महाराजांचा पुतळा पडला म्हणजे हे भ्रष्टाचाऱ्यांच्या सरकारचे पाप : विजय वडेट्टीवार
महाराजांचा पुतळा यांनी पाडला, भविष्यात महायुतीचे हे भ्रष्टाचारी सरकार याच मातीत गाडले जाईल अस विजय वडेट्टीवार म्हणाले.
मुंबई : नशीब उद्घाटनाच्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati shivaji maharaj) पुतळा पडला नाही, नाहीतर त्यावेळेस अनेकांचे जीव गेले असते अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिली. दीपक केसरकर यांच्या वक्तव्यावर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. महाराजांचा पुतळा पडला म्हणजे हे भ्रष्टाचाऱ्यांच्या सरकारचे पाप आहे, असे ते म्हणाले.
पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन झाल्यानंतर इतक्या निकृष्ट दर्जाचं काम कसं होऊ शकतं असा प्रश्न वड्डेटीवार यांनी उपस्थित केला. महाराजांचा पुतळा यांनी पाडला, भविष्यात महायुतीचे हे भ्रष्टाचारी सरकार याच मातीत गाडले जाईल अस विजय वडेट्टीवार म्हणाले. लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या, त्याचा बदला जनता घेईल असं वड्डेटीवार म्हणाले.
महाराष्ट्राला खड्ड्यात घालण्याचं काम सध्या सुरु : विजय वडेट्टीवार
सत्ताधाऱ्यांचा भ्रष्टाचार आणि गैरमार्गाने कमवलेला पैसा त्या बँकेत सुरक्षित आहे त्यामुळे मुंबै बँकेला ती जागा देण्यात आली असं माझं ठाम मत आहे अशी प्रतिक्रिया विजय वडेट्टीवार यांनी दिली. जवळपास 17 मोक्याच्या जागा गुजरातच्या मालकाला यांनी कवडीमोल भावाने देऊन टाकल्या. आता उरल्या सुरल्या जमिनी आपल्या चेल्याचपाट्यांना देण्याचा नवीन धंदा महाराष्ट्रात सुरू झालाय. जमिनीची विल्हेवाट लावत असताना त्याला नियम कायदा काही लावायचा नाही. सगळे नियम धाब्यावर बसवून आपल्या चेल्याचपाट्यांना पोसण्यासाठी हे सगळे उद्योग सुरू आहेत. आता उरल्या सुरल्या जमिनी विकून महाराष्ट्राला खड्ड्यात घालण्याचं काम ही मंडळी करत आहे असंही वडेट्टीवार म्हणाले.
पाच वर्षात सरकारने तिजोरी साफ केली : विजय वडेट्टीवार
सर्रास तोडपाणी सुरू आहे , टेंडर मॅनेज केले जातात, मागच्या दोन वर्षात पाच लाख कोटीचे टेंडर झाले असं वड्डेटीवार म्हणाले. पाच वर्षात यांनी तिजोरी साफ केली. यांना चोर म्हणता येईल, लुटेरे, डाकू , महाडाकू म्हणता येईल असं हे सरकार आहे अशी टीका वड्डेटीवार यांनी केली.
8 महिन्यांत राजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा पुतळा कोसळला
नौदल दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या तलवारधारी पुतळ्याचं लोकार्पण केलं. प्रत्येक शिवप्रेमींचा ऊर अभिमानानं भरून आला.. मात्र आज त्याच शिवरायांसमोर मान शर्मेनं खाली घालण्याची वेळ ओढवलीय. महाराज आम्हाला माफ करा असं म्हणण्याची वेळ आलीय. कारण अवघ्या 8 महिन्यांत राजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा पुतळा कोसळलाय. एकीकडे महाराष्ट्राच्या आराध्य देवताचा पुतळा कोसळल्यामुळे शिवप्रेमी हळहळ व्यक्त करत आहेत.