अंगावर गोमूत्र शिंपडताना शांत उभे राहा, हालचाल करु नका; काँग्रेस सोडल्यानंतर वडेट्टीवारांच्या बाबा सिद्दीकींना खोचक शुभेच्छा
Baba siddique quits congress: बाबा सिद्दीकी यांच्या जाण्याने मुंबईत काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसणार असल्याचे मानले जात आहे. मात्र, विजय वडेट्टीवार यांनी हा दावा फेटाळून लावला आहे. बाबा सिद्दीकी यांच्यावर खोचक टीका
मुंबई: बाबा सिद्दीकी पक्षातून बाहेर पडल्याने काँग्रेसला मुंबईत कोणताही धक्का बसणार नाही. ते आता अजित पवार गटात प्रवेश करत असल्याने त्यांना भाजपचा धार्मिक अजेंडा राबवण्याचे काम करावे लागेल. पुढील राजकीय वाटचालीसाठी त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. मात्र, आता नव्या पक्षात अंगावर गोमूत्र शिंपडताना त्यांनी शांतपणे उभे राहावे, हालचाल करु नये, अशा खोचक शब्दांत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी सिद्दीकी यांना लक्ष्य केले. ते गुरुवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. बाबा सिद्दिकी (Baba Siddique) यांनी गुरुवारी सकाळी ट्विट करत काँग्रेसच्या सदस्यत्त्वाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली. गेल्या काही दिवसांपासून बाबा सिद्दीकी हे अजित पवार (Ajit Pawar) गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. आता ते लवकरच अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी बाबा सिद्दीकी यांच्यावर टीकास्त्र सोडले.
राज्यातील काही नेत्यांना ईडीचे समन्स आले आहे. हे नेते चौकशीच्या फेऱ्यात आहे. हे सर्व नेते त्यांना संरक्षण मिळेल, त्या पक्षात जात आहेत. गेल्या महिनाभरापासून बाबा सिद्दीकी अजित पवार गटात जाणार, अशी चर्चा होती. अजित पवार गटात गेल्यामुळे बाबा सिद्दीकी यांना काहीतरी घबाड मिळत असेल आणि त्यांच्या जुन्या पापांमधून मुक्ती मिळत असेल. आता त्यांनी अंगावर गोमूत्र शिंपडताना हालचाल न करता शांतपणे उभे राहण्याची सवय करुन घेतली पाहिजे. बाकी त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीसाठी माझ्या शुभेच्छा आहेत, असे वडेट्टीवार यांनी म्हटले. यावेळी वडेट्टीवार यांनी बाबा सिद्दीकी यांच्या जाण्याने काँग्रेस पक्षाला मुंबईत कोणतेही नुकसान होणार नसल्याचा दावा केला. बाबा सिद्दीकी आता अजित पवार यांच्यासोबत जाणार आहेत. अजित पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह मिळाले आहे. मात्र, ते आगामी काळात भाजपच्या इशाऱ्यावरच काम करतील, ही बाब महाराष्ट्रातील जनतेला माहिती आहे. अजित पवार हे भाजपचा अजेंडा राबवणार आहे. त्यामुळे त्यांच्यासोबत जाणाऱ्या बाबा सिद्दीकी यांनाही भाजपचा धर्मांध आणि जातीयवादी अजेंडा राबवण्याचे काम करावे लागणार आहे. जर एखादा माणूस धर्मांध शक्तींसोबत हातमिळवणी करत असेल तर धर्मनिरपेक्ष विचारांची मंडळी विचलित होणार नाहीत. त्यामुळे बाबा सिद्दीकी यांच्या जाण्याने काँग्रेस पक्षावर कोणताही परिणाम होणार नाही, असे वडेट्टीवार यांनी ठामपणे सांगितले.
I joined the Indian National Congress party as a young teenager and it has been a significant journey lasting 48 years. Today I resign from the primary membership of the Indian National Congress Party @INCIndia with immediate effect. There’s a lot I would have liked to express…
— Baba Siddique (@BabaSiddique) February 8, 2024
मिलिंद देवरा यांच्यानंतर बाबा सिद्दीकी यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याने आगामी विधासभा निवडणूक आणि मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या अडचणी वाढणार असल्याची चर्चा आहे. याशिवाय, काँग्रेस नेते झिशान सिद्दीकीही राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा आहे. याविषयी विचारणा केली असता वडेट्टीवार यांनी फार बोलण्यास नकार दिला. आम्ही झिशान सिद्दीकी यांना समजवण्याचा प्रयत्न करु. मला त्यांच्याशी बोलावं लागेल. त्यांच्याविषयी आताच काही बोलता येणार नाही, असे वडेट्टीवार यांनी सांगितले.
आणखी वाचा
मोठी बातमी! मुंबई काँग्रेसला धक्का, बाबा सिद्दीकींनी पक्षाला केला रामराम!