सोशल मीडियाच्या माध्यमातून गावची ग्रामपंचायत बिनविरोध, मतदानाच्या दिवशी गावकऱ्यांनी बांधले बंधारे
तरुणांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून गावची ग्रामपंचायत बिनविरोध केली आहे.इतकचं नाही तर मतदानाच्या दिवशी गावकऱ्यांनी एकत्र येत बंधारे बाधले आहेत.
चिपळूण : ग्रामपंचायत निवडणूक म्हटलं तर मोर्चेबांधणी आलीच. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चार-पाच महिने गावागावांत प्रत्येक पुढारी आपापल्यापरीने मोर्चेबांधणीला सुरुवात करतो. गावातील वार्डात घरोघरी जाणे, फिरणे आणि त्यातूनच आपला प्रचार करणे हे सर्व आलाचं. पण एखादी ग्रामपंचायत बिनविरोध निवडून आली तर काय बदल घडतो, याचं उत्तम उदाहरण म्हणजे चिपळूण तालुक्यातील दहीवली खुर्द गाव.
या गावात युवकांनी एकत्र येउन सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हॉट्सॲपवर एक गृप तयार केला. या ग्रुपच्या माध्यमातून वाडीतील युवकांना एकत्र बोलावून ग्रामपंचायत निवडणुकीच्या चार महिने आधी गावातच सभा लावली. या सभेत गावाच्या विकासासाठी राजकीय मतभेद बाजूला ठेवून सर्वांनीच एकत्र आले पाहिजे यावर सर्वांचे एकमत झाले. त्यानंतर सभेत ग्रामविकास समिती या नावाने व्हॉट्सॲप ग्रुप काढण्यात आला. या ग्रुपच्या माध्यमातून ग्रामपंचायत निवडणुकीसंदर्भात प्रत्येकाची मते जाणुन घेतली आणि सभेत ग्रामपंचायत बिनविरोध केली.
..त्यावेळी दहीवलीचे गावकरी विकासकामात गुंतली होती ग्रामपंचायत निवडणुकीला चार महिने असताना हा निर्णय घेण्यात आला. आता हे चार महिने करायचे काय तर गावातील विविध समस्या युवकांनी जाणून घेतल्या. त्यात महत्वाची समस्या म्हणजे पाण्याची. दरवर्षी आपल्या विहिरी कोरड्या पडतात. पाण्याची पातळी कमी होते. पाण्याची समस्या सोडविण्यासाठी गावच्या वाहणाऱ्या नदीला बंधारे बांधण्यात आले. या बंधाऱ्यामुळे गावातील नद्या; बोरवेलच्या पाण्यांची पातळी वाढली आहे. त्यामुळे गावात घरोघरी नळपाणी योजना राबविण्यात आली. वाढलेल्या पाण्याच्या पातळीमुळे शेतीयुक्त मुबलक पाणी मिळाले. या पाण्यावर गावात पडीक असलेल्या जमिनीवर फळबागा करु लागले. त्यात त्यांना अधिकाधिक उत्पन्नही मिळु लागले. या बांधलेल्या बंधाऱ्याचा फायदा गावकऱ्यांना तर झालाच. या बंधाऱ्याचे लोकार्पण मतदानाच्या दिवशी करण्यात आले. यासारखे अजूनही बंधारे बांधण्याचा संकल्प गावकऱ्यांनी केला आहे. ग्रामपंचायत बिनविरोध झाली तर काय होऊ शकते. याचं उत्तम उदाहरण म्हणजे दहीवली खुर्दची ग्रामपंचायत.