Heat Wave in Vidarbha : अकोल्यात उष्णतेचा पारा 45 अंशांच्या पार; तर पुढील चार दिवस 'या' जिल्ह्यांत उष्णतेची लाट
Vidarbha Weather Update : विदर्भात अवकाळी पावसाने विश्रांती घेतल्यानंतर आता उष्णतेच्या पातळीने नवे उच्चांक गाठायला सुरुवात केली आहे. तर पुढील पाच दिवस विदर्भातील काही जिल्ह्यात उष्णतेची लाट असणार आहे.
Vidarbha Weather Update नागपूर : विदर्भात अवकाळी पावसाने विश्रांती घेतल्यानंतर आता उष्णतेच्या पातळीनेही नवे उच्चांक गाठायला सुरुवात केली आहे. गेल्या काही दिवसांपासून विदर्भातील (Vidarbha) जवळ जवळ सर्व जिल्ह्यांतील उष्णतेचा पाऱ्याने चाळीशी ओलांडली असून सध्या एकट्या अकोला शहरात (Akola) आज 45.8 अंश सेल्सिअस इतक्या तापमानची (Temperature) नोंद करण्यात आली आहे. तर हे तापमान या मोसमातील सर्वाधिक तापमान असल्याचे नोंदविण्यात आले आहे. तर आगामी काळात अशीच परिस्थिती कायम असणार असल्याचा अंदाज नागपूर प्रादेशिक हवामान विभागाकडून (IMD) देण्यात आला आहे.
या वाढत्या तापमानाचा थेट परिणाम विदर्भातील अनेक शहरातील जनजीवनावर झाला आहे. तर पुढील पाच दिवस विदर्भातील काही जिल्ह्यात उष्णतेची लाट असणार आहे, असे देखील हमामान विभागाकडून (IMD) सांगण्यात आले आहे. संभाव्य इशारा लक्षात घेता नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, तसेच गरज नसल्यास दुपारच्या वेळी बाहेर जाणे टाळावे. असे आवाहन देखील करण्यात आले आहे.
पुढील चार दिवस 'या' जिल्ह्यांत उष्णतेची लाट
राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल (Climate Chnage) होत असून सध्या हवामानाची विविध रूपं आणि रंग बघायला मिळत आहेत. सध्या राज्यातील काही भागात अवकाळी पावसाने विश्रांती घेतल्या नंतर आता सूर्याचा प्रकोप पहायला मिळतोय. तर काही भागात पाण्याचं दुर्भिक्ष्य असणाऱ्या दुष्काळाने अनेक गावांची चिंता वाढवली आहे. मात्र, गेल्या काही आठवड्यापूर्वी अवकाळी पावसानं काहीसे सुखावलेले अकोलेकर (Akola) सध्या उन्हाच्या वाढलेल्या पाऱ्यानं चांगलेच हैराण झाले आहेत. अकोल्यात सलग उष्णतेच्या पाऱ्याने नवनवीन उच्चांक गाठले आहे. तर आज अकोल्याच्या तापमानात 3 अंशाने वाढ होऊन आजचे तापमान हे 45.8 अंश सेल्सिअस वर पोहचले आहे. तर आजपासून पुढील पाच दिवस विदर्भातील अकोला आणि चंद्रपुर येथे उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.
दुपारच्यावेळी रस्त्यांवर शुकशुकाट
अकोला पाठोपाठ उर्वरित विदर्भातही अशीच परिस्थिती बघायला मिळत आहे. नागपूरात देखील उष्णतेच्या पाऱ्याने उच्चांक गाठला आहे. परिणामी, दुपारच्या वेळी रस्त्यावर तुरळक वाहतूक दिसून येत आहे. म्हणूनच दुपारच्या वेळी शहरातील काही सिग्नल बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर अनेक ठिकाणी मुख्य सिग्नलवर हिरवी जाळी लावण्यात आली आहे. नागपूर शहराचे आजचे तापमान हे 42.6अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले आहे. तर गरज नसल्यास दुपारच्या वेळी बाहेर जाणे शक्यतो टाळा, अशा सूचनाही हवामान विभागाकडून करण्यात आली आहे.
यंदाच्या मोसमातील सर्वोच्च तापमान
परभणी जिल्ह्यात उष्णेतची लाट कायम असुन आज जिल्ह्याचे तापमान 44 अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले आहे. तर हे तापमान यंदाच्या मोसमातील सर्वोच्च तापमान असुन सर्वत्र उकाड्याने परभणीकरांचे मोठे हाल होत आहेत. वाढत्या गर्मीने शहरातील रस्त्यांवर वर्दळ कमी झाली आहे. संभाव्य उन्हाचा प्रकोप लक्षात घेता अत्यंत महत्वाचे काम असेल तरच घराबाहेर पडावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. शिवाय जिल्हा रुग्णालयात उष्माघात कक्षही स्थापन करण्यात आला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या