एक्स्प्लोर
इथे ना रस्ता आहे, ना कसली सुविधा, महाराष्ट्रातलं धक्कादायक वास्तव
गावात शाळेची सोय नसल्याने गावातील जवळपास 50 विद्यार्थी पाच किमी अंतराची पायपीट करत दुमडा नदी ओलांडून शहापूर तालुक्यातील पिवळी येथे शिक्षणासाठी जातात.
ठाणे : गावापासून शाळेत पायी पाच किमी चालत जायचं, पावसाळ्यातही नदीच्या पाण्यातून वाट काढायची, शाळेता जाताना-येताना जंगलातील चिखलाचा रस्ता तुडवायचा, कुणी आजारी पडलं तर चादरीची झोळी करुन त्याला उचलून न्यायचं... हे धक्कादायक वास्तव आपल्या महाराष्ट्रातलं आहे. भिवंडी तालुक्यातील काही गावांमधली ही परिस्थिती आहे.
भिवंडी तालुक्यातील मैंदे ग्रामपंचायत हद्दीतील बिजपाडा, बात्रे पाडा, रावते पाडा, ताडाची वाडी, बेडे पाडा या पाच आदिवासी पाड्यांवर सुमारे एक हजार लोकवस्ती आहे. त्यांना पावसाळ्यात गावात जाण्यासाठी रस्ता नसल्याने जवळपास दोन किमी गुडघाभर पाणी आणि चिखल तुडवत आपल्या घरी जावं लागतं.
गावात शाळेची सोय नसल्याने गावातील जवळपास 50 विद्यार्थी पाच किमी अंतराची पायपीट करत दुमडा नदी ओलांडून शहापूर तालुक्यातील पिवळी येथे शिक्षणासाठी जातात. नदीला जास्त पाणी असल्यास मुलं आई-वडिलांना बोलावून नदी पार करतात. पाण्याची पातळी वाढली तर या विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी लांबचा रस्ता म्हणजे 7 ते 8 किमी अंतरावरील पुलावरुन यावं लागतं. संपूर्ण वाट ही जंगलातून असल्याने सर्प दंशाची भीती कायम भेडसावत असते.
एरवी केवळ निवडणुकीच्या काळातच तोंड दाखवणारे लोकप्रतिनिधी, शासकीय यंत्रणा यांचं या समस्येकडे दुर्लक्ष होत आहे .त्यामुळे पाड्यावरील रुग्णांना जर अचानक रुग्णालयात नेण्याची वेळ आली तर चादरींची झोळी करून गावाबाहेर आणून त्यानंतर वाहनाने प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी न्यावं लागतं.
शाळेत जाण्यासाठी मुलांना नदी ओलांडावी लागते
या पाच आदिवासी पाड्यांवरील सुमारे 50 विद्यार्थी पाचवी ते दहावी पर्यंतचं शिक्षण घेतात. त्यांना जवळची माध्यमिक शाळा म्हणजे नदीच्या पलिकडील शहापूर तालुक्यातील पिवळी येथील किल्ले माहुली शाळा आहे. त्यासाठी येथील विद्यार्थ्यांना पावसाळ्यात जंगलातील वाट तुडवत दुमडा नदी पार करून सुमारे पाच किमी पायपीट करून शाळेत पोहोचावं लागतं.
नदीला पाणी वाढलं की अजून तीन किमीचा प्रवास करून लांबच्या पुलावरून कांदळी वरून त्यांना आपल्या घरी यावं लागतं. दररोज हा पाच किमीचा प्रवास करून सुमारे पन्नासहून अधिक विद्यार्थी या शिक्षणासाठी जात असतात. पावसाळ्यात त्यांना या वाटेत बऱ्याच वेळा सर्पदंशही होतो. मात्र शिक्षणाच्या ओढीने या विद्यार्थ्यांची, ज्यामध्ये विद्यार्थिनींची संख्या अधिक आहे, त्यांची पायपीट सुरु आहे.
नदीतील पाणी कमी असताना त्यामधून सर्व विद्यार्थी सर्रासपणे ती ओलांडून येत असतात. कधी पाणी वाढलं, की विद्यार्थ्यांचा जीवावर बेतून हा प्रवास सुरु असतो. कधी पाण्यात पोहून, तर कधी हाताची साखळी करुन हे विद्यार्थी नदी पार करतात. या विद्यार्थ्यांना पाण्याबाहेर काढण्याची वेळ ग्रामस्थांवर अनेकदा आली आहे.
बाराही महिने हाल, पावसाळ्यात मरणयातना
भिवंडी तालुक्यातील तानसा पाईपलाईन नजीकचे तालुक्यातील मैंदे हे शेवटचे गाव. मैंदे कांदळी ग्रुप ग्रामपंचायत असून या ग्रामपंचायत हद्दीत तब्बल पाच आदिवासी पाडे आहे. इथे एक हजारहून अधिक लोकवस्ती आहे. बिजपाडा, बात्रे पाडा, रावते पाडा, ताडाची वाडी, बेडे पाडा या वस्तीवर संपूर्ण मुलभूत सुविधांचा अभाव आहे.
या गावात जाण्यासाठी गेल्या 15 वर्षात कधीही रस्ता बनवण्यातच आला नाही. 15 वर्षांपूर्वी एकदा खडीकरण झाल्याची माहिती नागरिक देतात. मात्र त्यानंतर प्रत्येक निवडणुकीत विविध राजकीय पक्षांच्या नेते मंडळींकडून फक्त आश्वासनं देऊन वेळ मारून नेली जाते. त्यामुळे येथील वस्तीवरील गरीब मजुरी करणाऱ्या आदिवासी खेडुतांना बाराही महिने पायपीट करावी लागते.
मात्र पावसाळ्याच्या चार महिने या रस्त्यावर गुडघाभर पाणी साचतं. त्यामधून कसाबसा रस्ता काढत, चिखल तुडवत दोन किमी अंतरावरील आपल्या वस्तीवर पोहोचण्याची कसरत या ग्रामस्थांना करावी लागते. ही सर्व परिस्थिती सांगताना त्यांना संतापही येतो. मात्र ढिसाळ प्रशासन आणि केवळ मतदानासाठी आठवण काढणाऱ्या राजकारण्यांसमोर ग्रामस्थ हतबल आहेत.
ग्रामस्थांना मुलभूत सुविधांपासून वंचित रहावं लागत आहे. गावातील सामाजिक कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या तोंडावर रस्ता बनवून देण्याचं आश्वासन देऊन निवडणुकीची वेळ मारून नेली जाते. मात्र त्यानंतर जैसे थे.. परिस्थितीत बदल होत नाही. त्यासाठी उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, आदिवासी विकासमंत्री जे या भागाचे 2009 पर्यंत तब्बल 25 वर्ष प्रतिनिधित्व करत होते, त्यांच्याकडे पत्रव्यवहार केला, मात्र आजपर्यंत या पाड्यांवर कधी रस्ता बनलाच नाही, असं ग्रामस्थ सांगतात.
रुग्णांचे पावसाळ्यात हाल
रुग्णांचे पावसाळ्यात मोठे हाल होतात. एखादा खेडूत आजारी पडल्यास त्याला चादरींची झोळी करुन दोन-अडीच किमी अंतरावरील मैदे येथे आणल्यानंतर तेथून एखाद्या वाहनाने दाभाडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी घेऊन जावं लागतं.
या दरम्यान गरोदर महिला दगावण्याची शक्यता असते, त्यामुळे याला जबाबदार कोण असाही प्रश्न उपस्थित होतो. गरोदर महिला आणि बाळ लसीकरण करण्यासाठी या पाड्यांवर रस्ता नसल्याने प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिचारिका येऊ शकत नाहीत. त्यामुळे येथील आरोग्य विषयक कार्यक्रम कसे राबवणार असा सवाल आशा वर्कर म्हणून करणाऱ्या महिलेने केला आहे.
शिक्षकांचेही हाल
या पाच आदिवासी पाड्यातील विद्यार्थ्यांसाठी बिजपाडा येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चौथीपर्यंत आहे. तेथे 27 पटसंख्येसाठी दोन शिक्षक असून रस्त्याच्या अडचणीमुळे या पाचही पाड्यांमधील विद्यार्थी शिक्षणासाठी पावसाळ्यात अनेक वेळा गैरहजर राहतात. कधी-कधी त्यांना घरापर्यंत पोहचवणं भाग पडतं. त्यासोबतच शिक्षकांनाही दररोज या पाण्यातून पायी शाळेत पोहोचावं लागतं.
सर्वसामान्य जीवन जगणाऱ्या कुणाचाही संताप होईल, अशी ही परिस्थिती आहे. मात्र देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईपासून काही किमी अंतरावरील हे धक्कादायक वास्तव आहे. सरकार, प्रशासन यांनी या भागात इच्छाशक्ती दाखवून काम करणं गरजेचं आहे. अन्यथा कितीही सरकारी योजनांची घोषणा केली, तरी त्या कुणासाठीही लाभदायक ठरणार नाहीत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement