(Source: ECI/ABP News/ABP Majha)
विनायक मेटेंचं शेवटचं भाषण; हरिनाम सप्ताहाच्या कार्यक्रमात उपस्थितांना खळखळून हसवलं अन् !
Vinayak Mete News : शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे (Vinayak Mete) यांचं अपघाती निधन झालं. विनायक मेटे यांचा शेवटचा सार्वजनिक कार्यक्रम हा बीड तालुक्यात होता.
Vinayak Mete News : शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे (Vinayak Mete) यांचं अपघाती निधन झालं. मेटे यांच्या निधनानंतर सर्व स्तरांतून हळहळ व्यक्त केली जात आहे. विनायक मेटे यांचा शेवटचा सार्वजनिक कार्यक्रम हा बीड तालुक्यात होता. बीड तालुक्यातील गोरक्षनाथ टेकडी येथे संत ह.भ.प.वै.किसन बाबा यांच्या 24 व्या पुण्यतिथीनिमित्त ह.भ.प.शांतिब्रम्ह नवनाथ बाबा यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता ह.भ.प.संजय महाराज पाचपोर यांच्या काल्याची कीर्तनाने झाली. या अखंड हरिनाम सप्ताह सांगतेवेळी जिल्हाभरातून लाखोंच्या संख्येने भाविक भक्तांची उपस्थिती होती. या किर्तनानंतर मेटे यांनी तेथील जनसमुदायशी संवाद साधला. पुढच्या वर्षी 25 ते 30 हजार भाविक बसू शकतील असा सभामंडप बांधू असा शब्द त्यांनी यावेळेस दिला होता. आपल्या छोट्याशा भाषणात त्यांनी सर्व उपस्थित जन समुदायास खळखळून हसवले देखील होते.
असा होता विनायक मेटे यांचा कालचा कार्यक्रम
मेटे यांनी बीड शहरातल्या शिवसंग्राम भवनमध्ये काल सकाळी 11 वाजता तिरंगा रॅली संदर्भात कार्यकर्त्यांची बैठक घेतली. दुपारी एक वाजता त्यांच्या मूळ गावी राजेगावला गावाकडे जाऊन घरी भेट दिली. राजेगाव केजला आल्यानंतर केजमध्ये चार वाजता कार्यकर्त्यांसोबत बैठक घेतली. केज होऊन अंबाजोगाईला गेल्यानंतर अंबाजोगाईमध्ये कार्यकर्त्यासोबत 6 वाजता रेस्ट हाऊसला बैठक घेतली. कालचे रात्रीचे जेवण नऊ वाजता अंबाजोगाईच्या रेस्ट हाऊस वर केले. त्यानंतर अकरा वाजता बीडला पोहोचले आणि त्यानंतर पुढे आजच्या होणाऱ्या मुंबईच्या मीटिंगसाठी निघाले. विनायक मेटे त्यांची आज अकरा वाजता बीड शहरामध्ये तिरंगा रॅली आयोजित करण्यात आली होती. मात्र अचानक मुंबईमध्ये आज मराठा आरक्षणासाठी बैठक लावल्याने ते मुंबईला गेले. मेटे हे कार्यकर्त्यांना सांगून गेले की ते त्या रॅलीला उपस्थित राहू शकत नाहीत.
बीड शहरातील डीपी रोड परिसरात विनायक मेटे यांच्यावर होणार अंत्यसंस्कार
शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यूनंतर बीड शहरावर शोककाळा पसरली आहे. मेटे यांचं पार्थिव मुंबईवरून बीड शहरामध्ये रात्री आणले जाईल आणि त्यानंतर बीड शहरातील शिवसंग्राम कार्यालयासमोर अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल. उद्या अंतदर्शन झाल्यानंतर विनायक मेटे यांची अंत्ययात्रा अण्णाभाऊ साठे चौक मार्गे जालना रोडकडून डीपी रोडवर असणाऱ्या विनायक मेटे यांच्या शेतात आणलं जाईल. तिथं त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. या ठिकाणी प्रशासनाकडून अंत्यसंस्कारासाठी जोरदार तयारी सध्या सुरू आहे.