाळी केंद्र चालकांवर काय कारवाई केली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. यासंदर्भात शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजेंद्र गायकवाड यांनी झालेल्या प्रकारामुळे संबंधित केंद्र रद्द करुन शासनाने चालकावर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
महागावतील शिवभोजन थाळी केंद्र रद्द करण्याचे तातडीचे आदेश -
यवतमाळ- महागाव येथील त्रिमूर्ती महिला बचत गटाच्या शिवभोजन थाळी केंद्रात शौचालयात भांडी धुतली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला होता. या प्रकरणाची मुख्यमंत्री कार्यालयाकडून दखल घेण्यात आली असून चौकशी समिती नेमण्यात आली होती.
मुख्यमंत्री कार्यल्याकडू याबाबतची विचारना जिल्हा पुरवठा अधिकारी सुधाकर पवार यांना केली असून या प्रकरणी पाहणी साठी एक पथक महागाव येथे पाठविण्यात आले होते. यात निरीक्षक अधिकारी, व्ही. एन. रावलोड, महसूल नायब तहसीलदार एस. एस. अदमूलवार आणि पुरवठा निरीक्षक डी.डी.आडे यांनी या शिवभोजन थाळी केंद्राची पाहणी केली आहे. यावेळी या केंद्राच्या संचालिका सुरेखा नरवाडे व केंद्रातील कामगार यांचे बयान सुद्धा समितीने नोंदविले आहे. महागावातील शिवभोजन केंद्राचा अहवाल शासनाला प्राप्त होताच अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी या केंद्राचा परवाना तातडीने रद्द करण्याचे आदेश जिल्हा पुरवठा अधिकारी सुधाकर पवार यांना दिले आहे.
शिवभोजन थाळीचा उद्देश
राज्यातील एक घटक असा आहे की, त्याला एक वेळ जेवण मिळण्याची भ्रांत आहे. ज्यांना रोजगार नाही, ते शहरात रोजगारासाठी जातात. मात्र उत्पन्न अत्यल्प असल्याने त्यांना स्वस्तात भोजनाची सोय नसल्याने भोजनासाठी जास्तीचे पैसे मोजावे लागतात. तसंच शासकीय कामानिमित्त शहरात, जिल्ह्याच्या गावात किंवा तालुक्याच्या गावात आल्यानंतर गरिबांना अत्यल्प दरात जेवण मिळावं, अशी अपेक्षा असते. ही गरज ओळखून तसंच समाजातील गरीब आणि कष्टकऱ्यांना किमान एक वेळ पोटभर जेवण मिळावं, या उद्देशाने राज्य सरकाने 2020 साली शिवभोजन थाळी योजना सुरु केली आहे. या गरीब आणि वंचित घटकांना शिवभोजन थाळी योजनेमुळे किमान एक वेळच्या जेवणाची हमी मिळाली आहे. परंतु यवतमाळच्या शिवभोजन केंद्रावर गरीब आणि कष्टकऱ्यांची थट्टा होत असल्याचं समोर आलं आहे. केंद्रातील जेवणाच्या थाळ्या शौचालयात धुतल्या जात असल्याचा घाणेरडा प्रकार समोर आला. त्यामुळे इथे जेवायला येणाऱ्यांच्या आरोग्याशी खेळ सुरु आहे.