महायुती सरकारमध्ये अँम्ब्युलन्स घोटाळा, 8 हजार कोटींच्या खर्चांचा वडेट्टीवारांचा आरोप
Vijay Wadettiwar News : 800 कोटी रूपयात होणाऱ्या या कामासाठी 8 हजार कोटी खर्च करण्यामागे महायुतीत सरकारमधील मंत्र्यांची काय योजना आहे हे राज्यातील जनतेला माहित आहे.
Vijay Wadettiwar News : आता अॅम्बुलन्समधून पैसे खाण्याचा प्रकार महायुतीत सुरु झालाय. सनदी अधिकाऱ्यांना बदलीची भीती दाखवून कोट्यवधी रुपयांचे टेंडर काढल्याचं समोर आलंय.
10 दिवस टेंडरची मुदत ठेवली होती, ज्यात वर्किंग दिवस हे फक्त 6 होते. टेंडरची रक्कम फुगवण्यात आली होती. सरकार 1529 अॅम्बुलन्स खरेदी करणार आहे, असे विधानसभा विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले.
साधारणपणे कार्डिएक सुविधा असलेल्या एका अँम्ब्युलन्सची किंमत 50 लाखाच्या आसपास असते. 1,529 अँम्ब्युलन्सचे प्रति अँम्ब्युलन्स 50 लाख या प्रमाणे एकूण 764 कोटी 50 लाख रूपये होतात. 800 कोटी रूपयात होणाऱ्या या कामासाठी 8 हजार कोटी खर्च करण्यामागे महायुतीत सरकारमधील मंत्र्यांची काय योजना आहे हे राज्यातील जनतेला माहित आहे. अॅम्ब्युलन्समधून पैसे खाण्याचा नवा धंदा सरकारमधील काही मंडळींनी सुरू केला आहे. सनदी अधिकाऱ्यांना 'बदली'ची भीती दाखवून साडेतीन-चार हजार कोटींचे टेंडर 8 हजार कोटीपर्यंत फुगवल्याचे उघड झाले आहे. महायुती सरकारमधील अँम्ब्युलन्स घोटाळा आता उघड झाला असून अँम्ब्युलन्स पुरवठ्याचे टेंडर सरकारने रद्द करावे, दोषी अधिकाऱ्यांना निलंबित करून या घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी करावी ही आमची मागणी आहे, असे विजय वडेट्टीवार म्हणाले.
महायुतीमध्ये मोठा घोटाळा -
कार्डियाकवर काळजी घेण्याची सुविधा असलेली रुग्णवाहिका ही 50 लाखांच्या आसपास आहे. सनदी अधिकाऱ्यांनी 45 दिवस टेंडरची मुदत असताना त्यात बदलून 10 दिवस ठेवली. 33 कोटी महिन्याचा खर्च असताना आता ती 74 कोटी इतकी करण्यात आलीय. ठेकेदाराला आता पुढची 10 वर्षे तब्बल 74 कोटी रुपये मिळणार आहे. पहिले टेंडर परस्पर रद्द करण्यात आले. आमच्या सरकारच्या काळात 41 दिवस मुदत असायची आता त्यात बदल करण्यात आली आहेत. सबंधित ठेकेदार सेवा बरोबर देतो की नाही, चालक बरोबर आहेत की नाही याची कुठलीही खातरजमा न करता सरसकट अट ठेवलेली नाही. क्षमता आणि गुणवत्ता न तपासता ठेकेदाराला हे काम दिलेलं आहे. वर्षाला आठ टक्के खर्चवाढ का देण्यात आली. एका मंत्र्यांचा आणि त्याच्या नातेवाईकाची यामध्ये समावेश आहे तेही आम्ही समोर आणू. मी मुख्यमंत्र्यांना यासंदर्भात पत्र लिहून चौकशीची मागणी करणार आहे, असे विजय वडेट्टीवार म्हणाले.
गेंड्याच्या कातडीचं सरकार
गेंड्याच्या कातडीचं हे सरकार आहे. तिन्ही सत्तेतले पक्ष मिळून सामूहिकपद्धतीने हे घोटाळे करत आहेत. या सर्व प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करुन अधिकाऱ्याच्या निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी करत आहोत, असे विजय वडेट्टीवार म्हणाले.
तलाठी भरतीमध्येही मोठा घोटाळा -
अॅम्बुलन्स घोटाळा प्रकरणात आंदोलन करणाऱ्या लोकांवरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आवाज दाबण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. तलाठी भरतीमध्येही मोठा घोटाळा झालेला आहे. या सगळ्यावर आंदोलन करणाऱ्या उमेदवारांवर गुन्हे दाखल केले जात आहेत. तलाठी भरती प्रकरणात एसआयटी चौकशीची मागणी करत आहोत. ह्या कंपन्या परीक्षा घेतायत त्यांच्याकडून आमच सरकार 200 रुपये घेत होत आता कंपन्या 1000 रुपये घेतात. परीक्षाही होत नाहीत आणि पैसेही गरीब विद्यार्थ्यांना मिळत नाहियेत, असे विजय वडेट्टीवार म्हणाले.